शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

भूदान चळवळीचे प्रवर्तक : आचार्य विनोबा भावे



 आचार्य विनोबा भावे,
(११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२)


थोर गांधीवादी आचार्य व भूदान चळवळीचे प्रवर्तक. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी विनोबा तथा विनायक नरहरी भावे यांचा जन्‍म झाला. यांची जात चित्पावन ब्राम्हण. आजोबांचे नाव शंभुराव भावे. शंभुराव भावे यांचे जन्मगाव वाई. त्यांच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य वाई येथे होते. वाईच्या ब्राम्हणशाही या मोहल्ल्यात कोटेश्वर मंदिर आहे. हे भाव्यांच्या मालकीचे असून तेथे शंभुरावांनी अग्‍निहोत्र स्वीकारून अग्‍निहोत्र शाळा स्थापली होती. आजोबा आणि मातुश्रींपासून धर्मपरायनतेचे संस्कार विनोबांना मिळाले. त्यांचे वडील नरहरी शंभुराव भावे व आई रूक्मिणीबाई. हे नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरून आईवडिलांना न कळविताच वाराणसी येथे रवाना झाले. त्यांना दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक हिमालय व दुसरे बंगालचे सशस्त्र क्रांतिकारक, वाराणसी येथे हिंदुविश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधीचे भाषण झाले. त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. हिमालयातील अध्यात्‍म आणि बंगालमधील क्रांती यांच्या दोन्ही प्रेरणा महात्मा गांधीच्या उक्तीत आणि व्यक्तिमत्त्वात त्यांना आढळल्या. महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. महात्मा गांधींची कोचरब आश्रमात ७ जून १९१६ रोजा भेट घेतली आणि तेथेच त्या सत्याग्रहश्रमात नैष्ठिक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींची एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना त्यांचा जीवनोद्देश होता.

वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळाचे संस्थापक व मुख्याध्यापक स्वामी केवलानंद सरस्वता (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांच्यापाशी विनोबांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, पांतजलयोगसूत्रे इ. विषयांचे अध्ययन केले. माहुली येथील स्वामी कृष्णानंद यांच्या आश्रमातील काही प्रौढ विद्यार्थी-शिवनामे, वि. का. सहस्त्रबुद्धे इ. मंडळीही त्यांच्याबरोबर सहाध्यायी होती. दिनकरशास्त्री कानडे व महादेवशास्त्री दिवेकर हे प्राज्ञपाठशाळेची व्यवस्थापनाची व अन्य प्रकारची कामे पाहत होते. प्रत्येक सोमवार हा या पाठशाळेचा सुटीचा म्हणजे अनध्ययनाचा दिवस असे. त्या दिवशी पाठशाळेची अंगमेहनतीची कामे शिक्षक-विद्यार्थी उरकत असत आणि प्रज्ञानंदस्वामींच्या समाधिस्थानाच्या सभागृहात विद्यार्थी व शिक्षक यांच्या शास्त्रार्थ चर्चेकरता साप्ताहिक सभा भरत. चर्चेचे विषय सामाजिक, धार्मिक. तात्‍त्‍विक हे असतच; परंतु त्याबरोबर प्रचलित राजकारणाची अनेक बांजूनी मीमांसाही चालत असे. दिनकरशास्त्री कानडे हे सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगी अरविंद घोष इ. सशस्त्र क्रांतीकारकांच्या मार्गाने चालणाऱ्या एका गुप्त कटाचे सदस्य होते. सशस्त्र क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा ते पुरस्कार करीत. विनोबांच्याप्रमाणेच त्यांचेही वक्‍तृत्व अमोघ होते. अहिंसक क्रांताची वैचारिक भूमिका विनोबा मोठ्या परिणानकारक रीतीने या साप्ताहिक संभामध्ये मांडीत असत . १९१७ साली हिवाळ्यात वाई येथे प्लेगची साथ उद्‍‌भवली. कृष्णेच्या दक्षिण तिरावर राहुट्या आणि पर्णशाला उभारूण येथे प्राज्ञपाठशाळचे विद्यार्थी व शिक्षक जवळजवळ ४ महिने राहिले. वेदान्ताचे व इतर शास्त्रांचे पाठ त्यांतील एका विस्तृत पर्णशालेमध्ये चालत असत. विनोबा पर्णशालेबाहेरच्या कृष्णाकाठच्या आम्रवृक्षाच्या छायेखाली उपनिषदांचे व शांकरभाष्याचे उच्च स्वरात वाचन करीत, हळूहळू सावकाश फेऱ्या मारीत असत. त्यांचे ते प्रसन्न वाचन ऐकून स्वामी केवलनंदांच्या मनावर विनोबाजींच्या व्यक्तिमत्त्वाची खूप खोल छाप पडली, विनोबांनी वेदान्ताविषयामध्ये खूप वेगाने १० महिन्यांत प्रगत केली. आपण कोणकोणत्या ग्रंथांचे व विषयांचे अध्ययन केले याचा सविस्तर वृतान्त त्यांनी महात्मा गांधींना कळवला. म. गांधीं हे वृत्तान्तपत्र वाचून अत्यंत विस्मित झाले. त्या पत्राच्या उत्तरात म. गांधींनी अखेर म्हटले की, " ए गोरख, तूने मच्छिंदरको भी जीत लिया है !"

विनोबा वाईहून परत अहमदाबादला फेब्रवारी १९१८ मध्ये परतले. १९१८ साली एन्फ्ल्यूएंझाची साथ देशभर पसरली. लक्षावधी लोक त्या साथीला बळी पडले. त्यात विनोबांचे वडील, मातुश्री आणि सगळ्यात धाकटा भाऊ भाऊ दत्तात्रय हे आजारी पडले. ही गोष्ट म. गांधीना कळल्यावर त्यांनी विनोबांना मातुश्रींच्या शुश्रूषेकरता बडोद्यास जाण्याचा आग्रह धरला. विनोबा तयार नव्हते. गांधीनी त्यांचे मन वळवले. आई आणि धाकटा भाऊ या रोगाला बळी पडले. वडील बरे झाले. विनोबा सर्वांत ज्येष्ठ पुत्र, म्हणून आईचा अंत्यविधी त्यांनीच करणे प्राप्त होते. पुरोहिताकडून अंत्यविधीचा संस्कार करवून घेणे विनोबांना मान्य नव्हते. म्हणून ते स्मशानात गेले नाहीत. वडिलांनी पद्धतीप्रमाणे अंत्यविधी उरकून घेतला. गीता, उपनिषदे यांचे पठन करीत विनोबा घरीच राहिले. नंतर पुन्हा साबरमतीत आश्रमात राहण्याकरता अहमदाबादेत परतले.
१९५१ साली सशस्त्र क्रांतिवादी कम्युनिस्टांनी तेलंगणामध्ये जमीनदार वर्गावर हल्ले सुरू केले. अहिंसक क्रांतीचा संदेश म. गांधीनी जगाला दिला. परंतु तो भारतालाही समजला नाही, तर जगाला कसा समजेल ? असा प्रश्न त्यामुळे उत्पन्न झाला. गांधीवाद हा गांधींबरोबरच स्वर्गवासी झाला की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे उत्तर अस्तिपक्षी म्हणजे या भूतलावरच शांतिमय क्रांतीचे कार्य पुरे व्हावयाचे आहे अशा तर्‍हेचा विश्वास निर्माण करण्याकरता 'सब भूमी गोपाल की' 'जय जगत्'ची घोषणा विनोबांनी केली. ७ मार्च १९५१ रोजी आंध्रमधील शिवरामपल्ली या गावाला पोहोचण्यासाठी विनोबांनी सेवाग्रामहून पदयात्रा सुरू केली. सर्वोदय संमेलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ५ मुद्यांचा कार्यक्रम सांगितला. आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, श्रम, शांती व समर्पण हे ते पाच मुद्दे होत. ही पदयात्रा म्हणजे भूदानाचे ऐतिहासिक आंदोलन होय. १८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात पोचमपल्ली गावी विनोबा पोहोचले. हे कम्युनिस्ट नक्षलहाद्यांचे केंद्र होते. त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले की, 'मी आजपासून भारतातील भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचा प्रयोग करीत आहे. जमिनीची योग्य वाटणी झाली तरच खरी सामाजिक क्रांती-विशेषतः स्वयंपूर्ण ग्रामराज्याकडे नेणारी क्रांती-निर्माण होऊ शकेल' ही यात्रा सुरू झाल्यानंतर ७० दिवसांत एकूण १२ हजार एकर जमीन मिळाली. त्यानंतर पं. नेहरूंच्या निमंत्रणावरून पंचवार्षिक योजनांसंबंधी विचारविनिमय करण्याकरता विनोबा पायीच दिल्लीकडे निघाले. १२ सप्टेंबर १९५१ रोजी दिल्लीला पोहचले. त्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक, महराष्ट्र इ. राज्यांमधून सु. साडेतेरा वर्षे पदयात्रा करून सेवाग्रामला विनोबा पोहोचले. साऱ्या जगाचे लक्ष या ग्रामदानच्या आंदोलनाकडे त्यांनी वेधून घेतले. वय वर्षे ५५ ते ६८ पायी यात्रा करून सारा भारत देश त्यांनी पाहिला. चाळीस हजार मैल चालले. मध्य प्रदेशात आले. तेथील डाकूंच्या क्षेत्रात पदयात्रा चालू असता १९ दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. १९७० साली पवनार येथे येऊन क्षेत्रसंन्यास घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. या भूदान आंदोलनाचे एकंदरीत फलित काय निघाले, यासंबंधी काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. हे भूदान आंदोलन एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होय, असे वाटून जगातील मोठमोठे राजकीय ध्येयवादी व विचारवंत विस्मित झाले. 'सब भूमी गोपाल की' असा भारतभर घुमणारा नारा देत ही शांतिमय क्रांती सुरू झाली. शांतिमार्गानेच सर्वोदय होणार, राजकीय सत्तेची शक्ती अथवा शस्त्रसक्ती यांच्यापेक्षा ही प्रेमाची शक्तीच क्रांती घडवून आणील, असे भविकांना वाटले. परंतु सर्वोदय न होता अर्धोदय झाला व लगेच ते क्रांतीचे बिंब अस्ताला गेले, गडप झाले.

पवनार येथे ४ ऑक्टोंबर १९७० रोजी मोठ्या प्रमाणात विनोबांचा अमृतमहोत्सव झाला. ८ ऑगस्ट १९७२ मध्ये 'गीत प्रतिष्ठान' ची स्थापना केली. २२ एप्रिल १९७९ रोजी त्यांनी गोहत्याबंदीसाठी उपोषण सुरू केले आणि २६ एप्रिलला उपोषण समाप्त केले; कारण लोकसबेत इंदिराजींनी हा विषय समवर्तीसूचीत घेण्याचे आश्वासन दिले.

लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर १९६६ साली इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्रिपदावर आल्या. १९७५ मध्ये इंदिरा गांधीनी आणीबाणी पुकारली. त्यात वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणि सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींवर बंधने घालण्यासाठी आली. लक्षावधी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या निर्णयावाचून बंदिवासात डांबण्यात आले. त्या वेळी विनोबांनी या आणीबाणीचे समर्थन केले. त्यांनी या कालखंडाचे ' अनुशासन पर्व ' म्हणून भव्य नामकरण केले. तेव्हा  विनोबांच्या आश्रमातून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकाचेही अंक पोलिसांनी जप्त केले. तेव्हा विनोबांनी केवळ स्मित हास्य केले. त्यामुळे विनोबा हे ' सरकारी संत ' म्हणून अवहेलनेस पात्र झाले. इंदिरा गांधींच्या पक्षाचा त्यानंतर निवडणुकीत पराभव झाला. जनता पक्षाचे राज्य आले. ते २।। वर्षांपेक्षा जास्त टिकले नाही. पुन्हा १९८० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिराजींचा विजय झाला, त्यावेळी विनोबांनी मौनव्रत स्वीकारले असतानाही आनंदाने टाळी वाजवली, ही टाळी देशभर ऐकू गेली ! विनोबांच्या निधनानंतर अनेक दैनिक व साप्ताहिक नियतकालीकांनी हे सगळे विसरून मोठ्या भक्तिभावाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली; परंतु काहींनी आणीबाणीतच विनोबा कैलासवासी झाले, असे म्हटले. परंतु फार मोठा भारतीय मतदार वर्ग आणीबाणीमुळे इंदिराजींबद्दल नाराज झाला. तरी ती नाराजी थोडा वेळच टिकली. याच मतदारवर्गाने इंदिराजी व त्यांच्या पक्षास १९८० च्या जानेवारीत प्रचंड विजय मिळवून दिला. म्हणून आणीबाणीची मीमांसा अधिक खोलीत जाऊन केली तरच इंदिराजींच्या विजयाचा व विनोबांच्या टाळीचा अर्थ कळू शकेल. त्याकरता आणीबणीअगोदरच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. आणीबाणीच्या अगोदर लोकशाही निर्वाचनपद्धतीने यथोचित निवडून आलेल्या गुजरात व बिहारमधील विधानसभांच्या विसर्जनाची संसदीय लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे अवैध असलेली चळवळ जयप्रकाशजींनी आरंभली. वैध रीतीने रीतसर निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची भयंकर विटंबना करण्यात आली. अशा प्रकारच्या राजकीय घटना लक्षात घेतल्या म्हणजे आणीबाणीच्या कालखंडाचा अर्थ नीट लागतो. आणीबाणीत अतिरेक झाले होते. टोल्यास प्रतिटोला हेच त्याचे स्वरूप होते, त्यामध्ये अनेक अत्याचार झाले. त्यांची पुनरावृत्ती होणार नाही अशीही हमी इंदिरा गांधींकडून जनतेला देण्यात आली. विनोबांच्या आनंदी टाळीला या देशातील फार मोठ्या मतदार वर्गाने दाद दिली, हे त्या संदर्भात विसरता कामा नये. त्यांचा आधुनिक युगाला एक महत्त्वाचा संदेश आहे -'हे विज्ञानयुग आहे. या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली, तर मनुष्यजातीचा उद्धार होईल'.

विनोबांची बहुतेक पुस्तके मूळ मराठी अथवा हिंदीत आहेत. गुजरातीत काही प्रवचने आहेत. साम्यसूत्र हे संस्कृतात आहे. सर्व आधुनिक भारतीय भाषांत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या ग्रथांची संख्या सु. २०० वर भरते. त्यांतील त्यांची विशेष महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे : मराठी : मधुकर, गीताई, गीताप्रवचन, ईशावास्यवृत्ति, स्वराज्यशास्त्र आणि सर्वोदय विचार, लोकनागरी लिपि, गांधी तत्त्वज्ञान, सर्वोदयाची विविध घोषणा, ज्ञानदेव चिंतनिका, भागवत धर्म मीमांसा, स्थितप्रज्ञ-दर्शन, भूदानयज्ञ-समग्रदर्शन, स्त्री-शक्ती, दीक्षा इत्यादी. हिंदी: जपुजी, विनोबाके विचार (३ भागांत), जीवन और शिक्षण, शिक्षण विचार, भूदानगंगा (८ भागांत), ग्रामदान, भूदानयज्ञ, सर्वोदय विचार और स्वराज्यशास्त्र, सर्वोदय की ओर, भाषा का प्रश्न, गावगाव मे स्वराज्य, सयंम और संतति, प्रेमपुर्ती ईसा, विनोबा चिंतन (४८ भागांत), तीसरी शक्ती, नामघोषानवनीत (संपादित), बापू के चरणो मे (संपा.), कुरान सार इत्यादी. संस्कृतः ऋग्वेद सार संकलन, साम्यसूत्रे,वेदान्तसुधा (संकलन) इत्यादी. यांतील बहुतांश ग्रथांचे इतर आधुनिक भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत.
दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. निधानाची वार्ता त्यांनी प्रायोपवेशन सुरू केल्यानंतर केव्हाही अपेक्षित होती. ५ नोव्हेंबर रोजी विनोबांना ज्वर आला, त्याबरोबरच हृदयविकारही उद्‍भवला आणि प्रकृती चिंताजनक झाली. उपचार त्वरित सुरू झाले. वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्‍णालयात उपचार करण्याकरता नेण्याचा विचार तज्ञ डॉक्‍टरांनी विनोबांना सांगितला; परंतु त्यांनी परंधाम आश्रम सोडण्यास नकार दिला व तेथेच उपचार सुरू झाले. मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे तज्ञ डॉ. मेहता मुंबईहून आले. हळूहळू प्रकृती सुधारेल अशी आशा उत्पन्न झाली. अ‍ॅलोपथीचे उपचारही विनोबांनी स्विकारले, परंतु ८ नोव्हेंबर रोजी रात्री अन्नपाणी आणि औषधे या तिन्ही गोष्टी घेण्यास त्यांनी नकार दिला. आचार्यांचे बंधू शिवाजीराव भावे, मित्र दादा धर्माधिकारी इ. मंडळींनी व आश्रमस्थ भक्तजनांनी आचार्यांना परोपरीने काकुळतीस येऊन, अन्नपाणी व औषधे घेण्याची विनंती केली. ती त्यांनी नाकारली. इंदिरा गांधी विनोबाजींना १० नोव्हेंबर रोजी भेटल्या. अन्नपाणी , औषधे घेण्याची विनंती त्यांनीही केली. प्रायोपवेशनाचा संकल्प करण्याचे कारण आचार्यांनी श्री. त्र्यं. गो. देशमुख व इतर भक्तांना स्पष्ट करून सांगितले. ते म्हणाले- " आता देह आत्म्याला साथ देत नाही. रखडत जगण्यात अर्थ नाही. जराजर्जर शरीर टाकणेच ठीक !"

विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा.विनोबांची समाधी, परंधाम आश्रम, पवनार, वर्धा.
आचार्यांच्या निधनाची वार्ता भारतभर व जगभर सर्व प्रचारमाध्यमांतून विद्युत्‍वेगाने पसरली. या निधनाला कोणी महानिर्वाण म्‍हणाले, कोणी युगपुरूषाची समाधी म्‍हणाले. महात्‍मा गांधींच्या आध्यात्मिक परंपरेचे ते एक श्रेष्ठ वारसा होते. त्यांचे हे प्रायोपवेशनाचे तंत्र हिंदू धर्म, बौद्ध व विशेषतः जैन धर्म या तिन्ही धर्मांना प्राचीन कालापासून मान्य असलेले तंत्र आहे. जैन धर्मात या तंत्रास ' सल्लेखना ' अशी संस्कृत संज्ञा आणि परंपरा ' संथारा ' ही प्राकृत संज्ञा आहे. हिंदु धर्मात यास ' प्रायोपवेशन ' म्हणतात. प्राय म्हणजे तप. तपाचा एक मुख्य अर्थ ' अनशन ' असा आहे. देहाचे दुर्घर व्याधी बरे होऊ शकत नाहीत, असे निश्चित झाल्यावर रूग्णाला जलप्रवेशाने, अग्‍निप्रवेशाने, भृगुपतनाने (उंच कड्यावरून उडी मारून), अनशनाने (अन्नपाणी वर्ज्य करून) किंवा अन्य कोणत्याही इष्ट मार्गाने देहविसर्जन करण्याची हिंदुधर्मशास्त्राने अनुमती दिली आहे. ज्ञानदेवादी संतती योगमार्गाने देहत्याग केला आहे. हा योगमार्ग गुरूगम्यच आहे. त्याचे वर्णन गीतेच्या आठव्या अध्यायात केले आहे. तात्पर्य, प्रायोपवेशन किंवा योगशास्त्रातील देहत्यागाची युक्ती हिंदुधर्मशास्त्राने मान्य केली आहे. विनोबांनी प्रायोपवेशनाच्या द्वारे देहत्याग केला. अनेक जैन साधू आणि साध्वी स्त्रिया आजही प्रतिवर्षी अशा प्रकारे देहत्याग करीत असतात आणि त्याची वार्ता वृत्तपत्रांतही केव्हा केव्हा येते. अलीकडची स्वातंत्र्यवीर सावरकर, धर्मानंद कोसंबी, साने गुरूजी इत्यादिंकांनी देह त्याग करण्याची उदाहरणे प्रसिद्धच आहेत.

भारत सरकारने विनोबांना 'भारतरत्‍न' (मरणोत्तर-१९८३) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.


संदर्भ :
 1. Lanza, Del Vasto, Gandhi to Vinoba- The New Pilgrimage, 1956.
 2. Narayan, Shriman, Vinoba: His Life and Work, Bombay, 1970.
 3. Sharma, Jagdish Saran, Vinoba and Bhoodan, New Delhi, 1956.
 4. Tandon, P.D. Ed. Vinoba Bhave : The Man and His Mission (A Symposium), Bombay.
 5. Tennyson, Hallam, Saint on the March: The Story of Vinoba, Delhi. 1955.

६. देशपांडे, निर्मला, विनोबांच्या सहवासात, वर्धा, १९५५.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा