शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

नाव नसलेली नदी



माझ्या गावाला भेदत
पहिल्या माणसाच्याही खूप आधीपासून
शांतपणे वाहत आहे ती अरुंद नदी
जिला कोणतंच नाव नाही...

तुम्ही पाहिलं आहे कधी
कशी वाटते नाव नसलेली नदी?

चिखल, शेवाळ आणि जलपर्णीने भरलेली
ती अशाचप्रकारे वाहतेय गेल्या कित्येक शतकांपासून
एका नावाच्या शोधात
माझ्या गावची नदी...

कुठे कुणाचा मृत्यू होतो
लोक उचलतात तिरडी
आणि नदी जिथे सर्वात जास्त शांत आणि एकटी असते
तिथेच आजूबाजूला करून येतात अंत्यसंस्कार...

जेव्हा मी लहान होतो तेव्हा नेहमी विचार करायचो
लोक ज्यांचे अंत्यसंस्कार करतात
त्याचं काय करते नदी...

सुर्योदयानंतर बऱ्याच वेळाने
येतात म्हैशी
नदीमध्ये अंघोळ करायला...

नदी कुठे खोलवर डचमळते पहिल्यांदाच
मग येतात झुम्मन मिया
हातात घेऊन जाळे आणि चारा...

नदीमधे पहिल्यांदाच एक चमक येते
जणू नदी ओळखते झुम्मन मियाला...

मग सूर्यास्तापर्यंत
जिथल्या तिथे
जाळे लावून
एकटक बसून राहतात झुम्मन मिया...

दिवसभरात किती मासे
अडकत असतील त्यांच्या जाळ्यात?
किती झींगे किती चिखल
पाण्यातून उसळून येत असेल
त्यांच्या थैलीमध्ये
कुणालाच माहित नाही...

नदीला कोण देतं नाव
तुम्ही कधी विचार केलाय?

कि सकाळपासून संध्याकाळपर्यंत
नदीच्या काठावर
नदीसाठी नावाच्या शोधात
एकटक बसून राहतात झुम्मन मिया?





मूळ कविता : बिना नाम की नदी
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा