गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्रातील लोककला ४ : भारूड



लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली. 

लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.  या लोककलांचा घेतलेला एक संक्षिप्त वेध...

४. भारूड :
महाराष्ट्रातील लोककलांमध्ये ज्या लोककला आजही अखंडपणे व तेवढ्याच ताकदीने उभ्या आहेतत्यापैकी भारूड ही एक महत्त्वाची कला. ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल या कलेचे आकर्षण आहे. वार्षिक ज्ञानेश्र्वरी पारायणतुकाराम गाथा पारायणयात्रा किंवा इतर उत्सवांमध्ये भारूडाचे स्वतंत्रपणे आयोजन केले जाते.

लोकमानस जिंकण्याची ताकद असणारी ही कला जेवढी रंगतदार आहे तेवढीच ती प्रबोधकही आहेनाट्यवक्तृत्व आणि संगीताच्या मिलाफातून रंगत जाणारे हे भारूड अध्यात्माच्या प्रसाराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या वैशिष्ट्यपूर्ण कलेचे जनक होत.

मध्यभागी बसलेला वीणेकरी त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो व भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. थोड्या-बहुत फरकाने कीर्तनासारखी भारुडाची बैठक बसते. सुरुवातीला ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. रंगतदार सुरुवातीसाठी बराच वेळ हे भजन उत्साहाने गायले जाते आणि शेवटी रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’ चा सभामंडप दुमदुमून टाकणारा जयघोष होतो.

उत्साहलगबगरंगतदार चालीसंगीतखुसखुशीत निवेदन या भारुडाच्या जमेच्या बाजू असतात. भजन संपलं की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि आपल्या श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे करतो. भारुडाच्या सुरुवातीसाठी त्याला लोकांना-आपण एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकतो आहोत याची-कल्पना द्यावी लागते. मग या गावाचा दिनकम पहाटेपासून सुरू होतो. सडा-रांगोळी होते. पक्षांचा किलबिलाटगुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्‍या महिला सुरात गाऊ लागतात.

सुंदर माझं जातं ग,
फिरतं बहुत...
ओव्या गाऊ कौतुके तु,
ये रे बा विठ्ठला...

भारुडात मध्ये-मध्ये लोकसंस्कृतीतल्या अशा गीतांची पेरणी केली जाते. यानंतर निवेदकाचे गामवर्णन सुरू असते. एवढ्यात ‘दान पावलंदान पावलं’ म्हणत वासुदेवाची स्वारी गाव जागवायला मंचकावर हजर होते. मोरपिसाची टोपी घातलेलं हे त्याचं रूप पाहून पहाट झाल्यासारखं वाटू लागत. अभंगामधून लोकांना रामनाम जपण्याचा उपदेश देऊन तो नाचत-नाचत निघून जातो. तेवढ्यात हातात काठी घेऊन जोशीबुवा हजर होतात. जोशीबुवा लोकांना चार उपदेश करतात आणि निघून जातात. एकामागे एक येणार्‍या या लोककलावंतांचा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटत जातोतशी उत्सुकता वाढत जाते. आता कोण येणार म्हणून लोक इकडे तिकडे पाहू लागतात. एवढ्यात जोरजोरात आरोळ्या ठोकततोंडाने भयावह आवाज काढतहातातल्या असुडाचे फटके अंगावर घेत मरीआईचा भक्त येतो. कडकलक्ष्मीचा तो अवतार पाहून मुलं आईला बिलगतात. सारा श्रोतृवर्ग कुतूहलाने तो रुद्र अवतार पाहू लागतो. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत,  देवीला प्रश्र्न विचारले जातात. सहसा हे प्रश्र्न विनोदी ढंगाचे असतातपण त्यातून प्रबोधनही करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशा प्रकारे एकेक लोककलावंत आपली कला सादर करून जातो. ग्रामजीवनातील एकेक प्रश्न उलगडत जातो. संसारातला वैताग मांडला जातोतसाच आनंदही मांडला जातो. निखळ लोकरंजन करताना भारूड सादर करणारी मंडळी श्रोत्यांवर असणारी आपली पकड कधीही सैल होऊ देत नाहीत. निवेदनासोबत संगीत आणि नाट्यमय प्रसंगांची पेरणी करत अगदी पहाटेपर्यंत भारूड रंगत जाते. मग त्यात ‘विंचू चावला’, ‘दादल्या नको ग बाई’ अशी रंगतदार भारुडे लोकांना पोटभर हसायला लावतात आणि संसारातली गुपितं उघडी करून जातात. भारूडांमध्ये वरवर पाहिले असता विनोद व मनोरंजन दिसते. पण ही गीते व अनुषंगाने येणार्‍या कथा या ‘रूपकात्मक’ (रूपक अलंकाराने युक्त) असतात. बहुतांश भारूडांमधून भौतिक सुखांचा उपभोग घेत असतानाचउपभोगांवर मर्यादा ठेवून परमार्थ कसा साधावायाबाबतचे आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते.

एकूणच भारूड ही लोककला महाराष्ट्राच्या लोकजीवनातली एक समृद्धप्रभावी आणि प्रबोधक कला आहे आणि ही कला जोपासण्याचं कार्य अनेक कीर्तनकारभारूडकारसंशोधकअभ्यासक व लेखक मोठ्या हिरीरीने करत आहेत. ही आशादायक आणि समाधानकारक बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा