शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

तुकोबाराय, फक्त एवढंच द्या...


देहूच्या समाधीमंदिरात
जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं
गहिवरून आला
माझ्या मनाचा कोपरा अन् कोपरा...
ती सुंदर विठूरायाची मूर्ती
एकटक पहात राहिले
मनात आलं
काळतोंड्या म्हणत
आवलीनं इथेच का याला
जाबसाल केला असेल?
इंद्रायणीचा घाट
शांत, निश्चल,
याच का घाटावर
तुकोबारायांची गाथा बुडवली असेल?
हम्म..
अनेक प्रश्नांची रेलचेल झाली
गहिवरलेल्या मनात,
तुकोबांच्या प्रतिमेपुढे
नम्रतेने झाले नतमस्तक
तेव्हा आठवलं
मंदिरात काहीतरी मागण्याचा
प्रघात आहे आपल्याकडे,
म्हटलं,
तुकोबा,
काय आहे तुमच्याकडे द्यायला?
विठूरायाच्या गजरात सारंच गमावलंत की तुम्ही.
बरं,
द्यायचंच असेल,
तर समाजातल्या दंभावरची तुमची चीड द्या.
अन्यायाविरोधातील तुमची तेजस्वी वाणी द्या.
विषमतेवर ओढलात तो तुमचा आसूड द्या.
तुकोबाराय,
समाजातल्या विकृत व्यवस्थेविरोधात
माझ्या मनात तोच तुमचा विद्रोह द्या.
तुकोबाराय,

फक्त एवढंच द्या...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा