शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

'वेदाआधी तू होतास'च्या निमित्ताने...

वेदाआधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून
विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ऋचा '
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव,
तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस
आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले
हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.

           बाबुराव बागुलांची ही एक प्रसिद्ध कविता. यापूर्वी अनेकदा वाचलेली आणि प्रत्येकवेळी नव्याने उमजलेली. कदाचित कविता ही अशीच असते. प्रत्येक क्षणी पुनःप्रत्ययाचा आनंद देते. कधी अस्वस्थ करते तर कधी मेंदूला मुंग्या आणते. वेदाआधी तू होतास ही अशीच अस्वस्थ करणारी कविता...
           मी जवळपास चार वर्षांपूर्वी जेव्हा ही कविता पहिल्यांदाच वाचली तेव्हा वेदाआधी असणारा हा तू म्हणजे नेमका कोण असाच प्रश्न मला पडला. या तू चा शोध घ्यायचं मी ठरवलं. कविता पुन्हा पुन्हा वाचली. बाबूरावांचं इतर साहित्य वाचलं. हळूहळू हा वेदाआधीचा तू उमगू लागला...


वेदाआधी तू होतास ही कविता म्हणजे वेद, पुराणे यांना अपौरुषेय मानणाऱ्या संस्कृतीविरोधात बाबूरावांनी पुकारलेला एल्गार आहे. ज्या संस्कृतीनं माणसाचं माणूसपण हिरावून घेत वस्तुवत माणसाची मालकी ठरवली अशा संस्कृतीच्या दमनतंत्रावर चढवलेला हल्ला आहे. आपल्या या कवितेतून कवीने माणसाचं मोठेपण व्यक्त केलं आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार करता कवी ज्या माणसाचे, ज्याच्या सृजनाचे आणि सामर्थ्याचे गोडवे गातो तो माणूस कोणत्या काळात अस्तित्वात होता असा प्रश्न संवेदनशील मनाला पडतो.
            आजचा माणूस दुबळा झालाय. आता त्याच्यापाशी राहिलीच नाहीये प्रतिभा वेद आणि ऋचा निर्माण करण्याची. नव्या प्रेषितांचे बारसे करण्याची त्याला गरजही नाही. आता नव्या प्रेषितांनीही स्वतःच स्वतःच्या साक्षात्काराचे सोहळे साजरे करण्याचा पायंडा घालून घेतलाय. निस्तेज झालेल्या माणसाकडे आता राहिलंच नाहीये सामर्थ्य सूर्याला सूर्य म्हणायचं. आता माणूसही शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे झालाय. त्यांच्या म्होरक्यांची वाट निमुटपणे  चोखाळणारा. आता त्यांचे म्होरके म्हणतील तोच सूर्य आणि चंद्र. अवघ्या विश्वाचं नामकरण करणारा माणूस आता विसरत चाललाय की त्याचंच नाव माणूस आहे...
             काही दिवसांपूर्वीच एका स्पर्धेचं पत्रक पाहण्यात आलं. वक्तृत्व स्पर्धा होती आणि स्पर्धेसाठीच्या विषयांमधे एक विषय होता ‘मी माणसाला शोधतो आहे’. विषय ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. यापूर्वी अनेक स्पर्धांमध्ये मी स्वतः भाग घेतला. इतरांच्या स्पर्धा पहिल्या. पण या विषयाने मला खरंच भंडावून सोडलं. इतका का माणूस दुर्मिळ झालंय? माणसांनी भरलेल्या जगात माणसालाच शोधावं लागतं? नेमकं आयोजकांना काय अपेक्षित असावं? मला वाटतं हा शोध मनातल्या हरवलेल्या माणूसपणाचा आहे. मला खात्री आहे अनेकजण या माणूसपणाचा अर्थ माणुसकी असाही घेतील. पण माझ्यासाठी मात्र माणूसपण आणि माणुसकी यामध्ये थोडा फरक आहे. एखाद्या घटनेवर संवेदनशील मनाने प्रतिक्रिया देणं, एखाद्या अपघातात किंवा अन्य कोणत्याची वाईट प्रसंगी पीडितांना मदत करणं ही झाली माणुसकी. माझ्यासाठी माणुसकी ही अन्य व्यक्तींशी / समाजाशी संबधित संकल्पना आहे. आणि माणूसपण हे प्रत्येक व्यक्तीची अंतरंगविशेषता आहे. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचं माणूसपण वेगळं आहे. खरतर आज हे माणूसपणच लुप्त होत चाललंय. माणूस इतका निबर होत चाललाय कि आता ना त्याला जन्माचं अप्रूप आहे ना मृत्यूचा खेद. इथे चांगल्या गोष्टींचा कुणाला आनंदच होत नाही, कोणत्याही वाईट गोष्टीचा इथे कुणाला संतापच येत नाही. जिथे भावनांचा मनोव्यापारच संपलाय तिथे आता कोणतं सृजन घडणार? जिथे झापडबंद सत्य बिंबवलं जातं प्रयत्नपूर्वक हेतुपुरस्सर तिथे खऱ्या सत्याचा शोध कोण घेणार?

             काळ सरकत जातो आणि अनेक गोष्टींचे संदर्भ कालबाह्य ठरत जातात. बाबुराव बागुलांच्या कवितेतला हा सामर्थ्यशाली माणूस हरवला असला तरी त्याची कविता कालबाह्य ठरत नाही. आता या कवितेकडे माणसाचा इतिहास म्हणून बघण्याऐवजी भविष्याची अपेक्षा म्हणून पाहायला हवं. आणि पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक माणसातलं माणूसपण जिवंत करायला हवं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा