‘माझ्या मराठी मातीचा
लावा लालाटास
टिळा,
तिच्या संगे जागतील
मायदेशातील
शिळा...’
असं म्हणत कुसुमाग्रजांनी
कधी आपल्या काव्याने मराठी वाचकांच्या रसिक मनाला भुरळ घातली तर कधी ‘कुणी घर देत
का घर’ म्हणत नाटककार वि. वा. शिरवाडकरांनी बदलत्या समाजव्यवस्थेतील ज्वलंत समस्या
नाट्यात्म रीतीने दर्शकांसमोर आणल्या. आपल्या ‘वैष्णव’ या कादंबरीतून त्यांनी
आपल्या कादंबरीलेखनातील कसब दाखवलं. पण नाटककार आणि कवी म्हणूनच खास प्रसिद्ध
असलेल्या शिरवाडकरांनी कथालेखनही विशेषत्वाने केले आहे. त्यांच्या कथा विविधांगी
अनुभवविश्व, प्रभावी पात्ररचना, आकर्षक भाषाशैली आणि यांच्या बरोबरीनेच वाचकाला
खिळवून ठेवणारे निवेदन यामुळे वाचनीय झाल्या आहेत. कवितेच्या प्रांतात ज्ञानपीठ
मिळवणाऱ्या अन् दर्शकांच्या पापण्या आसवांनी भिजवणाऱ्या नाटककारातील कथालेखकाची ओळख
करून देण्यासाठी मी निवडलेला वि. वा. शिरवाडकर लिखित कथासंग्रह म्हणजे सतारीचे
बोल...
कथासंग्रहाचे नावच
किती सुरेल आहे नाही, त्यांच्या कालामयी हृदयाचा अविष्कार त्याच्या कथांची शीर्षके
वाचली की लगेच लक्षात येतो. आपल्या कथांतून त्यांनी विविध विषयांची उत्तम हाताळणी
केली आहे. या कथासंग्रहातील पहिली कथा म्हणजे ‘आमराईतील रंभा’. धरणाच्या कामावर
देखरेख करण्यासाठी गेलेल्या कथानायकाची भेट आपल्या कुटुंबाचा मोठ्या कष्टाने
सांभाळ करणाऱ्या अत्यंत रूपवान रंभेशी होते. त्यानंतर त्यांच्यात हळुवार उमलत
गेलेलं प्रेमभावनेचं नातं, त्यांच्यातील लाघवी संवाद अन् अखेर धरणाचे काम
संपल्यामुळे त्याचा झालेला होणारा वियोग वाचकांच्या मनालाही चटका लावून जातो.
शिरवाडकरांनी या कथेत प्रेमभावना मांडली असली तरी त्यातील पावित्र्य मनाला वारंवार
जाणवत राहतं. ही कथा केवळ कथा राहत नाही तर त्यातील लालित्यपूर्ण निवेदनशैलीमुळे
जणू एक गद्यकाव्यच बनून जाते. तर त्यांची ‘दीडशे मैल दूर’ ही कथा रागाच्या भरात घर
सोडून आलेल्या आणि दादरच्या रेल्वे स्टेशनवर हमाली करणाऱ्या सकवा या तरुणाच्या
सुट्टीच्या दिवसाभोवती गुंफलेली आहे. एक अनोळखी माणूस सकवाला त्याच्या कुटुंबाची
आठवण करून देतो आणि सकवा मनातला राग विसरून पुन्हा एकदा दीडशे मैल दूर वसलेल्या
आपल्या गावाकडे जाण्याचा बेत पक्का करतो. या कथेतून शिरवाडकरांनी हमालांच्या
कष्टमय जीवनाचा वेध घेतला आहेच पण त्याच्या जोडीनेच १९५०-५५ च्या काळातील मुंबईचे
दर्शनही ते आपल्याला शब्दरुपाने घडवतात.
‘त्यांची एक वाडा
आणि दोन माणसे’ ही कथा श्रीमंत जमीनदारांच्या भव्य वाड्यात गुदमरणारे श्वास
मोजणाऱ्या त्यातील स्त्रियांच्या जीवनाला केंद्रबिंदू करते. एकाचवेळी गिरीजेच्या
मनात खदखदणारे दुःख, तिच्या शरीरमनाचा कोंडमारा आणि विश्वासरावांवरील विषप्रयोगाचे
नाट्य यामुळे ही कथा वाचकांना खिळवून ठेवते. ‘भ भ भटजीचा’ ही कथा भिक्षुकीतून
पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने दरिद्री राहिलेल्या सीतारामची आहे. देवभक्तीने भले
झाले नाही म्हणून पोथ्यांचा त्याग करणारा सीताराम वखारीत काम मिळताच सर्वप्रथम
देवालाच हात जोडतो. परिस्थिती आणि संस्कार यांत अडकलेल्या सीतारामचं अंतर्द्वंद्व इथे
रेखाटलेले आहे. तर ‘एखादा दिवस’ ही कथा एकाकी जीवन जगणाऱ्या ताराबाईच्या मनात
पुरुष जातीबद्दल असणाऱ्या भीतीचं चित्र उभी करते. एकप्रकारे शिरवाडकर
स्त्रियांच्या मनात असलेली वासनांध पुरुषांविषयीची भीतीच सूचित करतात. ‘हिरवा मफलर’
या कथेतून त्यांनी योगायोगावर आधारित गूढरम्यता साधली आहे. त्याचप्रमाणे
स्त्रीमनाचा वेधही घेतला आहे. आपल्या पतीच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांच्या
मृत्यूची कामना करणारी आणि आपण आजारातून उठणार नाही याची जाणीव झाल्यावर आत्मार्पण
करणारी नायिका इथे भेटते. तर ‘मृगनक्षत्र’ ही कथा मोलमजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या
अन कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यनंतर उदर्निर्वाहासाठी परपुरुषाकडे राहण्याचा
निर्णय घेणाऱ्या शांतेची आहे. एकीकडे समाजातील या निम्नस्तरात जगणाऱ्या स्त्रियांची
अवस्था ही पाठीमागे पारधी अन् पोटात बाण लागलेल्या मृगनक्षत्रप्रमाणे असते हे
दाखवतानाच लेखक निस्वार्थ बुद्धीने शांतेला मदत करणारा नायकही चितारतो. यातूनच
शिरवाडकरांची आशावादी वृत्ती दिसून येते. तर ‘पाचोळा’ ही कथा नव्या विभक्त कुटुंबव्यवस्थेतील
वृद्धांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकते. त्यांची ‘विश्वनाथ - एक शिंपी’ ही कथा नव्या
तंत्रज्ञानामुळे पारंपारिक व्यावसायिकांवर ओढवलेलं संकट चित्रित करते. काळाबरोबर
चलन विसरलेले वृद्ध व्यावसायिक अखेर नवे तंत्रज्ञान समजून घेऊ शकत नाहीत आणि
त्यांच्या धंद्याची कशी वाताहत होते हे दाखवत असतानाच लेखकाने काळाची चाहूल
ओळखण्याचा सुद्न्य सल्लाही देतो. या कथासंग्रहाची शीर्षक कथा
‘सतारीचे बोल’ शिरवाडकरांच्या कल्पकतेची साक्ष देते. वास्तविक सतारीचे बोल ही
केशवसुतांची प्रसिद्ध कविता, त्या अनुषंगाने केशवसुतांच्या कविमनाचा मागोवा
घेण्याचा लेखकाचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. शिरवाडकर स्वतः कवी असल्याने
कवीच्या जाणीवा, त्याचे अनुभूतीविश्व त्यांनी कल्पकतेने चितारलेले आहे त्यासोबतच
त्यांनी अरसिक लोकांची मानसिकता, असूयेतून होणारी कवीची अवहेलना, कवीची आर्थिक
ओढाताण आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहिलेले कवीचे संवेदनशील मन टिपले
आहे.
अनुभवविश्वाच्या
विविधतेसोबतच या कथासंग्रहाचे इतरही विशेष सांगता येतील. शिरवाडकर स्वतः कवी असले
तरी कथेतील निवेदनात त्यांनी काव्यात्मतेवर योग्य संयम ठेवला आहे. प्रेमभावना आणि
भावनिक गुंतागुंत जिथे निर्माण झाली आहे; तिथेच त्यांची भाषा काव्यात्म झाली आहे.
उदा: आमराईतील रंभा. तर गूढ आणि नाट्यमय कथांमध्ये पुढे काय होऊ शकेल याची
तिळमात्र कल्पना ते वाचकांना देत नाहीत. त्यामुळे एखाद्या कोड्याची उकल करण्यासाठी
झगडावं त्याप्रमाणे वाचक त्या कथांशी एकरूप होतो. उदा: एक वाडा आणि दोन माणसे,
हिरवा मफलर. ‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ म्हणणारे शिरवाडकर आपल्या कथांतून
अशा कणा शाबूत असलेल्या, संघर्ष करणाऱ्या माणसांचे आशादायी चित्रणही करतात. उदा:
दीडशे मैल दूर, भ भ भटजीचा, विश्वनाथ - एक शिंपी. तर अनेक कथातून त्यांनी
स्त्रीजीवनाचे विविध कंगोरे टिपण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूच ते कष्ट करणाऱ्या,
श्रीमंत जमीनदाराच्या वाड्यात घुसमटणाऱ्या , पतीप्रेमामुळे मत्सराने पेटणाऱ्या,
एकाकी जीवन जगणाऱ्या, वृद्ध परित्यक्ता अशा विविध वर्गातील स्त्रियांची चित्रणे
करतात. मात्र त्यांच्या कथांतूनही त्यांच्या कलावंत हृदयाची साक्ष पटते. त्याच्या
बहुतांश कथांतील नायक हे चित्रकार आहेत, कवी आहेत, त्यांना पाश्चात्य साहित्याची
आवड असल्याचे दिसते. तर सतारीचे बोल ही त्यांची संपूर्ण कथाच कवी केशवसुतांना
समर्पित आहे. त्यांच्या चिंतनशील मनाने कथांमधील योग्य ठिकाणी आपलं जीवन विषयक
तत्वज्ञान मांडले आहे. त्यांच्या कथांमध्ये कोणताही भडकपणा नाही कृत्रिम नाट्यात्मता
नाही, भारदस्त संवाद नाहीत, मात्र असे असूनही साध्याशा कथाबिजाद्वारे अत्यंत
साधेपणाने कथन केलेल्या या कथा वाचकांना भावतात. त्यांच्या कथेत कुठेही उद्रेक
नसला तरी त्या वाचकाला विचारप्रवण करतात. म्हणूनच त्यांचा सतारीचे बोल हा
कथासंग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे. आणि कथालेखानातही वि. वा. शिरवाडकर तितकेच
यशस्वी झाले आहेत एवढ मात्र नक्की !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा