शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

क्षण ...

फोडून अश्रुबांध
क्षण आलेत धावून
उद्ध्वस्त झालेल्या
मनाच्या गावाहून...
क्षण नाजूक साजूक
क्षण मोहक माहेर
क्षण सुंदर साजिरे
क्षण स्वप्नील आहेर...
क्षण बीभत्स भयाण
क्षण अवसेची रात
क्षण जहरी नागीण
जाई विष फुत्कारीत...
क्षण खुण कुणाची
गाठ आतल्या मनाची,
क्षण झालेत वेदना
भळभळत्या व्रणाची...
क्षण पाखरू पाखरू
तान घेई निवांती
देह झाला निश्चल
मन निष्पर्ण फांदी...
क्षण येती क्षण जाती
क्षण क्षणां रंगवती
सारे क्षणांचे सोबती
क्षणभर मनी रमती...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा