मला सतत जाणवत राहतं,
माझ्या आतलं तुझं अस्तित्व,
तुझं हसणं, तुझं रडणं,
तुझं वावरणं, तुझं धडपडणं,
बाहेर येण्यासाठी उचंबळणं,
अन् पुन्हा शांत होणं,
सारं काही आतल्या आत...
म्हणे तुझ्याकडे आहे
सूर्याला मात देणारी
दिव्यदृष्टी,
समुद्र तर पहिला असशीलच,
त्याच्या सारखीच आहेस तू,
कधी शांत तर कधी रौद्र,
तर तळाशी रत्नांची खाण
पण सारं काही आतल्या आत...
मला सतत जाणवत राहतं,
माझ्या आतलं तुझं अस्तित्व,
सतत खुपणारं, दुखणारं,
बेचैन करणारं,
खूप त्रास होतो तुझ्या असण्याचा,
अपराधी असल्यासारखं वाटतं,
वाटतं,
तुला बंदिस्त केलंय मी,
माझ्या मनात,
विचारात...
कधी कधी असह्य होतं हे
सारं,
नाही साहवत तुझा संघर्ष,
बाहेर पडण्याची तुझी दुर्दम्य
इच्छा जाणवते मला,
आणि देते धैर्य त्या नकोशा
वेणा साह्ण्याचे...
अन् मीही करते तयारी
तुझ्या जन्माची,
अगदी मनापासून,
मग अखेर संपते प्रतीक्षा...
एका विलक्षण अनुभूतीतून
अखेर सुटका होते माझी...
कागद समोर येतो
अन् लेखणी झरझर झरते,
कागद रंगतो आणि वाढत जातात
असह्य वेदना...
अखेर एक पूर्णविराम
अन् तुझा जन्म
माझ्या लेकीचा नवा अवतार
असतो माझ्यासमोर
माझी लेक
माझी कविता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा