शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

मराठीने मला काय दिलं?




माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
तिच्या संगे जागतील
मायदेशातील शिळा

कुसुमाग्रजांनी केलेला हा गौरव यथार्थच आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी हि केवळ बोली नसून तिनेच आजचा महाराष्ट्र घडवला आहे. मग ती महाराष्ट्राच्या आधुनिकतेला, समाजसुधारणेला कारणीभूत असणारी साहित्यिक चळवळ असो किंवा मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याकरिता उभी राहिलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो. मराठी भाषेने खऱ्या अर्थाने मायदेशातील शिळा जागवल्या. महाराष्ट्राला त्याच्या अस्मितेची जाणीव करून दिली. अनेक विद्यार्थ्यांची ती ज्ञानभाषा झाली. साहित्यिकांची स्त्रोतभाषा झाली. अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आणि साहित्यिक तिने भारतीय वाड्मयविश्वाला दिले. अशा या माझ्या मायमराठीने मलाही घडवले. माझ्या व्यक्तिमत्त्वावर उमटलेल्या तिच्या अमीट ठश्याची जाणीव मला कधी कधी प्रकर्षाने होते. अन् मग मी विचार करू लागते की, मला मराठीने नेमकं काय दिलं?
मराठीने मला काय दिलं या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. मात्र ती जितकी सोपी तितकीच कठीणदेखील आहेत. मुळातच परस्पर संवाद साधण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी समाजाने भाषेची निर्मिती केली. त्यायोगे मराठीने मला माझी भाषा दिली. मराठी भाषिक म्हणून ओळख दिली. एका प्राचीन आणि समृद्ध साहित्य संस्कृतीची वारस होण्याचा सन्मान दिला. मनातील अव्यक्त भावनांच्या प्रकटीकरणासाठी शब्द दिले. आपल्या विपुल शब्दभंडाराने शब्दांना शस्त्राचे सामर्थ्य दिले. मनाच्या निवांत पोकळीला विचारचक्राचे अनुष्ठान दिले. माझ्या मराठीने मला माझं मीपण दिले.
जन्माला येण्यापुर्वीच आईच्या गर्भसंस्कारातून माझ्यापर्यंत पोहोचली. आईने वाचलेली ज्ञानेश्वरी, दासबोध तिने माझ्या नसानसात भिनवले. जन्माला आल्यानंतर आई-बाबांच्या लाडिक बोलण्यातून, पेंगुळलेल्या कानांनी ऐकलेल्या अंगाईतून ती सतत कानात गुंजत राहिली. तिच्या अंगाईतून मी चांदोबा मामाचा चिरेबंदी वाडा पहिला. गोठ्यातली गाय पहिली. परसातली जाई पहिली. ताटातला मौ भात संपवताना तिच्या गोष्टीतले चिऊ काऊ आले. त्यांची शेणा-मेणाची घरं आली. मावळत्या दिनकरासोबत दिव्या दिव्या दिपत्कार म्हणत संस्कार करू लागली. अजाणत्या वयात इसापनीती आणि पंचतंत्रातून तिने मला व्यवहारज्ञान दिले. कधी बिरबल तर कधी तेनालीराम बनून तिने मला हजरजबाबीपणा शिकवला. प्रत्यक्ष जन्मदा देवकी तर मला घडवणारी माझी मराठी यशोदा ठरली. लहानग्या वयात माझ्या मराठीने मला आईची माया दिली. आजीचे संस्कार दिले.
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील अविस्मरणीय काळ म्हणजे शालेय जीवन. माझं सारं शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं. पर्यायाने मराठीने माझं सारं जीवनच व्यापून टाकलं. लोकमान्य टिळक म्हणतात की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिले गेले तर विद्यार्थ्यांना त्याचे चांगल्याप्रकारे आकलन होऊ शकते. अगदी त्याचप्रमाणे मराठीने माझ्या अभ्यासाचा पाया मजबूत केला. तिने मला सोप्या भाषेत गणित, विज्ञान शिकवलं. इतिहासाची जाण दिली. भूगोलाची सफर घडवली. बालभारतीच्या पुस्तकाशी तर माझी गट्टीच होती. त्यातील कमल धरण बघ पासून सुरु झालेला प्रवास श्यामच्या आईच्या ओचल्यातून पार विनोबांच्या दारातील फणसापर्यंत फारच रंजक होत गेला. या काळात मी कधी सानुली मंद झुळूक झाले तर कधी आजीजवळचे चमत्कारीक घड्याळ शोधले. या काळात मराठीने माझी अनेक व्यक्तींशी भेट घडवून आणली. अगदी म्हाइंभट, महदंबा, मुकुंदराज, ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, तुकाराम, नामदेव, मुक्ताई. जनाई अशा अनेक संत, पंत मंडळींनी मनात अध्यात्मिकता रुजवली. कथा, कविता, प्रवासवर्णने, नाटके, ललितलेख असे अनेक साहित्यप्रकार मी अभ्यासले. त्यातून मी अनेक गावे पहिली. विविध देशांना भेटी दिल्या.
शालेय जीवनात माझ्या मराठीने मला वाचनाचा वसा दिला. कधीही न पाहिलेल्या, न कल्पिलेल्या अनेक अमूर्त कल्पनांचे शब्दचित्र माझ्यासमोर उभे केले. पुढे महाविद्यालयीन जीवन जगतानाही तीच माझी सखी झाली. आंबेडकर, फुले यांच्या साहित्यातून ती मला सामोरी आली. माझ्या विचारांची एक समृध्द बैठक तिने निर्माण केली. कधी सावरकरांच्या तर कधी खांडेकरांच्या साहित्यातून ती डोकावली. कवितांच्या रूपाने ती माझी प्रेयसी झाली. वैचारिक लेखनातून बाप झाली. अभंगवाणीतून माय झाली. वक्तृत्वासाठी उभी राहताना ती माझा सखा बनली. तिची प्रचंड ग्रंथसंपदा पाहताना मला सतत जाणवत राहिलं, मला अजून खूप शिकायचंय. खूप वाचायचंय. तिच्यातील या ग्रंथसंपदेने माझ्या अहंकारावर अंकुश ठेवला. मराठीचा अभ्यास करताना मी विविध वाङ्मय प्रवाह अभ्यासले. त्यातून समाजातील अनेक समस्या माझ्या समोर आल्या. मराठीतील या साहित्य प्रवाहांनी मला कोणत्याही घटनेकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी दिली.
मराठीने माझ्या मनात संवेदनशीलता रुजवली. मला सृजनाचं दान दिलं. संवेदनशीलतेला काव्याचा अंकुर फुटला. मीही कविता करू लागले. माझ्या कवितांना मी जन्म दिला. जणू मराठीनेच मला हे मातृत्व दिलं. मराठीवरील प्रभुत्वामुळेच मी अनेक स्पर्धेत यश मिळवू शकले. मराठीनेच मला ओळख दिली. मराठीनेच मला माझ्यातली मीदिली. आणि म्हणूनच मनापासून म्हणावंस वाटतं,
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...






मराठी दिनानिमित्त आयोजित निबंधलेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता  निबंध.
दै. प्रहार - २८ फेब्रुवारी २०१३ - मराठी राजभाषा दिन विशेषांकात प्रकाशित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा