केदारनाथ सिंह यांच्या कविता : मी केलेले अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
केदारनाथ सिंह यांच्या कविता : मी केलेले अनुवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

त्या शहरात जे बकुळीचं झाड आहे...



त्या शहरात जे बकुळीचं झाड आहे
कुठेतरी त्याच्याच आजूबाजूला
राहत असे एक स्त्री
जिच्यावर मी प्रेम करतो
त्या शहरात राहायचे इतरही अनेक लोक
जे वैशाखाच्या या वणव्यात
मला तितकेच आठवतात
जितकं आठवतं ते बकुळीचं झाड ...

पण आता ते शहर कुठे आहे
तुम्ही विचारलंत तर मी सांगू  शकणार नाही
तिथवर घेऊन जातो कोणता रस्ता
मला काहीच आठवत नाही
मी खात्रीने हेही सांगू शकणार नाही
कि ती स्त्री
जिच्यावर मी अजूनही - अजूनही प्रेम करतो
कधी कुठल्या शहरात राहत होती की नाही.
पण हे नक्की आहे
कि मी तिच्यावर प्रेम प्रेम करतो.

मी या दुनियेवर
एका पुरुषाच्या सर्व वासनांसह
यांमुळे प्रेम करतो
कारण मी प्रेम करतो
एका स्त्रीवर...



शनिवार, ६ डिसेंबर, २०१४

सुखी माणूस



आज तो रडला

हा विचार करत कि रडणं

किती हास्यास्पद

तो रडला...

वातावरण चांगलं होतं

ऊन पसरलं होतं

सारं काही ठीकठाक

सारं काही व्यवस्थित

फक्त खिडकी उघडताच

गजांतून दिसलं

जरासं आकाश

आणि तो रडला.

जशी हिंस्र श्वापद रडतात

त्यांच्या गुहेत

तो रडला...


गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

ये


ये
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा
जेव्हा वेळ न मिळेल
तेव्हाही ये

ये
जसं हातांत
नृत्याचं चैतन्य येतं
जसं धमन्यांमध्ये
वहातं रक्त
जशी चुलीमध्ये
हळूहळू वाढत जाते धग
तशी ये...

ये
जसे पावसात
बाभळीला फुटतात
नवे नवे काटे
दिवसांची चीरफाड
आणि वचनांची लक्तरं करत ये...

ये जसा मंगळवार नंतर
येत असतो बुधवार
तशी ये...

लयभंग


जेव्हा सकाळी सकाळी सूर्य पेटवतो
आपल्या भट्टी
आणि माणूस आपली विडी
हे किती विचित्र आहे कि दोघांनाही माहित नाही
कि हा खरंतर बेचैन प्रयत्न आहे
त्या संवादाला पुन्हा सुरु करण्याचा
जो एका संध्याकाळी चालता चालता
युगांपूर्वी कधीतरी भर रस्त्यात
तुटला होता...

हे माझ्या उदास पृथ्वी


घोड्याला हवे असतात हरभरे
भ्रमराला हवे असते फुल
टिटवीला चमकतं पाणी
विंचवाला विष
आणि मला ?
गाईला हवं वासरू
वासराला दूध
दूधाला वाटी
वाटीला चंद्र
आणि मला ?
मुखवट्याला चेहरा
चेहऱ्याला लपण्याची जागा
डोळ्यांना डोळे
हातांना हात
आणि मला ?
हे माझ्या परिवलणाऱ्या
उदास पृथ्वी
मला फक्त तू
तू आणि तूच...

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

योगायोगाने

मी एके दिवशी रस्त्यावर
एका माणसाला पाहिलं
आणि मला वाटलं, मी याला ओळखतो.

‘चूक’ – माझं मन म्हणालं.
‘तू याला माही ओळखत.’

ओळखतो – मी म्हणालो
हा तोच माणूस आहे
जो मला ट्रेनमध्ये भेटला होता.

‘एकदम चूक’ – माझं मन पुन्हा म्हणालं
‘हा तो नाहीये.’

आहे
नाही आहे –
मी खुप वेळ विचार करत राहिलो
तेवढ्यात मी पाहिलं
त्याच्या उन्हाने भरलेल्या चेहऱ्यावर तो चिकट द्रव
जो माणसाला वृक्षांपासून विलग करतो.

तोच – तोच –
हा तोच माणूस आहे –
मी स्वतःला सांगितलं
आणि अनेक दिवसांनतर
मला एवढा आनंद झाला
ज्याबाबत पुस्तकात
मी कुठेच काही वाचलेले नाही....




नव्या दिवसासोबत

नव्या दिवसासोबत
एक कोरं पान उघडलं
आपल्या प्रेमाचं

सकाळी,
यावर कुठेतरी आपलं नाव तरी लिहून जा...

अनेक अपशकुनी पानांमध्ये
यालाही कुठेतरी ठेवून देईन
आणि जेव्हा जेव्हा वारा येऊन
उडवेल अचानक बंद पानांना
कुठेतरी आत
मोरपिसाप्रमाणे ठेवलेलं ते नाव

वाचेन प्रत्येकवेळी.

खोलीतला दानव



घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
पाहवत नाही...

आजही उभा आहे तो
माझ्या दाराशी माझी वाट पाहत
मोठ्या मोठ्या पंखांचा खोलीतला दानव

फुलं कधी उमलतात
सण कधी येतात
अचानक वातावरण केव्हा बदलतं
त्याला सर्व माहित आहे.

म्हणून कधी काही विचारत नाही
जेव्हा मी बाहेरून येतो
गुपचूप आपले क्षत-विक्षत पंख उचलून
मला जागा देतो.

जणू तो सांगतो :
‘आता खूप थकलायस तू,
वीर योद्ध्या विश्राम कर.’

संध्याकाळच्या धुंदीत
उठणारे माझे हात
बांधले जातात.
कधी कधी त्याच्या खोल निळ्या डोळ्यांतून
करुणा बरसते
आणि मला वाटतं
याच्याशी काय लढायचं?

आणि कधी असंही होतं
परतताना वाटेत
निश्चय करतो
आज जाऊन त्याला आव्हान देईन
लढेन
पराभूत करेन
त्याचे काळे काळे पंख छाटून टाकेन

पण जेव्हा परततो
त्याला पाहतो त्याचप्रकारे
माझी वाट पाहत दारात उभा तो
खोलीतला दानव
अनिमिष, उदास.
माझ्या हातातून निसटतो संकल्प
घाबरत नाही
पण जेव्हा त्याला पाहतो
गुपचूप, अनिमिष, उदास

पाहवत नाही...

वसंत



आणि वसंत परत येतोय
शाकुंतलाचं एक पान
माझ्या कपाटातून निघून
वाऱ्यावर तरंगत आहे
तरंगत आहे कि उठावं
आणि आजूबाजूला पसरलेल्या वस्तूंच्या कानात
सांगावं ‘नाही’
एक दृढ
आणि छोटंस नाही
जे साऱ्या आवाजांच्या विरुद्ध
माझ्या उरात सुरक्षित आहे.

मी उठतो
दारापर्यंत जातो
शहराकडे पाहतो
हलवतो हात
आणि जोरात ओरडतो
नाही नाही नाही
मी अस्वस्थ आहे
मी किती वर्ष गमावली
रुळावरून चालत
आणि जगाला म्हणत

हो, हो, हो...

शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

मी गंगेला पाहिलं



मी गंगेला पाहिलं
एका दीर्घ प्रवासानंतर
जेव्हा माझे डोळे
काहीही पाहण्यासाठी आतुर होते
जेव्हा माझ्याकडे काहीही काम नव्हतं
मी गंगेला पाहिलं
उष्माघाताच्या प्रचंड प्रहरानंतर
जेव्हा एका संध्याकाळी
मला उभारी आणि तजेल्याची
आत्यंतिक गरज होती
मी गंगेला पाहिलं, एक रोहू मासा होता
डबडबलेल्या डोळ्यांत
जिथे जीवनाची अपार लालसा होती
मी गंगेला पाहिलं जिथे एक म्हातारा नावाडी
वाळूत उभा होता
घरी जाण्याच्या तयारीत
आणि मी पाहिलं –
म्हातारा खुश होता
वर्षाच्या त्या सर्वात उदास दिवसातही
मला नवल वाटलं हे पाहून
कि गंगेच्या पाण्यात किती लांब
आणि अप्रतिम वाटतं
एका म्हाताऱ्या माणसाच्या खुश असण्याचं प्रतिबिंब...

आता म्हातारा जरा चुळबुळला
त्याने आपलं जाळ उचललं
खांद्यावर ठेवलं
एकवार पुन्हा गंगेकडे पाहिलं
आणि हसला
हे एका वृद्ध नावाड्याचे हास्य होते
ज्यात कोणताच पश्चात्ताप नव्हता
जर होती तर ती एक प्रामाणिक
आणि मनःपूर्वक कृतज्ञता
वाहणाऱ्या चंचल पाण्याप्रती
जणूकाही त्याचे डोळे म्हणत आहेत –
“आता झाली आहे सांज
गंगामाई
राम राम...”



शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

आवाज



गप्प राहून काही फायदा नाही
मी मित्रांना म्हणालो आणो धावलो
सरळ शेतांच्या दिशेने
कि शब्द पिकले तर नाहीत ना?

ही दुपारची वेळ होती
आणि शब्द झाडांच्या मुळाशी झोपले होते
सुगंध इथूनच येत होता – मी म्हणालो
इथे – इथे – शब्द इथेच असू शकतो
मुळाशी.

पिकणाऱ्या दाण्यांच्या आत
शब्दाच्या असण्याची पूर्ण शक्यता होती

मला वाटलं मला एखाद्या दाण्याच्या आत
घुसलं पाहिजे
दळण्यापूर्वीच मला पोहोचलं पाहिजे
पिठाच्या सुरवातीला
मला असलं पाहिजे या क्षणी
जिथून
गाण्याचे आवाज येत आहेत.

हा आईचा आवाज आहे – मी म्हणालो.
जात्यामध्ये आई होती.

दगडांच्या घर्षणातून आणि पिठाच्या सुगंधातून
हळूहळू पाझरत होता
आईचा आवाज
मग मी झोपलो
कधी कुठे मला आठवत नाही.

फक्त जातं फिरत राहिलं
आणि आईचा आवाज येत राहिला
रात्रभर...


मूळ कविता : आवाज
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कडूनिंब



शेतं जागी झाली होती
पानांवर चढत होती चैत्राच्या सुरवातीची
हलकी हलकी लाली
म्हटलं, ऋतू चांगला आहे
तोडून आणाव्या कडूनिंबाच्या तीन-चार
हिरव्या हिरव्या डहाळ्या

मी तर त्यांना विसरूनच गेलो होतो
पण माझ्या दातांना त्यांची अजूनही
खूप आठवण येत होती.

मग चालू पडलो एकटाच
ओळखीच्या कुंपणाना आणि पायवाटांना
ओलांडत – उड्या मारत
पोहोचलो गावातल्या त्या उंच टेकडीवर
जिथे उभा होता तो न जाणो किती वर्षांपासून
तो घनदाट कडूनिंबाचा वृक्ष
थांबलो,
काहीक्षण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं
आणि मग वाकवली एक फांदी
ओढली एक छोटीशी डहाळी
थरथरणारी डहाळी
तोडणारच होतो 
कि अचानक लक्ष गेलं झाडाखाली
अरे, हे कोण?
निंबाखाली बसलंय
डोळे मिटून.

पडलो विचारात
दातवण तोडू कि नको तोडू
पकडून राहू कि सोडून देऊ ती फांदी
जी माझ्या हातात होती.

शेवटी
ण जाणो काय आलं मनात
कि मी एका विचित्र वेदनेने
त्या दिशेने पाहिलं
जिथे बसला होता तो माणूस
आणि सोडून दिली ती निंबाची वाकलेली फांदी
मग परत आलो
रस्त्यात स्वतःशीच भांडत आणि स्वतःलाच समजावत
कि जर मी तोडल्या असत्या
काही हिरव्या नुकत्याच उगवत्या फांद्या
तर त्याचं काय झालं असतं
जो त्यांच्याच खाली बसला होता
त्यांच्या जादूत
बंद करून आपले डोळे...  




मूळ कविता : नीम
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

नाव नसलेली नदी



माझ्या गावाला भेदत
पहिल्या माणसाच्याही खूप आधीपासून
शांतपणे वाहत आहे ती अरुंद नदी
जिला कोणतंच नाव नाही...

तुम्ही पाहिलं आहे कधी
कशी वाटते नाव नसलेली नदी?

चिखल, शेवाळ आणि जलपर्णीने भरलेली
ती अशाचप्रकारे वाहतेय गेल्या कित्येक शतकांपासून
एका नावाच्या शोधात
माझ्या गावची नदी...

कुठे कुणाचा मृत्यू होतो
लोक उचलतात तिरडी
आणि नदी जिथे सर्वात जास्त शांत आणि एकटी असते
तिथेच आजूबाजूला करून येतात अंत्यसंस्कार...

जेव्हा मी लहान होतो तेव्हा नेहमी विचार करायचो
लोक ज्यांचे अंत्यसंस्कार करतात
त्याचं काय करते नदी...

सुर्योदयानंतर बऱ्याच वेळाने
येतात म्हैशी
नदीमध्ये अंघोळ करायला...

नदी कुठे खोलवर डचमळते पहिल्यांदाच
मग येतात झुम्मन मिया
हातात घेऊन जाळे आणि चारा...

नदीमधे पहिल्यांदाच एक चमक येते
जणू नदी ओळखते झुम्मन मियाला...

मग सूर्यास्तापर्यंत
जिथल्या तिथे
जाळे लावून
एकटक बसून राहतात झुम्मन मिया...

दिवसभरात किती मासे
अडकत असतील त्यांच्या जाळ्यात?
किती झींगे किती चिखल
पाण्यातून उसळून येत असेल
त्यांच्या थैलीमध्ये
कुणालाच माहित नाही...

नदीला कोण देतं नाव
तुम्ही कधी विचार केलाय?

कि सकाळपासून संध्याकाळपर्यंत
नदीच्या काठावर
नदीसाठी नावाच्या शोधात
एकटक बसून राहतात झुम्मन मिया?





मूळ कविता : बिना नाम की नदी
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी