शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

शिवकालीन मराठी साहित्याची सांप्रदायिक पार्श्वभूमी

आधुनिक भारतीय भाषांच्या उदयकाळापर्यंत भारतात निरनिराळे भक्तीसंप्रदाय उदयास आले होते. महाराष्ट्राच्या आधुनिक जीवनाची जडणघडण करणारे अनेकविध संप्रदाय होऊन गेले, या संप्रदायांच्या प्रेरणेतून मध्ययुगीन मराठी वाड्मयाची निर्मिती कसकशी होत गेली ते पाहणे महत्त्वाचे ठरते.
१)      नाथ संप्रदाय :
मध्ययुगीन महाराष्ट्रातील धर्मसाधनेवर नाथसंप्रदायाचा सर्वाधिक प्रभाव पडलेला दिसून येतो. हा संप्रदाय उपासना पंथाची गंगोत्री मानला जातो. हा संप्रदाय पुढे इतर संप्रदायात (महानुभाव, वारकरी आणि वीरशैव) विलीन झाला. यात पुढे मुस्लीम, जोशी, विणकर, जुगी, कोके, पीर, कानफाटे अशा जाती निर्माण झाल्या. या संप्रदायाने देशी भाषांचा पुरस्कार केला. त्यासाठी वाड्मयनिर्मिती केली. मध्ययुगीन भारतीय साधनामार्गातील विकृत आचरणाविरुद्ध आंदोलन उभारून अखिल भारतात योगाधिष्ठित शुद्ध परमार्थमार्गाचा आदर्श निर्माण करणाऱ्या नाथ संप्रदायाला उत्तरकाळात मात्र विकृत आणि चैतन्यहीन स्वरूप प्राप्त झाले. मात्र हेही खरे की चक्रधर, ज्ञानेश्वर काही दत्त सांप्रदायिक आणि रामदास या सर्वांच्या कार्याला नाथ सांप्रदायिक उदात्त विचारांची प्रेरणा मिळालेली दिसून येते.

२)      महानुभाव पंथ
चक्रधरांनी स्थापन केलेल्या या पंथाचे ‘सर्वसामान्य जनतेला विकासाचा मार्ग मोकळा करून देणे’ हे उद्दिष्ठ होते. ज्ञान आणि भक्ती या दोन विशुद्ध तत्वांच्या पायावर चक्रधरांनी आपल्या संप्रदायाची स्थापना केली. नाथ संप्रदायातून विशुद्धाचरणाचे महत्त्व, समत्वदृष्टी, जनसाधारणाच्या उन्नतीसाठी लोकभाषेचा पुरस्कार इ. गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. पंथनिष्ठेतून विपुल महानुभाव वाड्मय निर्माण झाले. बलवत्तर आणि अत्यंत काटेकोर सांप्रदायिक प्रेरणेतून वाड्मयनिर्मिती झाली. त्यात महानुभाव संप्रदायातील महापुरुषांची चरित्रे, पंथीय तत्वज्ञान आणि आचारधर्म सांगणारे ग्रंथ, टीका, क्षेत्रवर्णनपर ग्रंथ, विविध स्तोत्रे, आणि विदग्ध कथाकाव्ये, हे विविध वाड्मयप्रकार त्यांनी समृद्ध केले. या वाड्मयात पुढे प्रक्षिप्तता येऊ नये म्हणून पुढे ते सकळ आणि सुंदर लिप्यांमध्ये बंदिस्त करण्यात आले. पुढे या लिप्या इतिहासाचार्य राजवाडेंनी आत्मसात केल्या व ही ग्रंथसंपदा सर्वांपुढे खुली झाली.

३)      दत्त संप्रदाय
दत्तोपासना ही प्राचीन असली तरी महाराष्ट्रात तिला सांप्रदायिक रूप प्राप्त झाले ते चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वतींच्या अवतारकार्यातून. शके १४६० च्या सुमारास सरस्वती गंगाधराने ‘गुरुचरित्र’ लिहून या संप्रदायाची माहिती एकत्र केली. हा ग्रंथ आजही वेदतुल्य मानला जातो. तत्कालीन सांस्कृतिक जीवनाची माहिती देणारा ग्रंथ या दृष्टीने गुरुचरित्र या ग्रंथाचे महत्त्व असाधारण आहे. मुसलमानी आमदानीत  हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यांवर राज्यकर्त्यांची वक्रदृष्टी असताना या संस्था टिकवून धरण्यासाठी जे संघटीत प्रयत्न झाले त्यात दत्त संप्रदायाचा मोठा वाटा आहे. वेदोक्त आणि आगमोक्त आचाराचे संमिश्रण या पंथाच्या आचरणधर्मात दिसून येते. या पंथातील कर्मठपणाही परधर्माच्या आक्रमणापासून समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वीकारण्यात आला असावा. सगुण मूर्तीऐवजी निर्गुण पादुका किंवा समाधीस्थाने हा देखील देवळांचा उच्छेद करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या प्रयत्नास तोंड देण्यासाठी स्वीकारलेला मार्ग असावा.

४)      भागवत / वारकरी संप्रदाय
संस्कृतीरक्षणाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पंथोपंथात अग्रपूजेचा मान भागवत संप्रदायाला द्यावा लागतो. या संप्रदायाने एकांतिक भक्तीचा पुरस्कार केलेला नाही. केवळ मोक्षप्राप्ती हे उद्दिष्ठ मानले नाही. विठ्ठल हे या संप्रदायाचे आराध्यदैवत. ‘कर्मे इषु भजावा’ या सूत्राचा त्यांनी अवलंब केला. पहिली अवस्था ज्ञानेश्वर, नामदेव दुसरी एकनाथ आणि तिसरी अवस्था येते ती १६२५ ते १६८० हा कालखंड व्यापणारी आहे. तुकाराम आणि रामदासांच्या प्रभावाचा आणि स्वराज्याच्या उदय-विकासाचा हा काळ आहे. अध्यात्मसाधनेत समर्थांनी वारकरी संप्रदायापेक्षा निराळी भूमिका स्वीकारली आहे असे मानण्यास आधार मिळत नाही. संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या व्यक्तीवैशिष्ठ्यानुरूप भागवत संप्रदायाचा अविष्कार या कळत झाला असं म्हणता येईल. या काळातील आनंद आणि चैतन्य हे दोन्ही संप्रदाय वारकरी संप्रदायाचे अंगभूत उपपंथ म्हणूनच वाढले. संत तुकारामांना चैतन्यवादी गुरूंचा अनुग्रह झाला होता.

५)      समर्थ संप्रदाय
लोकसंस्थेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विवेकाधिष्ठीत अशी रामदासी परंपरा निर्माण करून समर्थ रामदासांनी सकल महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात एकप्रकारचे नवचैतन्य निर्माण केले. स्व-काल परिस्थितीच्या संदर्भात समर्थांना ‘इह’ आणि ‘पर’ अशा दोन्ही निष्ठांचा समन्वय करणाऱ्या एका निराळ्या संप्रदायाची आवश्यकता वाटली.  लोकसंस्थेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी देवधर्म, राजधर्म,क्षात्रधर्म इ. संकल्पनांना ‘स्वधर्म’ या विशाल संकल्पनेत समाविष्ठ करून त्यांनी रामोपासनेबरोबर राजकारणाचा, प्रपंचाबरोबर परमार्थाचा आणि भक्तीबरोबर शक्तीच्या उपासनेचा दिव्य संदेश दिला.
तत्कालीन समाजजीवनाची ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टींनी नीतिमत्ता ढासळलेली होती. पण समर्थांनी या वस्तुस्थितीविषयी केवळ दुबळा असंतोष व्यक्त केला नाही तर सामाजिक जीवनाची घडी बसविण्यास समर्थ असलेले सज्जन धुंडाळले; त्यांच्यात दीर्घ तपश्चर्या, अवलोकन, पर्यटन, भजन, आणि परमार्थचिंतन यांच्या योगे आत्मविश्वास निर्माण केला त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्राबाहेर मठ स्थापून दिले. आपल्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार करण्यास नेमले. अशाप्रकारे काळाची पावले ओळखून संतत्वाबरोबर ऐहिकाचा उत्कर्ष साधणाऱ्या गुणांनी मंडित असलेल्या महंतांची परंपरा निर्माण करण्याचे समर्थांचे कार्य अभूतपूर्व होते.
शिवाजी महाराजांनी स्वराज्य-स्थापनेच्या कार्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता जागृत करून सर्व समाज सुसंघटीत करण्याचे जे कार्य आरंभिले होते, त्यास समर्थांनी जोपासलेली सर्वस्वी अनुकूल अशी मनोवृत्ती आणि सामाजिक जीवनाची नैतिक परीशुद्धी निःसंशय पोषक ठरली.
समर्थांच्या एकूण विचारसरणीतून व्यक्त होणारी सामाजिक जाणीव देवधर्माच्या अराजकतेपुरती मर्यादित नव्हती तर राजकीय दुःस्थितीपासून कौटुंबिक, सामाजिक व्यवहारधर्मापर्यंत दैनंदिन लोकजीवनाची काळजी वाहणारी विशाल आणि व्यापक होती.

६)      सुफी संप्रदाय
यादवी अस्तापासून शिवशाहीच्या उदयापर्यंत सुमारे ४०० वर्ष महाराष्ट्रात मुसलमानी सत्ता नांदत होती. या प्रदीर्घ काळात सूफी या इस्लाममधील एका संप्रदायाने महाराष्ट्रात आपले धर्मप्रसाराचे जाळे विणले होते. या सुफींत प्रेममूलक भक्तिमार्गाचा अवलंब करणारे अध्यात्मिक सूफी कमी होते. करामती दाखवून भोळ्या असहायितांना भुलविणारे सूफी अधिक होते. समर्थपूर्व आणि समर्थकळत या सुफिंनी कसा धुमाकूळ घातला याची चित्राने तत्कालीन साहित्यात उमटलेली दिसतात. खरेतर हा इस्लाममधील एक भक्तीसंप्रदाय असून त्याचा उगम इराणमधे झाला. इ. स. ११व्या शतकात सूफी भारतात आले. कर्मठ इस्लामने या पंथास दीर्घकाळ राजरोस मान्यता दिली नाही. यांत परब्रह्म ही प्रेयसी आणि जीव हा प्रियकर मानतात. यांत १) चिश्ती २) सुहरावर्दी ३) कादरी ४) नक्शबंदी हे संप्रदाय आहेत. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतीय भाषांचा अवलंब केला. तत्कालीन राजकीय पाठबळ असल्याने सुफींना हिंदू साधूसंतांच्या स्थानांचे दर्ग्यात रुपांतर करणे सहजशक्य झाले. राजाश्रय आणि भाबड्यांचा लोकाश्रय यांच्या बळावर पीर-फाकीरांची बरीच स्थाने या काळात ऊर्जितावस्थेस आली.

याशिवाय वीरशैव संप्रदाय, जैन संप्रदाय यांनीही आपल्या विविध लेखनातून मराठी ग्रंथवाड्मय समृद्ध केले. महिकावतीच्या बखरीत ज्या महाराष्ट्रधर्माचा ध्यास धरला गेला, समर्थांनी ज्याच्या ध्येयवादाचा पुरस्कार केला तो महाराष्ट्रधर्म अत्यंत प्रतिकूल काळात महाराष्ट्रातील साधुसंतांनी जोपासला. परकीयांच्या राजकीय आणि धार्मिक आक्रमणांनी खचून न जाता, अनुकूल काळाची वाट पाहत महाराष्ट्र स्वतःचे सत्वरक्षण करत राहिला तो या महाराष्ट्रधर्माच्या आधारावरच. त्यांची तपस्या फळास आली आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेने महाराष्ट्रधर्म कृतार्थ झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा