शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

दिल तो बच्चा है जी......


आज १४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिन. म्हणजे खरंच हा केवळ लहान मुलांचा दिवस आहे का? आणि हा फक्त लहान मुलांचा दिवस असेल तर आपण मोठे झालो आहोत की. मग आपल्यासाठी हा दिवस असला काय किंवा नसला काय, सारखंच. हो कि नाही?

हम्म. कोडं उलगडत नाही. आपण उंचीने वाढलो, शिक्षण संपवलं किंवा मग वय वाढलं म्हणजे आपलं बालपण संपतं का? मला वाटतं नाही. आपल्यातलं लहान मुल तसंच असतं, त्यालाही मोठमोठ्याने हसायला आवडतं, बागडायला आवडतं. पण आपणच मग आपल्यातलं लहानपण लपवू पाहतो. पोक्तपणे वागू पाहतो. पण कशासाठी? केवळ इतरांनी आपल्याला हसू नये म्हणून? स्वतःतल्या स्वतःला किती दडपणार आहोत आपण?

Be Yourself... हे काय फक्त फेसबुक आणि व्हॉटसपवर स्टेटस् ठेवण्यासाठी आहे का? मी माझं आयुष्य माझ्यापरीने जगते, कधी ठेचकाळते, कधी पडते, धडपडते. पण त्याचा दोष इतरांना देत नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात इतरांसाठी मी भले अपयशी असेन, पण माझ्यासाठी तरी मी स्वतःला जिंकलंय. माझ्यासाठी इतकंही पुरेसं आहे.

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. ज्यांना आपलं मानलं त्यांनी जिव्हारी वार केले मात्र तरी मी जिवंतआहे. मला अजूनही हसता येतं, रडता येतं, आनंद होतो आणि रागही येतो. मला चुकीच्या गोष्टींची चीड येते, मी अन्यायाचा प्रतिकार करते, आणि एवढ्या साऱ्या धुमश्चक्रीत मी रोज काहीतरी नवीन लिहिते. माझ्या मनातली ओल या संवेदनशीलतेच्या दुष्काळात अजूनही तगून आहे.


लोक खुशाल माझी थट्टा करोत, मी मनावर घेत नाही. हो, मी मोठ्याने बोलते, कारण दबक्या आवाजात कुटाळक्या करणं मला जमत नाही. हो, मी धावल्यासारखी चालते, कारण सावकाश चालण्याइतका फावला वेळ माझ्याकडे नसतो. हो, मी फार मोठ्याने हसते, कारण जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याची माझ्यामधे उर्मी आहे. हो, आजचा बालदिवस माझाच आहे. कारण दिल तो बच्चा है जी......


ध्वनिचित्रफित PaperBoat यांच्याकडून साभार...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा