शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

मी गंगेला पाहिलं



मी गंगेला पाहिलं
एका दीर्घ प्रवासानंतर
जेव्हा माझे डोळे
काहीही पाहण्यासाठी आतुर होते
जेव्हा माझ्याकडे काहीही काम नव्हतं
मी गंगेला पाहिलं
उष्माघाताच्या प्रचंड प्रहरानंतर
जेव्हा एका संध्याकाळी
मला उभारी आणि तजेल्याची
आत्यंतिक गरज होती
मी गंगेला पाहिलं, एक रोहू मासा होता
डबडबलेल्या डोळ्यांत
जिथे जीवनाची अपार लालसा होती
मी गंगेला पाहिलं जिथे एक म्हातारा नावाडी
वाळूत उभा होता
घरी जाण्याच्या तयारीत
आणि मी पाहिलं –
म्हातारा खुश होता
वर्षाच्या त्या सर्वात उदास दिवसातही
मला नवल वाटलं हे पाहून
कि गंगेच्या पाण्यात किती लांब
आणि अप्रतिम वाटतं
एका म्हाताऱ्या माणसाच्या खुश असण्याचं प्रतिबिंब...

आता म्हातारा जरा चुळबुळला
त्याने आपलं जाळ उचललं
खांद्यावर ठेवलं
एकवार पुन्हा गंगेकडे पाहिलं
आणि हसला
हे एका वृद्ध नावाड्याचे हास्य होते
ज्यात कोणताच पश्चात्ताप नव्हता
जर होती तर ती एक प्रामाणिक
आणि मनःपूर्वक कृतज्ञता
वाहणाऱ्या चंचल पाण्याप्रती
जणूकाही त्याचे डोळे म्हणत आहेत –
“आता झाली आहे सांज
गंगामाई
राम राम...”



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा