हरिवंशराय बच्चन
(२७ नोव्हेंबर १९०७− १८ जानेवारी २००३).
प्रसिध्द हिंदी कवी. जन्म अलाहाबाद येथे एका कायस्थ कुटुंबात. हरिवंशराय यांना
लहानपणी कौतुकाने सर्वजण बच्चन म्हणत आणि पुढे याच नावाने त्यांनी लेखनही केले.
त्यांच्या वडिलांचे नाव प्रतापनारायण. बच्चन यांचे आरंभीचे शिक्षण उर्दूतून झाले.
घरची गरिबी ; त्यामुळे शिक्षणात खूप अडथळे आले. १९२९ मध्ये अलाहाबाद
विद्यापीठातून ते पहिल्या वर्गात बी.ए. झाले. १९३८ मध्ये एम.ए. व १९३९ मध्ये बनारस
येथून ते बी.टी झाले. १९४२ पासून अलाहाबाद विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक
म्हणून ते काम करू लागले. डब्ल्यू. बी.येट्स (१८६५-१९३९) या प्रसिध्द आयरिश कवीवर
डब्ल्यू .बी. येट्स अँड ऑकल्टिझम ( १९६५-ग्रंथरूपाने प्रसिध्द) हा प्रबंध लिहून
त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच.डी. मिळविली (१९४५). १९५५ मध्ये अलाहाबाद
आकाशवाणीवर हिंदी विभागाचे निर्माता म्हणून त्यांनी काही काळ काम केले. भारत
सरकारच्या विदेश मंत्रालयात विशेष अधिकारी या नात्यानेही त्यांनी काम केले
(१९५५-५६). १९६६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच वर्षी
त्यांच्या चौंसठ रूसी कविताएँ या संग्रहास सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार. १९६८
मध्ये दो चट्टाने काव्यास साहित्य अकादेमी पुरस्कार, हिंदी साहित्य
संमेलनाकडून १९६८ मध्ये ‘साहित्य वाचस्पति’ ही सन्मान्य
उपाधी, १९७० मध्ये ॲफ्रो-आशियाई लेखक परिषदेकडून ‘लोटस पुरस्कार’ इ. पुरस्कार व
मानसन्मान त्यांना प्राप्त झालेत. सध्या त्यांचे वास्तव्य मुंबई येथे आहे. त्यांचा
मुलगा अमिताभ आणि त्यांची पत्नी जया भादुरी हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील
आघाडीचे कलावंत होत.
बच्चन यांचे मधुशाला (१९३५), मधुबाला (१९३६) मधुकलश (१९३७) हे काव्यसंग्रह
प्रसिध्द झाले आणि हिंदी काव्यातील ‘हालावादा’चा प्रवाह सुरू झाला. ते
हालावादी बनण्याचे मुख्य कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये सापडेत. प्रतिकूल
आर्थिक परिस्थितीशी लहानपणापासून करावा लागलेला झगडा, पहिल्या
पत्नीच्या क्षयाने झालेला मृत्यू यांसारखी कारणे त्यामागे आहेत. या व्यथित अवस्थेत
असतानाच एडवर्ड फिट्सजेरल्ड (१७६३-९८) यांनी अनुवादिलेल्या ⇨उमर खय्याम (सु.
१०४८–सु.११२३) यांच्या रूबायांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.
हालावाद भौतिक सुखवादाचा, मदिरा, व मदिराक्षी यांच्या
कैफात प्राप्तकाल जगण्याचा, निदर्शक आहे. ईश्वर, पुनर्जन्म, कर्मवाद, आध्यात्मिकता, पाप आणि पुण्य या
सर्व कल्पनांपुढे बच्चन यांनी प्रश्नचिन्हे उभी केली. मध्यम वर्गीय
सुशिक्षितांच्या मनातील ‘ध्येय की सुख?’, ‘कर्ममय जीवन की निष्क्रीय
सुखासीन जीवन?’, भौतिकता की आध्यात्मिकता ही सारी द्वंद्वे त्यांच्या
काव्यात व्यक्त झाली आहेत. काही वेळा सुखवादाला विरोधी अशी भूमिकाही त्यांनी घेतली
आहे. पुढे त्यांच्या वैयक्तीक जीवनात सुखमय परिवर्तने घडून आली आणि हालावादाच्या
प्रभावातून ते बाहेर पडले. त्यांच्या प्रेमगीतांतून नव्या आशा-आकांक्षेचे स्वर
उमटू लागले. त्यांच्या वैयक्तिक जीवनात द्वितीय पत्नीच्या आगमनामुळे भावनात्मक
स्थैर्य आले व नंतर आर्थिक सुबत्ताही आली. पुढे त्यांच्यावर महात्मा गांधीच्या
राजकीय कार्याचा प्रभावही पडला. निशा
निमंत्रण (९१३८) आणि एकांत संगीत (१९३९) यांसारख्या त्यांच्या
काव्यसंग्रहांतील विषादमयता जाऊन सतरंगिनी (१९४५) व मिलन यामिनी (१९५०) यांत
उल्हासित मनोवृत्ती प्रकट झाली आणि खादी के फूल (१९४८) सूत की माला (१९४८) या
काव्यसंग्रहांतून ती सामाजिकतेत परिणत झाली. बंगाल का अकाल (१९४६) मध्येच
त्यांच्या सामाजिक जागरूकतेचा प्रत्यय
येतो. पुढे चार खेये चौंसठ खूँट (१९६२) संग्रहात हिंदीतील प्रयोगवादी किंवा नवकवितेचा
प्रभावी त्यांनी आत्मसात केलेला दिसतो. बच्चनमध्ये घडून आलेली ही परिवर्तने
काव्याच्या दृष्टीने विकासदर्शक ठरली, असे मात्र म्हणता येणार नाही. वैयक्तिकतेकडून
सामाजिकतेकडे, रसानुगामी कवितेकडून बौध्दीक कवितेकडे, हजारो
श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सरळ व सरस अभिव्यक्ती सोडून केवळ सुजाण वाचकांना कदाचित
रूचू शकेल अशी कविता लिहिण्याकडे त्यांची झालेली वाटचाल त्यांच्या डोळस सामाजिक
जाणिवेची साक्ष मात्र देते.
दुर्बोध, अतिअंतर्मुख व अर्मूत ठरलेल्या छायावादी हिंदी कवितेला
कंटाळलेल्या वाचकांना व श्रोत्यांना आपल्या सरळ, सुबोध, परंतु सरस
काव्यरचनेने आणि विशेषतः व्यासपीठावरून आकर्षकपणे केलेल्या काव्यगायनाने त्यांनी
हजारो रसिकांना मोहून टाकले. काव्याची गोडी कायम राखली व वाढविलीही. संस्कृतप्रचुर
तसेच प्रतीकांच्या व प्रतिमांच्या बाहल्याने नटलेल्या शैलीचा त्याग करून
व्यावहारिक भाषेशी काव्याची पुन्हा जुळणी करून देण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक कार्य
त्यांनी केले. उर्दू शब्दकळा व लकबी यांचा खुबीदार उपयोग आपल्या हिंदी कवितेत
त्यांनी करून घेतला.
क्या मूलूँ क्या याद करूँ? या त्यांच्या आत्मचरित्राचे पहिले तीन भाग
प्रकाशितही झाले आहेत. (१९६९). हिंदीतील आत्मचरित्रांत बच्चन यांनी अतिशय मोलाची
भर घातली आहे.त्यांनी मॅक्बेथ (१९५८) व ऑथेल्लो यांचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे.
तसेच फिट्सजेरल्डकृत उमर खय्यामच्या रूबायांचाही हिंदी अनुवाद केला आहे.
भगवदगीतेचाही त्यांनी तुलसी रामायणाच्या धर्तीवर दोहा−चौपाई छंदात जनगीता नावाने
हिंदी अनुवाद केला.
त्यांच्या मधुशालाचे इंग्रजी भाषांतर आणि बंगाल का अकालचे बंगाली भाषांतर
प्रसिध्द झाले आहे.
संदर्भ : १. घोष, श्यामसुंदर, बच्चन का परवर्ती
काव्य, दिल्ली १९६७ .
२. जोशी, जीवन प्रकाश, बच्चन –व्यक्तिरथ और
कृतित्व, दिल्ली, १९६८.
३. दशरथ राज, हालावाद और बच्चन, पुणे. १९६३.
४. भटनागर, बाँके बिहारी, बच्चन व्यक्तित्व
और कृतित्व , दिल्ली. १९६४.
५. रमेश, बच्चन, निकषपर, दिल्ली. १९८०.
६. रणवीर, रांग्रा साहित्यिक
साक्षात्कार, दिल्ली. १९७८.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा