अवांतर काही... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अवांतर काही... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

असेच काही अवांतर १


इयत्ता सहावीत असताना पहिल्यांदाच इतिहासाच्या पुस्तकात कैलास मंदिराचं चित्र पाहिलं होतं. तेव्हापासून मनात वेरुळच्या लेण्या पाहण्याची इच्छा होती.आणि जेव्हा ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा मात्र आनंदापेक्षा अस्वस्थताच जास्त जाणवली. हजाराहून अधिक प्राचीन असलेल्या त्या लेण्यांतील तथागताच्या चेहऱ्यावर प्रेम, करुणा, शांती दिसलीच नाही मला. काहीशा चिंतेतच तथागत ओढीत होते हातातली जपमाळ. अन् स्तुपातला काळोख अधिकच गडद होत चालला होता. खोदलेले मोठे चौकोनी खांब अन् त्यावर अपुरी राहिलेली शिल्पे पाहताना नकळत त्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मनात सुरु झाला. लेण्यांतला काळोख पडदा झाला. अन् त्यावर सुरु झाला भूतकाळाचा कल्पित चित्रपट. छिन्नी-हातोड्याचे नाजूक घाव घालत पाषाणातून आकार घेत गेलेली शिल्पे, विविध रूपे घेत जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्त्व, जातक कथा त्या एकसंध पाषाणातून चित्रित होत होत्या. बुद्धं शरणं गच्छामि म्हणत साधना करणारे भिक्षू, पिढ्यानपिढ्या खर्चून ते अप्रतिम शिल्प साकारणारे ते अज्ञात शिल्पकार कुठे अदृश्य झाले? काय झालं त्याचं? कठोर पाषाणाचे स्तंभ बनवून झाले होते. मग त्यावर शिल्प कोरण्याआधीच कुठे निघून गेले ते? काय कारण असावं? एखादा भूकंप झाला असेल का? की एखादा प्रलयंकारी पूर आला असेल? की धारेच हृदय आटवणारा एखादा दुष्काळ पडला असेल? पण एवढे शिल्पकार, एवढे भिक्षू सारेच कसे एखाद्या नैसर्गिक आपत्तीत परागंदा होऊ शकतील? असं काही घडलंच असतं तरी आपत्ती सरल्यानंतर त्या शिल्पकरांनी परत येऊन आपलं अधुरं काम पूर्ण केलंच असतं ना? आपल्या पूर्वजांनी एवढ्या कष्टाने, आस्थेने आणि समर्पित वृत्तीने निर्मिलेल्या या कलाकृतींना का बरं असं अपूर्ण ठेवलं गेलं? की काळानेच अशी काही कोलांटी घेतली होती की हे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे कुणाचेही धाडस झाले नाही? असंख्य अनुत्तरीत प्रश्न मन विलक्षण सुन्न करून गेले. चिंतामग्न भासणारा तथागतांचा चेहरा आणखीनच करून वाटायला लागला. सभोवतालचा अंधार अधिकच गडद होऊ लागला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार साऱ्या भारतवर्षातच नव्हे तर श्रीलंका, कंबोडिया, जावा-सुमात्रा द्वीपसमूह, ब्रह्मदेश या नजीकच्या देशातही केला. कर्मकांडाचे, वर्णव्यवस्थेचे प्रस्थ मोडीत काढले. माणसाला माणसासारखे जगण्याचे बळ दिले. प्रेम, शांती, करुणेचा संदेश आणि बोधीसत्त्वाचे तत्त्वज्ञान भारताची ओळख बनले होते. अन् त्याचवेळी मौर्य राजवंशातील अखेरचा सम्राट राजा बृहद्रथ याची त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने याने वसंतोत्सवाच्या उत्सवात केलेली निर्घृण हत्या केली. त्यानंतर मगधच्या साम्राज्याचा ताबा घेत केलेला अश्वमेध, आणि त्याबरोबरच तथागतांच्या प्रेमाच्या, सहिष्णुतेच्या आणि करुणेच्या शिकवणुकीपुढे निष्प्रभ झालेल्या वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन यांसाठी केलेले बौद्ध भिक्षूंचे शिरकाण. सारंच मन हेलावून टाकणारं. कडे-कपाऱ्यांतून साधना करणाऱ्या बौद्ध भिक्षुंना शोधून त्यांची केलेली हत्या प्राचीन भारताच्या इतिहासातलं एक काळे-कुट्ट पर्व आहे. असंच काहीतरी घडलं नसेल ना? या वेरुळच्या अपूर्ण लेण्या, ते अज्ञात शिल्पकार आणि त्या अपूर्णतेमधलं अनाकलनीय गूढ. या साऱ्यांची उत्तरं इतिहासाच्या पुनर्रचनेतूनच शोधावी लागतील. आपल्या धर्माचे वर्चस्व वाढवण्यासाठी नेहमीच एका धर्माने दुसऱ्या धर्मावर हल्ला चढवत रक्तपात केल्याचे दाखले इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात पाहायला मिळतात. आणि याला कोणताच धर्म अपवाद नाही. खेदाची बाब म्हणजे मध्य आशियात माजलेले अराजक, चाललेली युद्धे, होणारा रक्तपात आणि प्रबळ होत जाणाऱ्या धर्मांध शक्ती हा सारा उलटा प्रवास आपण सुरु केला आहे. महत्त्वाचे म्हणजे याची पुरेशी जाणीवही आपल्याला नाही. बदलत्या काळाची साद ऐकत विज्ञाननिष्ठेची कास धरून पुढे जाण्याऐवजी आपण जात, धर्म, वंश. प्रदेश यांच्या नावाखाली विभागले जातोय. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी इतरांचा उपमर्द करतोय. धर्मसुधारणेची गरज असताना धर्मांधतेला खतपाणी घालतोय. आणि हे सारं आपल्या पाषाण नेत्रांनी पाहणारे तथागत म्हणूनच कदाचित इतके उदास आहेत, चिंतामग्न आहेत. साऱ्या जगभरातून लोप पावलेली आपली प्रेम, दया, शांतीची शिकवण शोधू पाहताहेत तथागत. शेकडो वर्षांच्या इतिहासात धर्माच्या नावावर झालेल्या हत्याकांडात बळी पडलेल्या लाखो निरपराधांचे रक्त वाहतंय तथागतांच्या डोळ्यातून अश्रू बनून, आणि आजही त्यांचा स्थितप्रज्ञ चेहरा देऊ पाहतोय सहिष्णुतेचा संदेश. आता गरज आहे फक्त तो संदेश समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची. 

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

तिचे स्वप्न

तिचे स्वप्न दहा जणींसारखे
चविष्ट भरल्या ताटाचे. दोन वेळच्या बेतांचे.
इस्त्रीच्या कपड्यांचे. सजलेल्या घराचे.
कधी नाटक, कधी मैफिलीचे– शेवटच्या रांगेचे.
थट्टामस्करीचे. गप्पा गोष्टींचे.
तिचे स्वप्न दहा जणींसारखें.

पण ते पडण्यापूर्वीच तिला जाग आली
आणि मग कधी झोप लागलीच नाही.

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

आजचा स्वातंत्र्यदिन - आशेची पहाट

विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरली माझी पिढी... आमच्या आधीची पिढी म्हणते आम्ही फारच भाग्यवान, कारण आम्ही पारतंत्र्य पाहिलं नाही, आणीबाणी भोगली नाही. सारं काही आम्हाला सहज मिळालं. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं खरंच आम्ही इतके भाग्यवान आहोत का? ९० च्या दशकात जन्मलेले आम्ही सारेच आज एका अदृश्य पारतंत्र्यात वावरतोय. त्याच स्थितीत घुसमटतोय, पण हे जाणून घेणार कोण?
एकेकाळी विश्वगुरु असणारा आमचा भारत, या भारतात जमल्याचा अभिमान आहेच. पण काय आमची पिढी या शाश्वत ज्ञानाची पाईक आहे? ज्याला ज्ञान म्हणायला हव तेच मिळवतोय आम्ही कि केवळ गुणांची टक्केवारी वाढवतोय? न शासनाला चिंता न पालकांना. या महान भारताचे महान महापुरुष दुरावलेत आमच्यापासून. काळ बदलत गेला तरी दृष्टी नाही बदलली. मग का म्हणायचं आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून. अगदी काल परवाची गोष्ट, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ज्यांना ज्ञानाचे प्रतिक म्हणून संबोधले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित पुस्तकं शाळांमधून परत मागवण्यात आली आली कारण काय तर म्हणे हिंदुविरोधी? बदलत्या काळाची समीकरणे न समजण्या इतके आपले शासन पाळण्यात आहे कि काय? ज्यांच्या संविधानाच्या आधारे आज देश चालतो त्याच्या विचारांना धार्मिकतेचे लेबल लावले जाते आणि आम्ही म्हणतो आमच्या स्वतंत्र भारतात धर्मनिरपेक्षता आहे. त्यातूनही संसदेत संविधान हाच माझा धर्म आहे अस सांगणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यात हे घडतं हे विशेषच....
आज म्हणे आमच्या हातात स्मार्ट फोन आलेत, त्यात सोशल साईट आल्या आहेत. जगाची सारी बित्तंबात आमच्या मुठीत आहे, आणि आम्हालाही त्यात आमचे विचार व्यक्त करायला वाव आहे. पण हे स्वातंत्र्य तरी निर्विवाद आहे का? अगदी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट, माझ्या परिचयातील एका विद्यार्थिनीच्या मनात शिक्षण व्यवस्थेबाबत असंतोष होता. तो कुठे व्यक्त करावा म्हणून तिने फेसबुकचा आधार घेत कुणाचाही उल्लेख न करता आपलं मत व्यक्त केलं. तर म्हणे ती शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या विभागप्रमुखांनी तिलाच धारेवर धरलं. आणि थेट महाविद्यालयातून कमी करण्यापर्यंत दम दिला. ही आहे इथली व्यवस्था. आजकाल फेसबुक वर काय पोस्ट करावं याची नियमावलीच प्रशासनाने तयार केली आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी ती गरजेचीही आहे मात्र यात सर्वसामान्य जनतेच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये याचीही खबरदारीही प्रशासनाने घ्यायला हवी. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. मात्र यात आक्षेपार्ह काय याची व्याख्या कोण करणार? माझ्यासारख्या अनेकांना आलेला हा नित्यनेमाचा अनुभव, आजचे आपले केंद्र सरकार संसदेत नाही तर किमान सोशल साईटवर जोरदार काम करत आहे. आणि त्यांची भक्त मंडळी ही त्यांचा यथायोग्य उदोउदो करतच आहेत. त्यात आपल्याला न पटलेल्या एखाद्या बाबीवर बोट ठेवा. एखादी कमेंट टाका. आयुष्यात कधीही न ऐकलेल्या अर्वाच्य लाखोल्या तुम्हाला वहिल्या जातील. आणि भक्त मंडळीच्या या कमेंट अजिबात आक्षेपार्ह असणार नाहीत. एकीकडे संस्कृती रक्षक म्हणून पोर्नवर गुपचूप बंदी घालायची आणि दुसरीकडे इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आई बहिण काढणाऱ्यांना पाठीशी घालायचं हा कोणता दुटप्पीपणा?
आजकाल ट्विटरची टीवटीव वाढलीये. इथे तुम्ही सरकारविरोधात ब्र काढलात तर तुम्ही थेट हिंदुविरोधी ठरता. अगदी एफटीआयआय आंदोलन पाहिलं तरी हे लक्षात येईल. आमच्या धार्मिक भावना आणि विचारसरणी यांचे स्पष्टीकरण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? ज्या हिंदुत्वाचा दाखला हे देतात त्या भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतो, सत्य आणि असत्याच्या लढाईत सर्वात मोठा दोषी तो आहे जो तटस्थ राहतो. या असत्याची पाठराखण आम्हाला करायची नाही, आणि सत्य सत्ताधाऱ्यांना पचणारे नाही. अशावेळी धर्माला अनुसरून घेतलेली आमची नकारात्मक भूमिकाही यांना साहवत नाही. मग ही तर सरळ आमच्या व्यक्ती, विचार आणि धार्मिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही का? मग कोणता स्वातंत्र्यदिन आम्ही साजरा करावा? का करावा?

आम्हाला जे मिळालंय ते स्वराज्य आहे, स्वातंत्र्य नव्हे. बालपण पालकांच्या छायेत गेलं आणि सुजाण होऊन जेव्हा वावरू लागलो तेव्हा मी मानसिक गुलामगिरी लादली जातेय. आचार विचारांची गुलामगिरी, व्यक्त न होण्याची गुलामगिरी, आणि या विरुध्द बंड न करण्याचीही गुलामगिरीच. आम्हाला आता खऱ्या अर्थाने स्वराज्य हवंय, सुराज्य हवंय, आणि स्वातंत्र्य हवंय... आजचा स्वातंत्र्यदिन या आशेची पहाट घेऊन येवो इतकीच अपेक्षा....

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

दत्तो वामन पोतदार

                                                            

                                                         दत्तो वामन पोतदार
                                                  (५ ऑगस्ट १८९०–६ ऑक्टोबर १९७९). 

थोर इतिहाससंशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते. जन्म कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी ह्या गावी. पोतदारांच्या घराण्याचे मूळ उपनाव ओर्पे असे होते; तथापि आदिलशाहीत त्यांचे एक पूर्वज पोतदार किंवा खजिन्याचे अधिकारी नेमले गेले. तेव्हापासून ओर्पे हे उपनाव मागे पडले आणि पोतदार हे रूढ झाले. पोतदारांचे प्राथमिक व माध्यमिकशिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना पुढील पदव्या प्राप्त झाल्या : केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८). हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र शासनाने ठरविलेल्या पंडितांपैकी ते एक होते. १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले. १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते. १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. १९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले. तसेच १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.
. १९२२ मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. १९४० मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा व्यासंग मोठा होता. १९१८ ते १९४७ ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३ पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते.
त्यांनी दोन संस्था नव्याने स्थापन केल्या : (१) मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस (१९३५). हिची पुण्यास स्थापना करून तिचे पहिले अधिवेशन पुण्यासच भरविले. पण पुढील अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. या संस्थेच्या दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९४८). (२) महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा. या संस्थेचे ते अध्यक्ष होते.प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२) हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील (१८१०– ७४) मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. ह्या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३) ह्या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे. त्यांनी संपादिलेल्या लहानमोठ्या ग्रंथांतील देवदासकृत संतमालिका (१९१३) आणि श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (१९३४) हे विशेष उल्लेखनीय होत. ‘प्रांतिक भाषांचे भवितव्य’ (१९३५), ‘भाषावार विद्यापीठे’ (१९३७), ‘महाराष्ट्रातील सौंदर्यस्थळे’ (१९३७), ‘पुरोगामी वाङ्‌मय’ दोन टिपणे (१९३७, १९३८), ‘ऐतिहासिक चरित्रलेखन’ (१९३८) असे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी केलेले स्फुट लेखन पोतदार विविध दर्शन (१९३९) ह्या पुस्तकात संगृहीत आहे. त्यांनी लिहिलेल्या सुमन-सप्तकात (१९५०) राजवाडे, केतकर, तात्यासाहेब केळकर, महात्मा गांधी, खाडिलकर आदी व्यक्तींवरील लेख आहेत. भाषिक प्रश्नासंबंधीचे त्यांचे लेख भारताची भाषासमस्या (१९६८) ह्या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. श्री थोरले माधवरावसाहेब पेशवे (१९२८), मराठी इतिहास व इतिहास-संशोधन (विहंगम निरीक्षण) (१९३५), दगडांची कहाणी हे पोतदारांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ. महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींच्या चरित्रलेखनाचे काम त्यांच्याकडे सोपविले होते.
  पोतदार हे एक उत्तम वक्तेही होते. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करू शकत. त्यांनी दिलेली काही व्याख्याने श्रोतेहो ह्या नावाच्या पुस्तकात संगृहीत आहेत. निरनिराळ्या निमित्तांनी भारतात, तसेच परदेशांतही त्यांनी प्रवास केला होता. त्यांच्या व्यासंगाच्या मानाने त्यांची ग्रंथरचना संख्येने कमी आहे; तथापि त्यांनी केलेल्या लेखनामुळे व संस्थासंचालनामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे. ते अविवाहित होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.


शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर



निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर


कोकणातली पावस, गणपतीपुळे, हेदवीचा गणपती अशी काही मोजकीच तीर्थस्थळं सर्वश्रुत आहेत. इथल्या छोट्या गावांमधून अनेक तीर्थस्थळंही आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर हे तीर्थस्थान आहे. शंकराचं जागृत देवस्थान म्हणून मार्लेश्वर ओळखलं जातं. संगमेश्वर बस स्थानकावरून देवरूखला जाणारा रस्ता जातो. ही वाट मार्लेश्वरलाही जाते. देवरूखपासून अवघ्या १८ कि.मीटरवर हे तीर्थस्थान आहे.
 
मार्लेश्वर शिवलिंग 
देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो.

सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगराला छोट्या आणि सपाट पायऱ्या आहेत. वृद्धानांही त्या चढताना त्रास होत नाही. वर्षभरापूर्वी मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्यापासून देवस्थान आणि धबधब्याला सांधणारा पूल बनवला आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं.
 
धारेश्वर धबधबा 
असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही. पावसाळ्यात डोंगर चढताना कायम पायाखाली पाहतच जावं लागतं. बरेचदा पायाखाली साप येण्याची शक्यता असते. विषारी, बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांच्या जाती इथे पाहायला मिळतात.

मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे.


मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.
मार्लेश्वरचा नयनरम्य निसर्ग 

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

संविधान दिनाच्या शुभेच्छा!



प्रज्ञासूर्या !

तुझा प्रत्येक शब्द म्हणजे
मनामनाची उर्जा निर्मिती
अन तुझे "संविधान"
म्हणजे प्रचंड पॉवर हाऊसच
आता कुठे आम्ही तुझ्या
ज्ञानऊर्जेचा दिवा घरोघरी
लावत आहोत.




प्रा. अशोक इंगळे

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

प्रबोधनकार ठाकरे




प्रबोधनकार ठाकरे

(१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर  १९७३)

पत्रकारिता, ग्रंथ लेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे श्रेष्ठ प्रबोधनकार!


प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे लोकहितवादी, आगरकर व महात्मा फुले यांच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक होत. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायांविरुद्धचा जणू एक संग्रामच होता.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव सीताराम ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी सार्‍यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजार्‍यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक अमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी त्या सर्वांना दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्त्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना  नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील खरा ब्राह्मणया नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खर्‍या ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.

प्रबोधनकार हे एक झपाटलेले लेखक होते. ते सचोटीचे पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांचे सर्व लेखन हे विशिष्ट ध्येयाच्या प्रचारासाठीच होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणात्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप,वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापुजी,पंडिता रमाबाई व माझी जीवनगाथा(आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची खरा ब्राम्हणआणि टाकलेले पोरही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्ह्मणांनी न्यायालयाकडे केली असता न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त आचार्य अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.


साहित्य संमेलन
प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन नावाचे एक संमेलन पुण्यात २३-२४ मार्च २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होूते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला. या प्रकारचे २रे संमेलन २३-२-२०१४ला पुणे शहरात झाले आहे. साहित्यिक रा.रं. बोराडे अध्यक्षस्थानी होते.


समग्र वाङ्मय
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‌मय (५ खंड) -प्रकाशक : महाराष्ट्र सरकार. संपादक : पंढरीनाथ सावंत


प्रबोधनकारांचे महत्त्वाचे ग्रंथ
साहित्यकृती
प्रकार
ऊठ मऱ्हाठ्या ऊठ
लेखसंग्रह
कुमारिकांचे शाप
वैचारिक
कोदंडाचा टणत्कार
इतिहास संशोधन
खरा ब्राह्मण
नाटक
ग्रामण्याचा साद्यंत इतिहास
इतिहास संशोधन
जुन्या आठवणी
ललित
टाकलेले पोर
नाटक
दगलबाज
वैचारिक
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे
वैचारिक
देवांची परिषद
वैचारिक
प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी
इतिहास संशोधन
भिक्षुकशाहीचे बंड
इतिहास संशोधन
रंगो बापूजी
चरित्र
पं. रमाबाई सरस्वती
चरित्र
वक्‍तृत्वशास्त्र
माहितीपर
संगीत विधिनिषेध
नाटक
शनिमाहात्म्य
वैचारिक
शेतकऱ्यांचे स्वराज्य
वैचारिक
श्री. संत गाडगेबाबा
चरित्र
संगीत सीताशुद्धी
नाटक
हिंदू जनांचा ऱ्हास आणि अध:पात
अनुवाद



 
भारतीय टपाल खात्याने केशव सीताराम ठाकरे यांच्या स्मरणार्थ छापलेले तिकिट