बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

दत्तो वामन पोतदार

                                                            

                                                         दत्तो वामन पोतदार
                                                  (५ ऑगस्ट १८९०–६ ऑक्टोबर १९७९). 

थोर इतिहाससंशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते. जन्म कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी ह्या गावी. पोतदारांच्या घराण्याचे मूळ उपनाव ओर्पे असे होते; तथापि आदिलशाहीत त्यांचे एक पूर्वज पोतदार किंवा खजिन्याचे अधिकारी नेमले गेले. तेव्हापासून ओर्पे हे उपनाव मागे पडले आणि पोतदार हे रूढ झाले. पोतदारांचे प्राथमिक व माध्यमिकशिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना पुढील पदव्या प्राप्त झाल्या : केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८). हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र शासनाने ठरविलेल्या पंडितांपैकी ते एक होते. १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले. १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते. १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. १९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले. तसेच १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.
. १९२२ मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. १९४० मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा व्यासंग मोठा होता. १९१८ ते १९४७ ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३ पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते.
त्यांनी दोन संस्था नव्याने स्थापन केल्या : (१) मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस (१९३५). हिची पुण्यास स्थापना करून तिचे पहिले अधिवेशन पुण्यासच भरविले. पण पुढील अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. या संस्थेच्या दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९४८). (२) महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा. या संस्थेचे ते अध्यक्ष होते.प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२) हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील (१८१०– ७४) मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. ह्या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३) ह्या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे. त्यांनी संपादिलेल्या लहानमोठ्या ग्रंथांतील देवदासकृत संतमालिका (१९१३) आणि श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप (१९३४) हे विशेष उल्लेखनीय होत. ‘प्रांतिक भाषांचे भवितव्य’ (१९३५), ‘भाषावार विद्यापीठे’ (१९३७), ‘महाराष्ट्रातील सौंदर्यस्थळे’ (१९३७), ‘पुरोगामी वाङ्‌मय’ दोन टिपणे (१९३७, १९३८), ‘ऐतिहासिक चरित्रलेखन’ (१९३८) असे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी केलेले स्फुट लेखन पोतदार विविध दर्शन (१९३९) ह्या पुस्तकात संगृहीत आहे. त्यांनी लिहिलेल्या सुमन-सप्तकात (१९५०) राजवाडे, केतकर, तात्यासाहेब केळकर, महात्मा गांधी, खाडिलकर आदी व्यक्तींवरील लेख आहेत. भाषिक प्रश्नासंबंधीचे त्यांचे लेख भारताची भाषासमस्या (१९६८) ह्या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. श्री थोरले माधवरावसाहेब पेशवे (१९२८), मराठी इतिहास व इतिहास-संशोधन (विहंगम निरीक्षण) (१९३५), दगडांची कहाणी हे पोतदारांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ. महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींच्या चरित्रलेखनाचे काम त्यांच्याकडे सोपविले होते.
  पोतदार हे एक उत्तम वक्तेही होते. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करू शकत. त्यांनी दिलेली काही व्याख्याने श्रोतेहो ह्या नावाच्या पुस्तकात संगृहीत आहेत. निरनिराळ्या निमित्तांनी भारतात, तसेच परदेशांतही त्यांनी प्रवास केला होता. त्यांच्या व्यासंगाच्या मानाने त्यांची ग्रंथरचना संख्येने कमी आहे; तथापि त्यांनी केलेल्या लेखनामुळे व संस्थासंचालनामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे. ते अविवाहित होते. पुणे येथे त्यांचे निधन झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा