सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

शिवकालीन मराठी साहित्याच्या राजकीय प्रेरणा...

मराठी साहित्याच्या शिवकालीन अभ्यासाची कालमर्यादा इ. स. १६८० ते इ. स. १८०० अशी मानली जाते. स्थूलमानाने या कालखंडाचा प्रारंभ शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर आणि आणि शेवट पेशवाईच्या अस्ताने होतो. बहामनी राज्याची पाच शकले झाल्यानंतर मराठ्यांची स्थिती पुष्कळ सावरली होती. निजामशाही आदिलशाही आदींच्या काळात मराठ्यांच्या नैसर्गिक गुणांना आणि कर्तृत्वाला वाव मिळाला. त्यामुळे अल्पकाळातच घाडगे, निंबाळकर, डाफळे, माने, सावंत, शिर्के, मोरे, भोसले इत्यादी अनेक घराणी नव्यानेच उदयाला आली, त्यातूनच महाराष्ट्रात मुत्सद्दी आणि सेनान्यांची थोर परंपरा निर्माण झाली. भौतिक जीवनातील या प्रगतीचे पडसाद धर्म, भाषा, साहित्य इ. सांस्कृतिक क्षेत्रातही ऐकू येऊ लागले. तद्नंतर शिवकाळात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती दृष्टीस पडते. त्यात मार्मिकतेसोबत मौलिकता, पांडित्यासोबत प्रतिभा, सामर्थ्यासह सौंदर्य, उद्बोधासह आनंद प्रत्ययास येतो. (मराठी वाड्मयाचे स्वरूप – ह. श्री. शेणोलीकर.)

राजकीयदृष्ट्या या कालखंडाचे १६८० ते १७०७ (निखळ मराठेशाही), १७०८ ते १७४९ (शाहू आणि पेशवे), १७४९ ते १८२० (निर्वेध पेशवेशाही) असे भाग पाडता येतात. हा काळ अनेक भव्योदात्त आणि करूण घटनांनी भरलेला आहे. राजकीय स्वरूपाच्या प्रक्षोभक घटनांची या कालखंडात रेलचेल आहे. मात्र या सर्व परिस्थितीचे प्रभावी प्रतिबिंब या काळातील साहित्यात पडलेले दिसत नाही. तरीही कोणत्याही काळातील साहित्यावर तत्कालीन राजकीय घटनांचा थोडाबहुत परिणाम हा होतच असतो. या शिवकालीन साहित्याच्या राजकीय प्रेरणांचा परामर्श पुढीलप्रमाणे सांगता येईल.

राजकीय घडामोडींचे ठळक चित्रण शिवकालीन साहित्यात आले नाही असे म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की मराठी साहित्याच्या निर्मितीमागील प्रेरणा कधीच राजकीय वा सामाजिक नव्हती. तर अध्यात्म हेच साहित्याचे आणि समाजजीवनाचे मध्यवर्ती सूत्र होते. (मराठी वाड्मयाचा इतिहास – खंड ३) निखळ मराठेशाहीच्या काळात असलेली धर्मनिष्ठा ही पुढच्या काळात उरली नाही. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठ्यांना कुणी प्रबळ शत्रू उरला नव्हता त्यामुळे मराठी सत्ताधाऱ्यानी आपलं लक्ष साम्राज्यविस्ताराकडे केंद्रित केले. मराठ्यांचे पेशवेकालीन धोरण हे धार्मिक नसून राजकीय महत्त्वाकांक्षेचे होते. आणि ते राष्ट्रीय भावनेतून नव्हे तर राज्यविस्ताराच्या कल्पनेतून आले होते. (कै. दत्तोपंत आपटे). लढाईतील विजय, वाढते साम्राज्य यामुळे पेशवाई ऐश्वर्यसंपन्न झाली होती. या काळात महत्वाकांक्षी ब्राह्मण मंडळीना समशेरबहाद्दूर बनण्याबरोबरच राज्यकारभाराच्या वाढत्या व्यापामुळे कलमबहाद्दूर बनण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे जमेल तो व्यवसाय पत्करून होईल तितकी चैन लुटावी असा शिरस्ताच त्याकाळी पडत गेला.

मुघलांच्या कैदेत अनेक वर्षे काढलेल्या शाहूस मुघली विलासाची चटक लागली होती. तसेच पहिल्या बाजीरावाचे पुत्र नानासाहेब आणि रघुनाथराव हेही विलासाचे भोक्ते असल्याने नाचगाण्याला आणि शृंगारप्रचुर साहित्याला या काळात बहर आला. केवळ शाहिरी काव्यातच नव्हे तर वामनासारख्या पंडित व कृष्णदयार्णवसारख्या साधकाच्या साहित्यातही शृंगारप्राचुर्य आढळते. ते केवळ संस्कृत कवींच्या अनुकरणातून आलेले नसून तत्कालीन अभिरुचीचे, आचारविचारांचे, वातावरणाचेच एक अंग होते.

संपूर्ण राष्ट्राचे जीवनचरित्रच उत्तर पेशवाईत बदलले होते. लोकांच्या बाह्यवेशाप्रमाणेच साहित्याचाही वेष बदलला. शाहिरी कवने बळावली. तुकाराम रामदासांची अंतर्भेदी वाणी स्तब्ध झाली. कंकणाचे रणत्कार आणि नुपुरांचे झणत्कार (वाड्यात आणि वाड्मयात) ऐकू येऊ लागले.महामहोपाध्याय र. वा. पोतदार यांच्या विधानातून या कालखंडातील साहित्याची दिशा आणि धोरण स्पष्ट होते. समाजाच्या किंवा राज्यकर्त्यांच्या आश्रयाने निर्माण झालेल्या कलेवर परंपरेची छाया सतत वावरत असते. या कालखंडातील काही राज्यकर्त्यांना (संभाजी, महादजी शिंदे, तंजावरचा सरफोजी) साहित्यनिर्मितीत रस होता. रघुनाथ पंडित, आनंदतनय, निरंजन माधव, यांसारख्या काही कवींनी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊनही त्यांची साहित्यनिर्मिती राज्यकारभारविषयक अनुभवामुळे वेगळी झाल्याचे जाणवत नाही. राजाश्रायाशी संबंधित असून वेगळी वाटणारी या काळातील रचना म्हणजे बखर गद्य आणि शाहिरी कविता.
दिल्लीतील इतमामाचे आकर्षण मराठ्यांसह सर्वांनाच होते. राज्यकारभाराची परिभाषा, दरबारी रीतीरिवाज, वेशभूषा, बागकाम, नृत्यगायन इ. क्षेत्रात या अनुकरणाचे विविध ठसे उमटले आहेत. मराठी पत्रव्यवहार व एकंदर गद्यलेखनावरही फारसीचा प्रभाव दिसून येतो. बखरलेखनाची कला आणि सुफी संप्रदायाची काही तत्वे मुसलमानांकडून उचलण्यात आली. त्यांच्या साहित्याचे काही छंदप्रकार (कटाव, दोहा, सवाई) मराठीने उचलले.

कोणत्याही कालखंडातील साहित्य हे निर्माण होत असताना समाजाच्या विविध गरजा, अभिरुचीभिन्नता यामुळे विविध स्तर निर्माण होतात. प्रस्तुत कालखंडातही गरजेनुसार अध्यात्मिक, ऐहिक, पौराणिक, ऐतिहासिक, पंडिती, शाहिरी, गेय-पद्यात्मक, बखररूपाने, पत्रात्मक असे विविध साहित्य निर्माण झाले. शिवकाल आणि शिवपूर्व काळात मराठीवर असलेले फारसीवरील वर्चस्व फारसीवर बहिष्कार न टाकताही कमी होत गेले.शिवजन्मकाळी मराठीच्या राजकीयव्यवहारात ८६% पर्शियन शब्द असत. पेशवाईच्या काळात हे प्रमाण ७%वर आले. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने- वि. का. राजवाडे). मराठी साहित्याचा सर्वकष उत्कर्ष या काळात पहावयास मिळतो. आता विविध घटकांच्या आधारे तत्कालीन राजकीय प्रेरणांचे स्थान काय होते ते पाहू.

१) संत साहित्य:
संत संप्रदायातील शेवटचे श्रेष्ठ पुरुष म्हणून समर्थ रामदासांचा उल्लेख करावा लागेल. मात्र त्यांचे निर्याणही या काळाच्या प्रारंभीच (१६८१ मध्ये) झाले. त्यानंतर बहिणाबाई, कचेश्वर ब्रह्मे, महिपती, निळोबा आदी संत मंडळी होऊन गेली. मात्र संत परंपरा समर्थपणे पेलून धरण्यास कोणी पुढे आले नाही. ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे छत्रपती शाहू आणि पहिल्या बाजीरावाचे गुरु असले तरी त्यांच्यात रामदासांइतके वैराग्य नव्हते. संतानी समाजातील पाखंडावर तीव्र टीका केली होती, मात्र टीकेची ही धार या काळात बोथट झाल्याने हे पाखंड पुन्हा बळावले. त्याखेरीज मुलुखगिरीच्या आणि लुटालूटीच्या मागे लागलेल्या तत्कालीन राज्यकर्त्यांना या कर्मकांडांच्या उपासनेमुळे आत्मगौरव, सामाजिक स्थैर्य आणि पारलौकिक कल्याण यांची हमी मिळत असल्याने या काळातील अध्यात्मिक विचार आर्त आणि जिज्ञासू होण्यापेक्षा अर्थार्थी होत गेले.

२) पंडिती काव्य:
संस्कृत पंचमहाकाव्यांप्रमाणे शब्दालंकारप्रचुरता मराठी साहित्यात आणण्याचा प्रयत्न पंडितांनी केला. पंडिती रचना प्राधान्याने कथाकाव्यात्मक होत्या. वामनपंडितांची यथार्थदिपीका आणि काही प्रमाणात मोरोपंत वगळता बाकी पंडिती काव्य हे ठेंगणेठुसकेच राहिल्याचे दिसून येते. या काळात उत्तरेकडील राजकीय विस्तार झाला होता तसेच इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांसारख्या परकीय संस्कृतींशीही संबंध आला होता मात्र तरीही या दुर्मिळ संधींचा लाभ घेण्यात पंडित कवी अयशस्वी ठरले. पानिपतच्या भीषण संघर्षाच्या काळातही पंडिती कविता महाभारतापुरतीच मर्यादित राहिली. या काळातील पंडिती काव्यातही शृंगारप्राचुर्य अधिक आढळते. याचे कारण पेशव्यांची विलासलोलुपता सांगता येईल. वामनपंडित वगळता इतरांच्या काव्यातील अध्यात्माचा धागाही क्षीण होत गेलेला आहे. या आधीच्या काळातील अध्यात्म आणि भक्ती यांच्या पकडीतून सुटण्याचा हा प्रच्छन्न प्रयत्न होता असे म्हणता येईल.

३) शाहिरी कविता:
शाहिरी कविता म्हणजे पोवाडा आणि लावणी या जोडप्याचा संसार. यातील पोवाड्यांचे विषय हे मराठ्यांच्या इतिहासातील तर लावण्यांचे विषय हे सर्वसामान्यांचे मनोरंजन करतील असे शृंगारपर होते. शिवकालीन राजकीय परिस्थितीचे समर्थ दर्शन शाहिरी काव्यात दिसते. शाहिरांनी आपल्या पोवाड्यातून मराठ्यांचे शौर्य, पराक्रम, आणि वीर पुरुषांची चरित्रे वर्णिली. तर त्यांच्या लावण्यांनी पेशवेकालीन विलास, शृंगार आणि ऐश्वर्य चित्रित केले. काही शाहिरांनी आपल्या कवितेत अध्यात्माची ऐहिकाशी सांगड घालण्याचाही प्रयत्न केला आहे. एकप्रकारे विषयदृष्ट्या शाहीर पौराणिकाकडून ऐहिकाकडे आणि ऐहिकाकडून समकालीनांकडे वळले होते. त्यांनी मराठी जनतेच्या आशा-आकांक्षा, सुख-दुःखे त्यांचे अनुभव काव्यात प्रत्यक्षपणे मांडले. म्हणूनच शाहिरी काव्याला मराठी काव्याची प्रभात असे म्हटले जाते.

४) बखर साहित्य:
या कालखंडातील प्रभावी गद्यनिर्मिती म्हणजे बखर. महिकावतीची बखर आणि राक्षेसतागडीची बखर या शिवपूर्वकालीन बखरी वगळता अन्य बखर साहित्य हे पेशवेकाळातच निर्माण झाले आहे. ही लेखनपरंपरा पेशव्यांच्या अस्तानंतरही बराच काळ सुरु होती. हे लेखन चरित्रलेखन, कुलवृत्तांत, कैफियत, वस्तुनिष्ठ वृत्तांतकथन, युद्धवर्णन, हकीकती, वाके अशा स्वरूपाचे असे. यातील घटना आणि व्यक्ती यांना अनेकदा राजकीयदृष्ट्या महत्त्व असे. यथामतीने बखर सजवून सेवेसि पाठविली आहे.या रघुनाथराव यादवच्या पानिपतच्या बखरीतील विधानातून ही राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून लिहिण्यात येत असे हे लक्षात येते. (मराठी वाड्मयाचा इतिहास – ल. रा. नासिराबादकर) त्यामुळे अर्थातच बखरनिर्मितीच्या मागे राजकीय प्रेरणांचे प्राबल्य प्रामुख्याने आढळते.

५) पत्र साहित्य:
बखर साहित्याखेरीज महत्त्वाचे गद्य साहित्य पत्र साहित्य. हे साहित्य अर्थातच साहित्यनिर्मितीच्या दृष्टीने लिहिलेले नसले तरी ते बहुतांशी राजकीयदृष्ट्या महत्व असलेल्या व्यक्तींनी लिहिलेले आहे. तसेच त्यांचे विषयही राजकीयदृष्ट्या लक्षणीय आहेत. यात ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर, पेशव्यांचे वकील अंताजी माणकेश्वर, गोविंदपंत बुंदेले, तसेच संभाजीपत्नी येसूबाई, रघुनाथपत्नी आनंदीबाई, अहिल्याबाई होळकर या स्त्रियांचाही समावेश होतो. या साहित्यात बातमीपत्रे, शोकसमाचारपत्रे, कैफियती, हकीकती, वाके यांचाही समावेश होतो. यांतून तत्कालीन राजकीय स्थितीचे प्रभावी दर्शन घडते.

या कालखंड साक्षरता प्रसाराच्या अभावाचा आणि मुद्रणपूर्व अवस्थेतील आहे. या काळात वाच्यार्थाने ग्रंथ ही खरोखरीच संपत्ती होती. पेशव्यांचा ग्रंथसंग्रह जामदारखान्यात ठेवला जाई. ग्रंथ लिहिणे, संग्रहित करणे, आणि त्यांचे दान करणे हे पुण्यकर्म मानले जाई. त्याकाळी कागदाचेही दुर्भिक्ष्य असे. त्यामुळे गरजेनुसार साहित्यनिर्मिती होत राहिली. समकालीन जीवनाशी आणि भाषिक व्यवहारांशी हे साहित्य एकरूप झालेले असले तरी गद्याच्या सार्वत्रिक विकासासाठी आवश्यक असणारे शिक्षण, दळणवळण, मुद्रणसाधने आदींच्या अभावामुळे तत्कालीन मने पुराणसृष्टीतच रमलेली होती. त्याला विज्ञानयुगाचा स्पर्श नव्हता. त्यामुळे पेशवाईनंतर इंग्रज राजवटीत या राजकीय प्रेरणा बदलल्या आणि साहित्याच्या स्वरुपात लक्षणीय बदल घडून आले.


संदर्भ:
१)      मराठी वाड्मयाचे स्वरूप – ह. श्री. शेणोलीकर.
२)      मराठी वाड्मयाचा इतिहास (खंड ३) - 
३)      प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास – ल. रा. नासिराबादकर.
४)      पेशवेकालीन महाराष्ट्र – वा. कृ. भावे


ऋणनिर्देश
१)    नगर वाचनालय, रत्नागिरी.
२)    बाबुराव जोशी ग्रंथालय, रत्नागिरी.
३)    गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.

२ टिप्पण्या:

  1. शिवकालीन मराठी साहित्याच्या राजकीय प्रेरणा... सध्या या विषयाची व्याप्ती आकलनाच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे.सर्वच थरातील अभ्यासकांचे मूल्यमापन वेगळ्या परीप्रेक्षातून होत आहे. त्याचा बऱ्याचदा चलाखीने वापर करून स्व प्रसिद्धी मिळवणे सोपे आहे कारण शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे अवकाश अथांग आहे. त्याविषयी कुतूहल आहे.असो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सदर लेख हा एमए मराठीच्या विशिष्ट कालखंडाचा अभ्यास - शिवकाळ या अभ्यासपत्रिकेसाठी लिहिलेला आहे. तुम्हाला अपेक्षित असलेला शिवकाळ म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ असला तरी विद्यापीठाने नेमलेल्या अभ्यासक्रमानुसार हा शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचा, त्यांच्या प्रभावाचा कालखंड आहे. त्याची सुरवात १८८० नंतर म्हणजेच शिवाजी महाराजांच्या निर्याणनंतर होते आणि अखेर पेशवाईच्या अस्ताने होते. हा संदर्भ पहिल्याच काही वाक्यात आला आहे. मात्र तरीही तुम्ही लेखाचा संबंध शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाशी आणि चालखीने स्व-प्रसिद्धी मिळवण्याशी करत असाल तर इतकं म्हणेन निंदकाचे घर असावे शेजारी ....

      हटवा