ध्वनिचित्रफीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ध्वनिचित्रफीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर



निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर


कोकणातली पावस, गणपतीपुळे, हेदवीचा गणपती अशी काही मोजकीच तीर्थस्थळं सर्वश्रुत आहेत. इथल्या छोट्या गावांमधून अनेक तीर्थस्थळंही आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर हे तीर्थस्थान आहे. शंकराचं जागृत देवस्थान म्हणून मार्लेश्वर ओळखलं जातं. संगमेश्वर बस स्थानकावरून देवरूखला जाणारा रस्ता जातो. ही वाट मार्लेश्वरलाही जाते. देवरूखपासून अवघ्या १८ कि.मीटरवर हे तीर्थस्थान आहे.
 
मार्लेश्वर शिवलिंग 
देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो.

सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगराला छोट्या आणि सपाट पायऱ्या आहेत. वृद्धानांही त्या चढताना त्रास होत नाही. वर्षभरापूर्वी मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्यापासून देवस्थान आणि धबधब्याला सांधणारा पूल बनवला आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं.
 
धारेश्वर धबधबा 
असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही. पावसाळ्यात डोंगर चढताना कायम पायाखाली पाहतच जावं लागतं. बरेचदा पायाखाली साप येण्याची शक्यता असते. विषारी, बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांच्या जाती इथे पाहायला मिळतात.

मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे.


मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.
मार्लेश्वरचा नयनरम्य निसर्ग 

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

देव आहे...


सुपरस्टार रजनीकांतने एका भाषणात सांगितलेला किस्सा आहे. रजनी सांगतो, एकदा एक प्राध्यापक रेल्वेतून प्रवास करीत होते. सहज समोर पाहिले तर दिसले की, त्यांचा सहप्रवासी काहीतरी पुस्तक वाचतोय. प्राध्यापकांनी विचारले की, काय वाचताहात? त्यावर त्या माणसाने पुस्तक दाखवले! ते होते, बायबल!! प्राध्यापक महाशयांनी त्या वाचकाची खिल्ली उडवली, म्हणाले - "काय तुम्ही आजच्या काळातही धार्मिक पुस्तकं वाचता!! आजच्या विज्ञानयुगात धर्म, अध्यात्म, ईश्वर इ. साऱ्या साऱ्या संकल्पना निरर्थक आहेत! तुम्हाला माहितीये का की, मी किती मोठा प्राध्यापक आहे ते? हे माझं कार्ड. कधीतरी माझी अपॉईण्टमेंट घेऊन भेटा मला. बोलूयात! तुमच्या डोक्यातून हे धर्माचं भूत उतरवतो की नाही बघाच! असो. नाव काय म्हणालात तुमचं"?
इतका वेळ शांत असलेल्या त्या माणसाने तितक्याच शांतपणे उत्तर दिले, "माझं नाव थॉमस अल्वा एडिसन"!!
आता चकित होण्याची पाळी आपल्या प्राध्यापक महोदयांची होती! इतका वेळ 'अपॉईण्टमेंट घ्या' म्हणणारे ते आता स्वत:च एडिसनकडे अपॉईण्टमेंट मागू लागले. एडिसनने त्यांना भेटीची वेळही दिली.
ठरलेल्या वेळी आपले प्राध्यापक महाशय एडिसनच्या प्रयोगशाळेत पोहोचले. आत एक खूप सुंदर सूर्यमाला ठेवलेली होती. कुठे अणूची रचना दाखवणारा नमूना होता. कुठे काही उपकरणे. कुठे काय तर कुठे काय! प्राध्यापकबुवा तर हरखूनच गेले! भारावून जाऊन त्यांनी एडिसनला विचारले, "किती सुंदर प्रयोगशाळा आहे हो तुमची! खूप कष्ट पडले असतील ना तुम्हाला एक-एक उपकरण जमवताना? कुठून आणि कश्या आणल्या तुम्ही या वस्तू"?
एडिसन म्हणाला, "कुठूनच नाही. एके दिवशी मी इथं आलो, दार उघडलं; तेव्हा हे सगळं असंच मांडून ठेवलेलं होतं. आहे तश्याच अवस्थेत थेट काम करायला सुरुवात केली"!
प्राध्यापकांना विचित्र वाटले, "काय थट्टा करताय काय साहेब गरिबाची? असं कधीतरी शक्य आहे का"?
त्यावर एडिसन उत्तरला, "कमाल करताय साहेब तुम्ही! अहो माझी ही एवढीश्शी प्रयोगशाळादेखील कुणीतरी निर्माण केल्याशिवाय निर्माण झाली, असे मानायला तुम्ही तयार नाहीत; परंतु एवढे प्रचंड विश्व, कोट्यवधी ग्रह-तारे-दीर्घिका इ. सारे सारे मात्र कुणीतरी निर्माण केल्याशिवायच निर्माण झाले असे म्हणता! अहो, सृजन आहे म्हटल्यावर सृजनहारा असणारच की! Whenever there is a creation, there must be a creator"!!

एडिसनचा टोला योग्य जागी बसला. प्राध्यापक महोदयांना आपल्या तर्कपद्धतीतली चूक बरोब्बर कळून आली. आणि त्यांनी ती मान्यही केली. हा किस्सा सांगून झाल्यावर रजनी त्याच्या शैलीदार आवाजात म्हणतो, "कडवूळ इरक्काऽन" - अर्थात, "देव आहे"!!








शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

दिल तो बच्चा है जी......


आज १४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिन. म्हणजे खरंच हा केवळ लहान मुलांचा दिवस आहे का? आणि हा फक्त लहान मुलांचा दिवस असेल तर आपण मोठे झालो आहोत की. मग आपल्यासाठी हा दिवस असला काय किंवा नसला काय, सारखंच. हो कि नाही?

हम्म. कोडं उलगडत नाही. आपण उंचीने वाढलो, शिक्षण संपवलं किंवा मग वय वाढलं म्हणजे आपलं बालपण संपतं का? मला वाटतं नाही. आपल्यातलं लहान मुल तसंच असतं, त्यालाही मोठमोठ्याने हसायला आवडतं, बागडायला आवडतं. पण आपणच मग आपल्यातलं लहानपण लपवू पाहतो. पोक्तपणे वागू पाहतो. पण कशासाठी? केवळ इतरांनी आपल्याला हसू नये म्हणून? स्वतःतल्या स्वतःला किती दडपणार आहोत आपण?

Be Yourself... हे काय फक्त फेसबुक आणि व्हॉटसपवर स्टेटस् ठेवण्यासाठी आहे का? मी माझं आयुष्य माझ्यापरीने जगते, कधी ठेचकाळते, कधी पडते, धडपडते. पण त्याचा दोष इतरांना देत नाही. माझ्या वैयक्तिक जीवनात इतरांसाठी मी भले अपयशी असेन, पण माझ्यासाठी तरी मी स्वतःला जिंकलंय. माझ्यासाठी इतकंही पुरेसं आहे.

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. ज्यांना आपलं मानलं त्यांनी जिव्हारी वार केले मात्र तरी मी “जिवंत” आहे. मला अजूनही हसता येतं, रडता येतं, आनंद होतो आणि रागही येतो. मला चुकीच्या गोष्टींची चीड येते, मी अन्यायाचा प्रतिकार करते, आणि एवढ्या साऱ्या धुमश्चक्रीत मी रोज काहीतरी नवीन लिहिते. माझ्या मनातली ओल या संवेदनशीलतेच्या दुष्काळात अजूनही तगून आहे.


लोक खुशाल माझी थट्टा करोत, मी मनावर घेत नाही. हो, मी मोठ्याने बोलते, कारण दबक्या आवाजात कुटाळक्या करणं मला जमत नाही. हो, मी धावल्यासारखी चालते, कारण सावकाश चालण्याइतका फावला वेळ माझ्याकडे नसतो. हो, मी फार मोठ्याने हसते, कारण जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याची माझ्यामधे उर्मी आहे. हो, आजचा बालदिवस माझाच आहे. कारण दिल तो बच्चा है जी......


ध्वनिचित्रफित PaperBoat यांच्याकडून साभार...

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

Joy Of Giving...

कर्ण-बळीसम दात्यांची
पुराणांमध्ये खाण आहे
तरी घेणाऱ्यांचे हात हजारो
अन् देणाऱ्यांची वाण आहे

काहीतरी मिळवण्यापेक्षा काहीतरी देण्यातला आनंद विरळाच...
"Happiness doesn't result from what we get, but from what we give."
ध्वनीचित्रफित नाईक फौंडेशन कडून साभार....



शनिवार, ६ सप्टेंबर, २०१४

कुछ आपका...







कालच शिक्षक दिन साजरा झाला. साजरा झाला असं म्हणायचं कि नाही हे प्रत्येकानं स्वतःच्या मनालाच विचारावं. विचारावं स्वतःलाच आपण खरंच मनापासून आपल्या शिक्षकांना स्मरण केलं का? त्यांच्या विचारांचं स्मरण केलं का? उत्तर फारसं आशादायक नसेलही कदाचित मात्र तरीही आपल्या आत खोल खोल कुठेतरी आपल्या शिक्षकांचा त्यांच्या संस्कारांचा अंश हा असतोच. आपण कितीही नाकारला तरीही.

हीच भावना व्यक्त करणारा हा एक अप्रतिम व्हिडीओ, “कुछ आपका...”

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

ती अजूनही जिवंत आहे...






ती अजूनही जिवंत आहे,
ती अजूनही श्वास घेतेय,
ती सहन करतेय सारच
आणि प्रतिक्रियाही देतेय.
ती अजूनही जिवंत आहे,
ती आहे म्हणून आपण आहोत,
ती आहे म्हणून आपला विकास आहे,
आपलं तंत्रज्ञान आहे.
ती जणू आपलं अस्तित्व आहे.
आणि म्हणूनच
फक्त तिच्यासाठी
हा video पहा 
आणि 
विचार करा.

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

I Am That Change...







आपण भाषेला अस्मितेच्या, आदराच्या, भावनिकतेच्या तर कधी राजकारणाच्या दृष्टीनेही महत्व देत असलो तरी अमेरिकन भाषावैज्ञानिक  एडवर्ड सपीर  म्हणतो त्या प्रमाणे  भाषा हे केवळ संदेशानाचे माध्यम आहे. पण काहीवेळा भाषेशिवायही संदेशन शक्य आहेच की. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा हा व्हिडीओ पहा. आणि मनाशी ताडून पहा नेमकं काय पोहोचतंय ते.