निसर्गरम्य तीर्थक्षेत्र : मार्लेश्वर
कोकणातली पावस, गणपतीपुळे,
हेदवीचा
गणपती अशी काही मोजकीच तीर्थस्थळं सर्वश्रुत आहेत. इथल्या छोट्या गावांमधून अनेक
तीर्थस्थळंही आपल्याला पाहायला मिळतात. यापैकी एक म्हणजे मार्लेश्वर. भगवान
शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून
येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर हे तीर्थस्थान आहे.
शंकराचं जागृत देवस्थान म्हणून मार्लेश्वर ओळखलं जातं. संगमेश्वर बस स्थानकावरून
देवरूखला जाणारा रस्ता जातो. ही वाट मार्लेश्वरलाही जाते. देवरूखपासून अवघ्या १८
कि.मीटरवर हे तीर्थस्थान आहे.
देवरूख समुद्रसपाटीपासून उंच
असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी
वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख
गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो.
सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत
मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगराला छोट्या आणि सपाट
पायऱ्या आहेत. वृद्धानांही त्या चढताना त्रास होत नाही. वर्षभरापूर्वी
मार्लेश्वरच्या डोंगराच्या पायथ्यापासून देवस्थान आणि धबधब्याला सांधणारा पूल
बनवला आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते.
गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट
काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं.
असं सांगितलं जातं की या गुहेत एकही
विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण
प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी,
मेणबत्ती
किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच
साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही. पावसाळ्यात
डोंगर चढताना कायम पायाखाली पाहतच जावं लागतं. बरेचदा पायाखाली साप येण्याची
शक्यता असते. विषारी, बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांच्या
जाती इथे पाहायला मिळतात.
मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची
सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर
समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं.
इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या
घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा
अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे
बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही
बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे.
मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक
खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर
दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला
अनुभवायला मिळतात.
मार्लेश्वरचा नयनरम्य निसर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा