गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्रातील लोककला ३ : पोतराज



लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.

लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.  या लोककलांचा घेतलेला एक संक्षिप्त वेध...


. पोतराज

आलीया मरिबाई,
तिचा कळेना अनुभऊ
भल्या-भल्यांचा घेती जीवू,
आलीया मरिबाई.

वर्षभरात एकदातरी ढोलक्याचा तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं आणि आसुडाचे कडाडणारे फटके कानावर पडतातच. हा थोडासा उग‘, भयावह वाटणारा गोंधळ कानी आला की, गावातल्या आयाबाया हातात धान्याचं सूप किंवा खण-नारळ घेऊन लगबगीनं बाहेर येतात. मरिआईचं देणं चुकवलं की, भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतं ही धारणा आजही तितकीच पक्की आहे. त्यामुळं पोतराज गावात आला की, महिला वर्ग न चुकता हळदी कुंकू वाहायला मरिआईच्या गाड्याभोवती जमा होतात. लहान मुलांना आजारातून बरं करण्यासाठी, जनावरांच्या रक्षणासाठी, घरात शांतता नांदण्यासाठी मरिआईला नवस बोलला जातो. ग्रामीण भागातल्या महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे. तिच्या सेवेत कमी पडल्यास, तिच्या देण्यात कसूर झाल्यास ती भक्ताला जीवघेणी शिक्षा देते, जीव घेण्यासही कमी करत नाही. एवढी ती कडक आहे असे मानले जाते. म्हणूनच तिला कडकलक्ष्मी असे संबोधले जाते. ती आपल्या भक्तांना नेहमी सुखात ठेवते, पण त्यासाठी पाळावयाची पथ्ये इतर देवी-देवतांच्या पथ्यांपेक्षा कडक आहेत.

मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र आहे, तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उगवाटतो. लांब वाढलेले, जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं नेसणं (कमरेचं वस्त्र), त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेष असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा, सलग ध्वनी निर्माण करत दुसर्‍या बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो आणि हातातल्या आसुडाने स्वत:वर फटक्यांचा वर्षाव करून मरिआईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत राहतो. खिळ्याने स्वत:ला जखमी करून घेणे, स्वत:चे मनगट जोरात चावणे असे आत्मक्लेश तो मरिआईच्या कृपेने सहज करतो अशी धारणा आहे.

मरिआई त्याच्या अंगात आल्यानंतर ती भक्तांच्या अडीअडचणींवर उपाय सांगते. एकेक बाई पुढं येऊन आजारी पडणार्‍या जनावरापासून ते लग्नापर्यंत सर्व प्रकारच्या शंका देवीला सांगते. त्यावर देवी उपाय सांगते व हे काम झाल्यास पुढच्या वेळी मी खणा-नारळाने ओटी भरीन असा नवस बोलते. तो नवस फेडण्यासाठी किंवा देवीला तक्रार सांगण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत पोतराजाची वाट पाहत राहते. एकूणच पोतराज ही न संपणारी व सातत्याने चालत राहणारी सामाजिक किया बनली आहे. मरिआईच्या गाड्यासमोर बोललेला नवस सहसा मंदिरात जाऊन फेडला जात नाही. त्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याचीच वाट पाहिली जाते. मरिआई देवी कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी सदैव जागृत असणार्‍या भाबड्या गृहिणींची कल्याणकर्तीआहे आणि पोतराज देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा आहे. दार उघड बया दार उघडम्हणत तो मरिआईला भक्ताच्या भेटीला घेऊन येतो. मरिआई ही मूळची दक्षिणेची; द्रविडांच्या ग्रामदेवींपैकी एक आहे. दक्षिणेत तिला मरिअम्मा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात तिचे मंदिर गाववेशीवर असते.

पोतराज या मराठी शब्दाचा मूळ द्रविड शब्द पोत्तुराजुअसा आहे. पोत्तुम्हणजे रेडा किंवा बकरा. दक्षिणेत अशा प्राण्यांचा बळी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला जात असे. असा बळी देण्याचे काम करणारा जो, तो पोत्तुराजु म्हणजेच मराठीत पोतराज होय.

एकूणच पोतराज ही परंपरा पूर्णत: दैवी शक्तीच्या भीतीतून निर्माण झाली आहे व ती भीती आजही इतकी खोलवर आहे की, ही परंपरा शतकानुशतके कमी प्रमाणात का होईना पण अशीच सुरू राहील, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. पहिल्यासारखा तो भयावह प्रकार करत नाही. लोकांनाही आता तेवढी भीती वाटत नाही.


पण किती ठरवलं, तरी त्याच्या आसुडाचा आवाज अंगावर शहारे आणतोच आणतो. वृद्ध स्त्रियांची लगबग पाहिली की, मरिआईचा महिमा किंवा दहशत आणि पोतराजाचा प्रभाव या दोन्हींचा अंदाज येतो. डोक्यावर गाडा आणि गळ्यात ढोलकं घेऊन पोटासाठी मूठ-पसा मागणार्‍या त्या मरिआईच्या भक्तमाऊलीला व पोतराजाला मरिआई सौख्य, समाधान आणि निरोगी जीवन देवो, ही प्रार्थना!

२ टिप्पण्या:

  1. आपण लिहलेला ब्लॉग वाचला ,ही लोक कला कसली . ही पोट भरण आणि चिल्ले पिल्ले यांना धंद्याला लावण्याची ,फुकट खाण्याची कला . जर ही लोक कला आहे तर ,ब्राहमन ,पंडित यांना का येत नाही . कुणबी पाटील यांना पण आली पाहिजे यांनी पण जोपासली पाहिजे . महाराष्ट्र संपन्न होईल .

    उत्तर द्याहटवा
  2. आपण लिहलेला ब्लॉग वाचला ,ही लोक कला कसली . ही पोट भरण आणि चिल्ले पिल्ले यांना धंद्याला लावण्याची ,फुकट खाण्याची कला . जर ही लोक कला आहे तर ,ब्राहमन ,पंडित यांना का येत नाही . कुणबी पाटील यांना पण आली पाहिजे यांनी पण जोपासली पाहिजे . महाराष्ट्र संपन्न होईल

    उत्तर द्याहटवा