शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

शब्द



थंडीने नाही मरत शब्द
ते मरतात धाडसाच्या कमतरतेने
अनेकदा ऋतूंच्या ओलाव्यानेही
मरून जातात शब्द

मला एकदा एका लालभडक
पक्ष्यासारखा शब्द भेटला होता
गावाच्या बाहेर
मी त्याला घरी घेऊन आलो
पण जेव्हा तो पोहोचला दारापाशी
त्याने माझ्याकडे एकदा
एका विचित्र कातर नजरेने पाहिलं
आणि सोडला अखेरचा श्वास...
तेव्हापासून मी घाबरू लागलो शब्दांना
भेटल्यानंतर नेहमीच करू लागलो टाळाटाळ
अनेकदा मी मिटून घ्यायचो डोळे
जेव्हा पाहायचो एखादा चटकदार रंगाचा
केसाळ शब्द चालून येताना माझ्या दिशेने

मग हळूहळू या खेळात
मला गंमत वाटू लागली
एक दिवस मी अगदीच अकारण
एका सुंदर शब्दाला फेकून मारला दगड
जेव्हा तो धान्याच्या पन्हळीत
सापासारखा दडून बसला होता
त्याचे सुंदर चमकते डोळे
मला अजूनही आठवतात.

आता इतक्या दिवसांनंतर
माझी भीती कमी झाली आहे
आता शब्दांना भेटल्यानंतरही
होऊनच जाते विचारपूस
आता मला माहित झाल्या आहेत
त्यांच्या लपण्याच्या अनेक जागा
त्यांचे बरेचसे रंग
मला ज्ञात झाले आहेत
अर्थातच मला ज्ञात झालं आहे
कि सगळ्यात सरळ शब्द ते असतात
जे असतात सर्वात काळे, काताच्या रंगाचे
सगळ्यात जोखमीचे असतात ते
जे असतात पिवळसर गुलाबी.
ज्यांना आपण वाचवून ठेवत असतो
आपल्या सर्वात कठीण आणि दुःखद क्षणांकरिता
अनेकदा तेच योग्य वेळ आल्यावर
वाटू लागतात अश्लील
आता यांचं काय करू
कि जे कोणत्याच कामाचे नाहीत
अशा बेरंग
आणि उकिरड्यावर फेकलेले शब्दच
आपल्या संकटाच्या काळात
मला वाटू लागतात विश्वास ठेवण्यायोग्य

आता कालचीच गोष्ट घ्या
अंधाऱ्या रस्त्यावर
मला घेराव घातला
पाच सात सुंदर शब्दांनी
त्यांचे चेहरे झाकलेले होते
पण त्यांच्या हातात कोणतीतरी
तीव्र धारदार वस्तू होती
जी चमकत होती फार वाईटरित्या
माझं तर भानच गेलं हरपून
घामाघूम होऊन
मी काहीक्षण उभा राहिलो त्यांच्या समोर
अवाक्
मग मी पळालो
माझा एक पाय हवेत उठलाच होता कि
ना जाणो कुठून एक कुबडा शब्द
धापा टाकत आला
आणि म्हणाला, ‘चल, तुला घरी पोहोचवतो !’

मूळ कविता : शब्द
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा