बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्रातील लोककला २ : गोंधळ




लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.

लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.  या लोककलांचा घेतलेला एक संक्षिप्त वेध...

2. गोंधळ

महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. लग्न, मुंज किंवा इतर शुभकार्यावेळी घरी 'गोंधळ' घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे.

श्री रेणुका मातेचा किंवा श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभावा यासाठी भाविक-भक्त आपल्या पारंपरिक घराण्यातील गोंधळ्याला बोलावून देवीचा यथासांग गोंधळ घालतात. महाराष्ट्रात ज्या लोककलांना लोकजीवनाचा अविभाज्य घटक बनता आलं, त्यापैकी ही एक महत्त्वाची कला होय.

गोंधळाची उत्पत्ती ही परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाली असे सांगितले जाते. त्याबद्दल अशी कथा आहे की, परशुरामांनी बेटासूर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्याच शरीरातील शिरा (नसा) कापून, शिराच्या (कवटीच्या) ब्रह्म रंध्रात ओवून त्या वाद्याचा तिंतृण तिंतृणअसा आवाज करीत तो माता रेणुकेजवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला असे अभ्यासक लिहितात. तर गोंधळी लोक जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली आणि माहूर हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित असल्याचंही साधार स्पष्ट केलं आहे.
     
गोंधळाची प्राचीनता मांडताना संशोधकांनी- श्री. तुळजाभवानीची प्राचीनता ही इ. स. १००० पूर्वी जाते व रेणुका माता त्याहून प्राचीन आहेत, आणि गोंधळाची प्राचीनता रेणुका मातांच्या प्राचीनतेशी निगडीत आहे असे नमूद केले आहे. तर समर्थ रामदासांनी रचलेल्या, गोंधळात गायल्या जाणार्‍या आरतीत कवडी' एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा वोया ओळीतील कवडी या चलनाचा संदर्भ येतो. कवडी' हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कर्नाटकातील कदंब राजघराणे हे श्री तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते व उत्सव, गोंधळात सहभागी होत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो.

शतकानुशतके भक्तिभावाने घातल्या जाणार्‍या या गोंधळाचे स्वरूप बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मकदृष्ट्याही बदलत आले आहे. भाविकाच्या घरी गोंधळ घालण्यासाठी येणार्‍या गोंधळ्यांच्या पिढ्या काळासोबत ज्ञानात वाढ व सादरीकरणात बदल करत राहिल्याने काही दशकांपूर्वीचा गोंधळ वेगळा होता असे वाटून जाते.

गोंधळाची रचना :
सभोवताली रांगोळी काढून मध्यभागी एक पाट ठेवला जातो. पाटावर कोरे वस्त्र अंथरले जाते. त्यावर तांदळाचा चौक करून त्यावर मध्यभागी कलश ठेवला जातो. विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, खारीक इत्यादी पूजासाहित्य पाटावर मांडतात. पाटाच्या चारही कोपर्‍यांलगत झापाच्या आकारात कडब्याची ताटे किंवा उसाच्या कांडया बांधल्या जातात. त्या ताटांना कडकण्यांची माळ अडकवली जाते आणि दिवट्या पेटवून गोंधळाला सुरुवात केली जाते. (महाराष्टा्‌तील प्रत्येक भागात, किंबहुना प्रत्येक कुटुंबात (कुळात) याबाबतचा पद्धती, रचना, साहित्य यांमध्ये फरक आढळतो.)
गण :
गोंधळाची सुरुवात गणाने होते. कोणत्याही शुभकार्याप्रमाणे गोंधळातल्या गणातही गणेशाला नमन केले जाते. अनेक पारंपरिक गणांसोबत संत तुकोबांनी लिहिलेला पुढील गण बहुतांश वेळा गायला जातो.

गणराया लौकर यावे, भेट सकळाला द्यावे।।धृ।।
आले गणपती नाचत, पायी घागर्‍या वाजत।।१।।
अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी।।२।।
सोंड फिरवीतो गोमटी, नामलगावचा गणपती।।३।।
तुका म्हणे शोधुनी पाहे, विठ्ठल-गणपती दुजा नाही।।४।।

आवातणं :
गण झाल्यानंतर तेहतीस कोटी देवांना गोंधळासाठी आवातणं (म्हणजे आमंत्रण) दिलं जातं. पारंपरिक आवातण्यांमध्ये पृथ्वी, आकाश, पाताळ येथील सर्व देवतांना गोंधळाच्या ठिकाणी येऊन भाविकांना आशीर्वाद देण्याची विनंती केली जाते.


‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो
मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला
उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये
मोरेश्र्वर गणा... गोंधळा ये
सातारची मंगळाई ... गोंधळा ये’’

असे सर्व देवतांना आमंत्रण दिले जाते व शेवटी,‘ राहिले साहिले गोंधळा यावेम्हणून हा आवातण्याचा कार्यकम आटोपता घेतला जातो. या आवातण्यानंतर देवीला वंदन केले जाते, तिची स्तुती केली जाते व त्यानंतर सुरू होतो कथांचा वर्षाव. प्रबोधन करणार्‍या कथा, देवीच्या माहात्म्याच्या कथा, मध्ये मध्ये उत्स्फूर्त काव्य. त्याला वैशिष्ट्यपूर्ण चालीत बसवून संबळ, तुणतुणं आणि झांजेच्या तालावर सादर करणं. अशा कथा-काव्य-संगीताच्या गोंधळाने ऐकणारा दंग होऊन जातो.

गार डोंगराची हवा अन्
बाईला सोसना गारवा।।
कुंकु, नारळ घेऊनी हाती
या अंबाबाईला विनवू किती...

अशी गोंधळगीते समाजात लोकप्रिय झाली आहेत. तर अलीकडे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार काही नवीन विनोदी गीतांचा भरणाही गोंधळात होऊ लागला आहे.

काय करू मी आता बाई, माझ्या नशिबाला
मला मिळाला नवरा मेला, नुसता म्हसोबा
किंवा
वाट लावलीया माझ्या संसाराची,
वढ माहेराची हीला वढ माहेराची
अशा गीतांनी हास्यकल्लोळ उडवला जातो.

सासू कशी असावी, सूनेनं कसं असावं, सासर्‍याला मान द्यावा, संसारासाठी तन-मन-धन अर्पावं अशी शिकवण देणार्‍या गीतांच्या व कथांच्या माध्यमातून गोंधळी दैनंदिन जीवनाचा, समाजाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करतात. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत सर्वांना समान मानून प्रत्येक घरात जाऊन प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं कार्य करणारे गोंधळी बहुश्रुततेतून, पारंपरिक ज्ञानातून आणि समाजाच सूक्ष्म निरीक्षण करून स्वत:ला ज्ञानदानासाठी पात्र बनवितात. इतर कोणत्याही माध्यमाचा विचार करता ग्रामीण किंवा शहरी भागातही गोंधळ हे माध्यम व्यापक व प्रभावी वाटते. बहुतांश समाजांमध्ये हा कुळाचार असल्याने त्याची व्यापकता मोठी आहे. मोजक्या लोकांसमोर प्रभावीपणे सादर केला जात असल्याने गोंधळाच्या वाट्याला मोठा प्रेक्षकसमूह क्‍वचितच येतो. विवाहसंस्था ही समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. सामाजिक नीती व शांतता या संस्थेवर आधारित आहे. अशा संस्थेला योग्य वळण देण्याचं, अनुभवातून आलेल्या ज्ञानाच्या आधारे भविष्यातल्या संकटांच्या जागा दाखविण्याचं काम करणारी गोंधळ ही परंपरा म्हणूनच गरजेची व महत्त्वाची आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा