बगळे उडत चालले होते
खालून चाललो होतो
आम्ही तीनजण
तीन जण शहरातून आलेले
आश्विनाच्या लोटाभर उन्हात
न्हालेले तीन जण
चालत निघालो होतो माळरानावर
मावळत्या दिवसाची पायवाट
धरून
तिघेही खुश
एका अद्भुत विश्वासाने
भरलेले तिघेजण
कि आम्ही जात आहोत बरोबर
आणि जरूर जरूर
आम्ही पोहोचणारच
बगळ्यांप्रमाणे आमच्या
निश्चित ठिकाणी
दिवस मावळण्यापूर्वी
आम्ही चाललो होतो निशब्द
कुठल्याशा विचारात हरवलेले
चाललो होतो आम्ही
कि अचानक
आमची पावलं थबकली
आणि अचानकच आम्ही पाहीलं
रस्ता संपला !
आता आमच्यासमोर
दूरवर पसरलेले
पिकलेल्या ज्वारीचे
शेतच शेत होते
आणि रस्ता नव्हताच
काय झालं
कुठे गेला रस्ता ?
आम्ही तिघे विचारात
उभे
अस्वस्थ
तोच आम्हाला दूरवर दिसला
मावळत्या सूर्याच्या
आजूबाजूला
एक म्हातारा शेतकरी
आम्ही तिघे त्याच्याजवळ
गेलो
विचारलं – ‘ बाबा, रस्ता
कुठे आहे? ‘
म्हातारा काहीच नाही बोलला
तो काहीक्षण आम्हाला नुसताच
पहात राहिला
मग जमिनीवरून
त्याने एक ढेकूळ उचललं
आणि त्या दिशेला फेकलं
जिथे वाकून चरत होती
एक काळी गाय
आता गाय चालू लागली
पानं वाजू लागली
आणि आम्ही पाहिलं
जिथे शेताच्या मधोमध
ज्वारीच्या लटकत्या
लोंब्यांना कापीत
चालली होती गाय
तिथे रस्ता होता
तिथे गवतात उमटलेल्या
खुरासारखा
चमकत होता रस्ता
आता दृश्य एकदम स्पष्ट होतं
आता आमच्यासमोर
गाय होती
शेतकरी होता
रस्ता होता
फक्त आम्हीच विसरून गेलो
होतो
जायचं कुठे आहे.
बगळे
आता दूर
खूप दूर
निघून गेले आहेत.
मूळ कविता : रास्ता
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा