शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

कडूनिंब



शेतं जागी झाली होती
पानांवर चढत होती चैत्राच्या सुरवातीची
हलकी हलकी लाली
म्हटलं, ऋतू चांगला आहे
तोडून आणाव्या कडूनिंबाच्या तीन-चार
हिरव्या हिरव्या डहाळ्या

मी तर त्यांना विसरूनच गेलो होतो
पण माझ्या दातांना त्यांची अजूनही
खूप आठवण येत होती.

मग चालू पडलो एकटाच
ओळखीच्या कुंपणाना आणि पायवाटांना
ओलांडत – उड्या मारत
पोहोचलो गावातल्या त्या उंच टेकडीवर
जिथे उभा होता तो न जाणो किती वर्षांपासून
तो घनदाट कडूनिंबाचा वृक्ष
थांबलो,
काहीक्षण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं
आणि मग वाकवली एक फांदी
ओढली एक छोटीशी डहाळी
थरथरणारी डहाळी
तोडणारच होतो 
कि अचानक लक्ष गेलं झाडाखाली
अरे, हे कोण?
निंबाखाली बसलंय
डोळे मिटून.

पडलो विचारात
दातवण तोडू कि नको तोडू
पकडून राहू कि सोडून देऊ ती फांदी
जी माझ्या हातात होती.

शेवटी
ण जाणो काय आलं मनात
कि मी एका विचित्र वेदनेने
त्या दिशेने पाहिलं
जिथे बसला होता तो माणूस
आणि सोडून दिली ती निंबाची वाकलेली फांदी
मग परत आलो
रस्त्यात स्वतःशीच भांडत आणि स्वतःलाच समजावत
कि जर मी तोडल्या असत्या
काही हिरव्या नुकत्याच उगवत्या फांद्या
तर त्याचं काय झालं असतं
जो त्यांच्याच खाली बसला होता
त्यांच्या जादूत
बंद करून आपले डोळे...  




मूळ कविता : नीम
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा