सुपरस्टार रजनीकांतने एका भाषणात सांगितलेला किस्सा आहे. रजनी सांगतो, एकदा एक प्राध्यापक रेल्वेतून प्रवास करीत होते. सहज समोर पाहिले तर दिसले की, त्यांचा सहप्रवासी काहीतरी पुस्तक वाचतोय. प्राध्यापकांनी विचारले की, काय वाचताहात? त्यावर त्या माणसाने पुस्तक दाखवले! ते होते, बायबल!! प्राध्यापक महाशयांनी त्या वाचकाची खिल्ली उडवली, म्हणाले - "काय तुम्ही आजच्या काळातही धार्मिक पुस्तकं वाचता!! आजच्या विज्ञानयुगात धर्म, अध्यात्म, ईश्वर इ. साऱ्या साऱ्या संकल्पना निरर्थक आहेत! तुम्हाला माहितीये का की, मी किती मोठा प्राध्यापक आहे ते? हे माझं कार्ड. कधीतरी माझी अपॉईण्टमेंट घेऊन भेटा मला. बोलूयात! तुमच्या डोक्यातून हे धर्माचं भूत उतरवतो की नाही बघाच! असो. नाव काय म्हणालात तुमचं"?
इतका वेळ शांत असलेल्या त्या माणसाने तितक्याच शांतपणे उत्तर दिले, "माझं नाव थॉमस अल्वा एडिसन"!!
आता चकित होण्याची पाळी आपल्या प्राध्यापक महोदयांची होती! इतका वेळ 'अपॉईण्टमेंट घ्या' म्हणणारे ते आता स्वत:च एडिसनकडे अपॉईण्टमेंट मागू लागले. एडिसनने त्यांना भेटीची वेळही दिली.
ठरलेल्या वेळी आपले प्राध्यापक महाशय एडिसनच्या प्रयोगशाळेत पोहोचले. आत एक खूप सुंदर सूर्यमाला ठेवलेली होती. कुठे अणूची रचना दाखवणारा नमूना होता. कुठे काही उपकरणे. कुठे काय तर कुठे काय! प्राध्यापकबुवा तर हरखूनच गेले! भारावून जाऊन त्यांनी एडिसनला विचारले, "किती सुंदर प्रयोगशाळा आहे हो तुमची! खूप कष्ट पडले असतील ना तुम्हाला एक-एक उपकरण जमवताना? कुठून आणि कश्या आणल्या तुम्ही या वस्तू"?
एडिसन म्हणाला, "कुठूनच नाही. एके दिवशी मी इथं आलो, दार उघडलं; तेव्हा हे सगळं असंच मांडून ठेवलेलं होतं. आहे तश्याच अवस्थेत थेट काम करायला सुरुवात केली"!
प्राध्यापकांना विचित्र वाटले, "काय थट्टा करताय काय साहेब गरिबाची? असं कधीतरी शक्य आहे का"?
त्यावर एडिसन उत्तरला, "कमाल करताय साहेब तुम्ही! अहो माझी ही एवढीश्शी प्रयोगशाळादेखील कुणीतरी निर्माण केल्याशिवाय निर्माण झाली, असे मानायला तुम्ही तयार नाहीत; परंतु एवढे प्रचंड विश्व, कोट्यवधी ग्रह-तारे-दीर्घिका इ. सारे सारे मात्र कुणीतरी निर्माण केल्याशिवायच निर्माण झाले असे म्हणता! अहो, सृजन आहे म्हटल्यावर सृजनहारा असणारच की! Whenever there is a creation, there must be a creator"!!
एडिसनचा टोला योग्य जागी बसला. प्राध्यापक महोदयांना आपल्या तर्कपद्धतीतली चूक बरोब्बर कळून आली. आणि त्यांनी ती मान्यही केली. हा किस्सा सांगून झाल्यावर रजनी त्याच्या शैलीदार आवाजात म्हणतो, "कडवूळ इरक्काऽन" - अर्थात, "देव आहे"!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा