मातीच्या हृदयातील ओल
खोल खोल जाताना
वाढत गेली लांबी
लेकरांच्या हातातल्या दोरीची...
विहिरींचे कठडे आणखी उंच
झाले,
आणि त्यावर उगवले डोळे
तिचा तळ निराखणारे,
अखेरची घटका मोजणाऱ्या
घोटभर पाण्यासाठी...
मातीच्या हृदयातील ओल
खोल खोल जाताना
वाढत गेलं मोल
हंडाभर पाण्याचं,
अन् त्यावर सुरूही झाली
जाळपोळ आणि हमरातुमरी...
निष्पर्ण वृक्षाखाली
शेवटचा श्वास घेणारी गुरं
पोसता येत नाहीत
म्हणून मोकाट सोडलेली
अन् जगण्याच्या धडपडीत
हरवून गेलेलं माणूसपण...
या दाहक वास्तवातही
राजकारणाच्या रिंगणात
चिखलफेकीची धुळवड,
आणि अर्वाच्य विधानांचा
रंगलेला शिमगा...
तीव्र संवेदनशीलतेची
ही पराकाष्ठा पाहून
उरल्यासुरल्या पाण्यानेही
मागितलं
अखेरचं पाणी...
वसुंधरा महोत्सवातील पारितोषिक विजेती कविता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा