ते तिघे उन्हात बसले होते
आणि घोड्यांवर चर्चा करत होते.
तो सुंदर आहे - एक म्हणाला
चूक - दुसऱ्याने खोडून काढले
तो फक्त सामर्थ्यवान आहे - खूपच सामर्थ्यवान
तिसरा जो आतापर्यंत गप्प होता
हळूच म्हणाला - तो इतका सामर्थ्यवान आहे
की त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही.
का नाही होऊ शकत - पहिला ओरडला
जरूर होऊ शकते - दुसऱ्याने दुजोरा दिला
तिसरा गप्प होता
किंबहुना म्हणावं लागेल खुश होता.
तो विडीची राख झाडत म्हणाला -
पण घोडा कुठे आहे?
तर काय झालं?
घोड्यावर चर्चा तर होऊ शकते
पहिला म्हणाला
होऊ शकते पण मला वाईट वाटतं
मी अनेक वर्ष घोडा नाही पहिला -
तिसऱ्याच्या बोलण्यात एक वेगळीच वेदना होती
घोडे कमी होत चालले आहेत
पहिला म्हणाला
ठीक - पण हाच तर प्रश्न आहे
की घोडे का कमी होत चालले आहेत
दुसऱ्याने विचारलं
ते विकले जातात - पहिला म्हणाला
पण कोण
विकत घेतं एवढे सगळे घोडे
याची संख्या कुठेतरी असेलच -
दुसऱ्याचा प्रश्न तयार होता.
आहे - पण तो आपल्याला मिळू नाही शकत
पहिल्याने ‘आहे’वर जोर देत म्हटलं
का? - का नाही मिळू शकत?-
दुसरा थरथरत होता.
कारण घोडे संख्यांना चिरडून टाकतात
पहिल्याने सांगितलं
पहिल्याचा आवाज इतका धीमा होता
जणू तो समोरच्याशी नव्हे
स्वतःशीच बोलत असावा.
तिसरा जो आतापर्यंत गप्प होता
एकदम ओरडला - मित्रांनो
एक दिवस आकडे उठतील
आणि घोड्यांना चिरडून टाकतील.
त्यानंतर बराच काळ
कोणतीच चर्चा झाली नाही.
मूळ कविता : धूप में घोडे पर बहस
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा