सोमवार, ३ ऑगस्ट, २०१५

तुका म्हणे ८



प्रल्हादाकारणे नरसिंही जालासी । त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी । गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे तया कारणे सगुण । भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
३०९१ पृष्ठ ५१७(शासकीय)

नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी । का रे विसरसी पवाडे हे ॥१॥
खणखणा हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥२॥
राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणे पडे धाक बळियासी ॥३॥
असो द्यावी सामर्थ्ये ऐसिया कीर्तीची । आवडी तुक्याची भेटी देई ॥४॥
३०९२ पृष्ठ ५१७(शासकीय)


वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे ॥१॥
भोक्ता नारायण केले ते प्राशन । प्रतापे जीवन जाले तुझ्या ॥२॥
नामाच्या चिंतने विषाचे ते आप । जाहाले देखत नारायणा ॥३॥
तुका म्हणे ऐसे तुझे बडिवार । सीणला फणीवर वर्णवेना ॥४॥
३०९३ पृष्ठ ५१७(शासकीय)

अग्निकुंडामध्ये घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥
पितियासी म्हणे व्यापक श्रीहरी । नांदतो मुरारी सर्वा ठायी ॥२॥
अग्निरूपे माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥३॥
तुका म्हणे अग्नि जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥४॥
३०९४ पृष्ठ ५१७(शासकीय)

कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठे आहे ॥१॥
येरू म्हणे काष्ठी पाषाणी सकळी । आहे वनमाळी जेथे तेथे ॥२॥
खांबावरी लात मारिली दुर्जने । खांबी नारायण म्हणताची ॥३॥
तुका म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकी ॥४॥
३०९५ पृष्ठ ५१७(शासकीय)

डळमळिला मेरु आणि तो मंदार । पाताळी फणीवर डोई झाडी ॥१॥
लोपे तेजे सूर्य आणिक हा चंद्र । कापतसे इंद्र थरथरा ॥२॥
ऐसे रूप उग्र हरीने धरिले । दैत्या मारियेले मांडीवरी ॥३॥
तुका म्हणे भक्ताकारणे श्रीहरी । बहु दुराचारी निर्दाळिले ॥४॥

३०९६ पृष्ठ ५१७(शासकीय)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा