विसाव्या आणि एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरली
माझी पिढी... आमच्या आधीची पिढी म्हणते आम्ही फारच भाग्यवान, कारण
आम्ही पारतंत्र्य पाहिलं नाही, आणीबाणी भोगली नाही. सारं काही आम्हाला
सहज मिळालं. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं खरंच आम्ही इतके भाग्यवान आहोत का?
९०
च्या दशकात जन्मलेले आम्ही सारेच आज एका अदृश्य पारतंत्र्यात वावरतोय. त्याच
स्थितीत घुसमटतोय, पण हे जाणून घेणार कोण?
एकेकाळी विश्वगुरु असणारा आमचा भारत, या
भारतात जमल्याचा अभिमान आहेच. पण काय आमची पिढी या शाश्वत ज्ञानाची पाईक आहे?
ज्याला
ज्ञान म्हणायला हव तेच मिळवतोय आम्ही कि केवळ गुणांची टक्केवारी वाढवतोय? न
शासनाला चिंता न पालकांना. या महान भारताचे महान महापुरुष दुरावलेत आमच्यापासून.
काळ बदलत गेला तरी दृष्टी नाही बदलली. मग का म्हणायचं आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून.
अगदी काल परवाची गोष्ट, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ज्यांना
ज्ञानाचे प्रतिक म्हणून संबोधले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित
पुस्तकं शाळांमधून परत मागवण्यात आली आली कारण काय तर म्हणे हिंदुविरोधी? बदलत्या
काळाची समीकरणे न समजण्या इतके आपले शासन पाळण्यात आहे कि काय? ज्यांच्या
संविधानाच्या आधारे आज देश चालतो त्याच्या विचारांना धार्मिकतेचे लेबल लावले जाते
आणि आम्ही म्हणतो आमच्या स्वतंत्र भारतात धर्मनिरपेक्षता आहे. त्यातूनही संसदेत
संविधान हाच माझा धर्म आहे अस सांगणाऱ्या पंतप्रधानांच्या राज्यात हे घडतं हे
विशेषच....
आज म्हणे आमच्या हातात स्मार्ट फोन आलेत,
त्यात
सोशल साईट आल्या आहेत. जगाची सारी बित्तंबात आमच्या मुठीत आहे, आणि
आम्हालाही त्यात आमचे विचार व्यक्त करायला वाव आहे. पण हे स्वातंत्र्य तरी
निर्विवाद आहे का? अगदी काही महिन्यांपूर्वीची गोष्ट, माझ्या
परिचयातील एका विद्यार्थिनीच्या मनात शिक्षण व्यवस्थेबाबत असंतोष होता. तो कुठे
व्यक्त करावा म्हणून तिने फेसबुकचा आधार घेत कुणाचाही उल्लेख न करता आपलं मत
व्यक्त केलं. तर म्हणे ती शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या विभागप्रमुखांनी तिलाच
धारेवर धरलं. आणि थेट महाविद्यालयातून कमी करण्यापर्यंत दम दिला. ही आहे इथली
व्यवस्था. आजकाल फेसबुक वर काय पोस्ट करावं याची नियमावलीच प्रशासनाने तयार केली
आहे. सुव्यवस्था राखण्यासाठी ती गरजेचीही आहे मात्र यात सर्वसामान्य जनतेच्या
व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये याचीही खबरदारीही प्रशासनाने घ्यायला हवी.
आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास कारवाईचा बडगा शासनाने उगारला आहे. मात्र यात
आक्षेपार्ह काय याची व्याख्या कोण करणार? माझ्यासारख्या अनेकांना आलेला हा
नित्यनेमाचा अनुभव, आजचे आपले केंद्र सरकार संसदेत नाही तर किमान
सोशल साईटवर जोरदार काम करत आहे. आणि त्यांची भक्त मंडळी ही त्यांचा यथायोग्य
उदोउदो करतच आहेत. त्यात आपल्याला न पटलेल्या एखाद्या बाबीवर बोट ठेवा. एखादी
कमेंट टाका. आयुष्यात कधीही न ऐकलेल्या अर्वाच्य लाखोल्या तुम्हाला वहिल्या जातील.
आणि भक्त मंडळीच्या या कमेंट अजिबात आक्षेपार्ह असणार नाहीत. एकीकडे संस्कृती
रक्षक म्हणून पोर्नवर गुपचूप बंदी घालायची आणि दुसरीकडे इतरांच्या
व्यक्तिस्वातंत्र्यावर आई बहिण काढणाऱ्यांना पाठीशी घालायचं हा कोणता दुटप्पीपणा?
आजकाल ट्विटरची टीवटीव वाढलीये. इथे तुम्ही
सरकारविरोधात ब्र काढलात तर तुम्ही थेट हिंदुविरोधी ठरता. अगदी एफटीआयआय आंदोलन
पाहिलं तरी हे लक्षात येईल. आमच्या धार्मिक भावना आणि विचारसरणी यांचे स्पष्टीकरण
करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? ज्या हिंदुत्वाचा दाखला हे देतात त्या
भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतो, सत्य आणि असत्याच्या लढाईत सर्वात मोठा
दोषी तो आहे जो तटस्थ राहतो. या असत्याची पाठराखण आम्हाला करायची नाही, आणि
सत्य सत्ताधाऱ्यांना पचणारे नाही. अशावेळी धर्माला अनुसरून घेतलेली आमची नकारात्मक
भूमिकाही यांना साहवत नाही. मग ही तर सरळ आमच्या व्यक्ती, विचार आणि
धार्मिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी नाही का? मग कोणता
स्वातंत्र्यदिन आम्ही साजरा करावा? का करावा?
आम्हाला जे मिळालंय ते स्वराज्य आहे, स्वातंत्र्य
नव्हे. बालपण पालकांच्या छायेत गेलं आणि सुजाण होऊन जेव्हा वावरू लागलो तेव्हा मी
मानसिक गुलामगिरी लादली जातेय. आचार विचारांची गुलामगिरी, व्यक्त न
होण्याची गुलामगिरी, आणि या विरुध्द बंड न करण्याचीही गुलामगिरीच.
आम्हाला आता खऱ्या अर्थाने स्वराज्य हवंय, सुराज्य हवंय, आणि स्वातंत्र्य
हवंय... आजचा स्वातंत्र्यदिन या आशेची पहाट घेऊन येवो इतकीच अपेक्षा....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा