शनिवार, २९ नोव्हेंबर, २०१४

मी गंगेला पाहिलं



मी गंगेला पाहिलं
एका दीर्घ प्रवासानंतर
जेव्हा माझे डोळे
काहीही पाहण्यासाठी आतुर होते
जेव्हा माझ्याकडे काहीही काम नव्हतं
मी गंगेला पाहिलं
उष्माघाताच्या प्रचंड प्रहरानंतर
जेव्हा एका संध्याकाळी
मला उभारी आणि तजेल्याची
आत्यंतिक गरज होती
मी गंगेला पाहिलं, एक रोहू मासा होता
डबडबलेल्या डोळ्यांत
जिथे जीवनाची अपार लालसा होती
मी गंगेला पाहिलं जिथे एक म्हातारा नावाडी
वाळूत उभा होता
घरी जाण्याच्या तयारीत
आणि मी पाहिलं –
म्हातारा खुश होता
वर्षाच्या त्या सर्वात उदास दिवसातही
मला नवल वाटलं हे पाहून
कि गंगेच्या पाण्यात किती लांब
आणि अप्रतिम वाटतं
एका म्हाताऱ्या माणसाच्या खुश असण्याचं प्रतिबिंब...

आता म्हातारा जरा चुळबुळला
त्याने आपलं जाळ उचललं
खांद्यावर ठेवलं
एकवार पुन्हा गंगेकडे पाहिलं
आणि हसला
हे एका वृद्ध नावाड्याचे हास्य होते
ज्यात कोणताच पश्चात्ताप नव्हता
जर होती तर ती एक प्रामाणिक
आणि मनःपूर्वक कृतज्ञता
वाहणाऱ्या चंचल पाण्याप्रती
जणूकाही त्याचे डोळे म्हणत आहेत –
“आता झाली आहे सांज
गंगामाई
राम राम...”



रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई



गोविंद सखाराम सरदेसाई,
(१७ मे १८६५-२९ नोव्हेंबर १९५९)


महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी इतिहासकार. त्यांचा जन्म सखाराम व गंगाबाई या दांपत्यापोटी गरीब शेतकरी कुटुंबात गोविल (रत्नागिरी जिल्हा) या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण शिपोशीत झाले. मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगूताई कीर्तने या मुलीशी ते विवाहबद्ध झाले (१८८४). पत्नीचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले (१८८८) आणि बडोद्यास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून महिना सत्तर रुपयांवर नोकरीस लागले (१८८९). सयाजीरावांबरोबर त्यांना परदेशाचाविशेषतः यूरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली. महाराजांनी अध्यापकीय कामाबरोबर त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणूनही काम दिले होते. साठाव्या वर्षी निवृत्तीवेतन घेऊन ते संस्थानी सेवेतून निवृत्त झाले (१९२५). सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्यात कष्टाळूपणा आणि काटेकोरपणा आला. निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले. उर्वरित जीवन त्यांनी इतिहासलेखन-वाचन आणि संकलन यांत व्यतीत केले. त्यांच्या इतिहासलेखनास बडोद्यात असतानाच प्रारंभ झाला होता.

सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकविणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते. त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत. याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला. त्यांची प्रथम मुसलमानी रियासत प्रसिद्ध झाली (१८९८). याबरोबरच त्यांनी मॅकिआव्हेलीचा द प्रिन्स व प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवादकेले.या नंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य ठरले आणि इ. स.१००० पासून १८५७ पर्यंतचा इतिहास त्यांनी संकलित केला.त्याचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालकमानुसार विषयवार खंड प्रसिद्ध केले. मराठी रियासत व ब्रिटिश रियासत या दोन रियासतींच्या खंडांच्या आवृत्त्या १९३५ पर्यंत निघाल्या. त्यानंतर स. मा. गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली पॉप्युलर प्रकाशनाने आठ खंडांत मराठी रियासती ची नवी आवृत्ती प्रकाशित केली (१९८८-१९९२). यात विविध इतिहासकारांनी नव्याने उजेडात आलेल्या साधनांचाही चपखल उपयोग केला आहे. रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक व बालोपयोगी भारतवर्षमहाराष्ट्राचा इतिहासइतिहासाच्या सोप्या गोष्टीहिंदुस्थानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके लिहिली. सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्यात मैत्री होतीती प्रदीर्घकाळ टिकली. जदुनाथांनी ‘सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार’ असे सरदेसाईंना गौरवाने म्हटले आहे. छ. शिवाजी महाराजांच्या त्रिशत सांवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सूव्हेनिअर (१९२७) या ग्रंथाचे संपादन केले. त्यांमुळे परप्रांतात त्यांची कीर्ती पसरली. गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले. ब्रिटिश शासनाने १९२९ मध्ये त्यांच्याकडे पेशवे दप्तराच्या संपादनाचे काम सोपविले. त्यांना कृ. पां. कुलकर्णीय. न. केळकरवि. गो. दिघे यांसारखे अभ्यासू सहकारी लाभले. त्यामुळे पेशवे दप्तरातील असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे ४५ खंड प्रसिद्ध झाले (१९३०-३४). त्यांनी श्यामकांत या थोरल्या मुलाने शांतिनिकेतन व जर्मनी येथून वेळोवेळी पाठविलेली पत्रे श्यामकांतची पत्रे या शीर्षकाने प्रसिद्ध केली (1934). सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्ताररत्नाकरमनोरंजनचित्रमयजगतसह्याद्रीलोकशिक्षण इ. नियतकालिकांतून सु. २७५ लेख लिहिले. लोकशिक्षणाच्या डिसेंबर १९३२ च्या अंकात त्यांनी ‘राष्ट्रीय इतिहास : अर्थव्याप्ती आणि भूमिका’ या शीर्षकाचा लेख लिहून इतिहासशास्त्राचा अभ्यासत्याचा उपयोग व दुरुपयोगधर्म व राजकारणइतिहास साधने व साध्यनवीन संशोधनसंशोधक वगैरे मुद्यांची मीमांसा केली आहे आणि अखेरीस राजकारणात धर्म आणू नये व हिंदु-मुस्लिमांच्या ऐक्यावर भर द्यावाअसा उपदेश केला आहे. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर (१९४३) ते एकाकी झालेतथापि इतिहासलेखनाचे वत अखंडपणे त्यांनी चालू ठेवले आणि इंगजीत न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज ( तीन खंड१९४९) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. याशिवाय त्यांनी मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी व पूना रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स (पाच खंड) हे ग्रंथ डॉ. जदुनाथ सरकार यांच्या संपादन-सहकार्याने इंगजीत प्रसिद्ध केले. त्यांनी काव्येतिहाससंग्रहा तील पत्रेयाद्या आणि भारतवर्ष व इतिहास संगह या नियतकालिकांतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे संपादनही केले आहे. शिवाय परमानंदाच्या अनुपुराणा चे संपादन करुन ‘गायकवाड ओरिएंटल सेरीजमध्ये ते प्रसिद्ध केले.

सरदेसाई यांना अनेक मानसन्मान लाभले. ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब (१९३३) व नंतर रावबहादूर हा किताब दिला (१९३८). ते मराठी साहित्य संमेलनाच्या १९३८ च्या निवडणुकीत स्वा. सावरकरांविरुद्ध अपयशी ठरलेपण अहमदनगरचे अध्यक्षपद त्यांनी नाकारले (१९४३). राजवाडे संशोधन मंदिराने (धुळे) ‘इतिहास मार्तंड’ ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला (१९४६). पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली (१९५१). त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. अखेरच्या दिवसांत त्यांनी माझी संसारयात्रा हे आत्मचरित्र लिहिले (१९५६). भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला (१९५७). वृद्घापकाळाने त्यांचे कामशेत येथे निधन झाले.

सरदेसाई यांनी उपलब्ध साधनांवरुन मराठ्यांचा इंगजी व मराठी भाषांत संपूर्ण सुसंगत समग्र इतिहास लिहिण्याचे काम केले. त्यांनी संशोधन असे फारसे केले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर संकलनकार अशी टीका होते. त्यांच्या रियासतीत काही दोषउणिवा किंवा तपशिलांच्या चुका चिकित्सक अभ्यासकाला आढळतात. तथापि त्यांनी संकलनाच्या आणि विवेचनाच्या ज्या दिशा दाखविल्या आहेतत्यामुळे त्यांचे कार्य एक भक्कम पाया म्हणून नेहमीच महत्त्वाचे व चिरस्मरणीय राहील. म्हणूनच समाजाकडून रियासतकार ही सार्थ उपाधी त्यांना लाभली.

संदर्भ :
१. गर्गेस. मा. संपा. मराठी रियासतखंड १मुंबई१९८८.
२. टिकेकरश्री. रा. जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाईमुंबई१९६१.
३. ताटकेअरविंदसंशोधक सप्तर्षिपुणे१९६२.
४. देशपांडेसु. र. मराठेशाहीचे आधुनिक भाष्यकारपुणे१९९४.

प्रतिप्रश्न




शाळेत एके दिवशी
मी बाईंकडे गेले.

“बाई, मला भाषण करायचंय.
मला स्पर्धेत भाग घ्यायचाय.”

बाई म्हणाल्या,
“तुला जमणार नाही.”

“का?” मी विचारलं

“तुमच्यात केलंय का कधी कुणी भाषण?”

बाई एवढंच म्हणाल्या
मी प्रतिप्रश्नही केला नाही.



प्रश्न




शाळेच्या पहिल्याच दिवशी

घरी परतताना आईने केली चौकशी

नव्या मैत्रिणींची

त्यांच्या आडनावासहित

आणि मग तिनेच ठरवलं

मी कुणाशी मैत्री करावी...

आपला डबा कुणासोबत खावा

हे सांगतानाच

ती शिकवत गेली अनाहूतपणे

कुणाच्या डब्यातलं खाऊ नये.

मी कधी कारण विचारलं नाही.

तिने विचारल्याशिवाय सांगितलं नाही.

इयत्तामागून इयत्ता वाढत गेल्या 

आणि कळत गेलं

आपण शाळेत शिकण्यासाठी जातो

फक्त तेवढंच जेवढं पुस्तकात आहे

कोणताही अभ्यासेतर उपक्रम

आपल्यासाठी नाही.

त्यासाठी वेगळे विद्यार्थी आहेत.

मग मात्र मी कारण विचारलं आईला,

“जी संधी त्यांना मिळते ती मला का नाही?"

आणि यावेळी मात्र
आई निरूत्तर....

ऊर्ध्वमूल अधःशाखा....



माझ्या विचारांच्या विद्रोहाला
जेव्हा दिला जातो नकार
आणि रुजत जाते वेदना
नसानसात,
तेव्हा
रक्ताचा थेंब न् थेंब
करतो संकल्प संघर्षाचा
ऊर्ध्वमूल अधःशाखा....


शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

आवाज



गप्प राहून काही फायदा नाही
मी मित्रांना म्हणालो आणो धावलो
सरळ शेतांच्या दिशेने
कि शब्द पिकले तर नाहीत ना?

ही दुपारची वेळ होती
आणि शब्द झाडांच्या मुळाशी झोपले होते
सुगंध इथूनच येत होता – मी म्हणालो
इथे – इथे – शब्द इथेच असू शकतो
मुळाशी.

पिकणाऱ्या दाण्यांच्या आत
शब्दाच्या असण्याची पूर्ण शक्यता होती

मला वाटलं मला एखाद्या दाण्याच्या आत
घुसलं पाहिजे
दळण्यापूर्वीच मला पोहोचलं पाहिजे
पिठाच्या सुरवातीला
मला असलं पाहिजे या क्षणी
जिथून
गाण्याचे आवाज येत आहेत.

हा आईचा आवाज आहे – मी म्हणालो.
जात्यामध्ये आई होती.

दगडांच्या घर्षणातून आणि पिठाच्या सुगंधातून
हळूहळू पाझरत होता
आईचा आवाज
मग मी झोपलो
कधी कुठे मला आठवत नाही.

फक्त जातं फिरत राहिलं
आणि आईचा आवाज येत राहिला
रात्रभर...


मूळ कविता : आवाज
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कडूनिंब



शेतं जागी झाली होती
पानांवर चढत होती चैत्राच्या सुरवातीची
हलकी हलकी लाली
म्हटलं, ऋतू चांगला आहे
तोडून आणाव्या कडूनिंबाच्या तीन-चार
हिरव्या हिरव्या डहाळ्या

मी तर त्यांना विसरूनच गेलो होतो
पण माझ्या दातांना त्यांची अजूनही
खूप आठवण येत होती.

मग चालू पडलो एकटाच
ओळखीच्या कुंपणाना आणि पायवाटांना
ओलांडत – उड्या मारत
पोहोचलो गावातल्या त्या उंच टेकडीवर
जिथे उभा होता तो न जाणो किती वर्षांपासून
तो घनदाट कडूनिंबाचा वृक्ष
थांबलो,
काहीक्षण त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं
आणि मग वाकवली एक फांदी
ओढली एक छोटीशी डहाळी
थरथरणारी डहाळी
तोडणारच होतो 
कि अचानक लक्ष गेलं झाडाखाली
अरे, हे कोण?
निंबाखाली बसलंय
डोळे मिटून.

पडलो विचारात
दातवण तोडू कि नको तोडू
पकडून राहू कि सोडून देऊ ती फांदी
जी माझ्या हातात होती.

शेवटी
ण जाणो काय आलं मनात
कि मी एका विचित्र वेदनेने
त्या दिशेने पाहिलं
जिथे बसला होता तो माणूस
आणि सोडून दिली ती निंबाची वाकलेली फांदी
मग परत आलो
रस्त्यात स्वतःशीच भांडत आणि स्वतःलाच समजावत
कि जर मी तोडल्या असत्या
काही हिरव्या नुकत्याच उगवत्या फांद्या
तर त्याचं काय झालं असतं
जो त्यांच्याच खाली बसला होता
त्यांच्या जादूत
बंद करून आपले डोळे...  




मूळ कविता : नीम
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

नाव नसलेली नदी



माझ्या गावाला भेदत
पहिल्या माणसाच्याही खूप आधीपासून
शांतपणे वाहत आहे ती अरुंद नदी
जिला कोणतंच नाव नाही...

तुम्ही पाहिलं आहे कधी
कशी वाटते नाव नसलेली नदी?

चिखल, शेवाळ आणि जलपर्णीने भरलेली
ती अशाचप्रकारे वाहतेय गेल्या कित्येक शतकांपासून
एका नावाच्या शोधात
माझ्या गावची नदी...

कुठे कुणाचा मृत्यू होतो
लोक उचलतात तिरडी
आणि नदी जिथे सर्वात जास्त शांत आणि एकटी असते
तिथेच आजूबाजूला करून येतात अंत्यसंस्कार...

जेव्हा मी लहान होतो तेव्हा नेहमी विचार करायचो
लोक ज्यांचे अंत्यसंस्कार करतात
त्याचं काय करते नदी...

सुर्योदयानंतर बऱ्याच वेळाने
येतात म्हैशी
नदीमध्ये अंघोळ करायला...

नदी कुठे खोलवर डचमळते पहिल्यांदाच
मग येतात झुम्मन मिया
हातात घेऊन जाळे आणि चारा...

नदीमधे पहिल्यांदाच एक चमक येते
जणू नदी ओळखते झुम्मन मियाला...

मग सूर्यास्तापर्यंत
जिथल्या तिथे
जाळे लावून
एकटक बसून राहतात झुम्मन मिया...

दिवसभरात किती मासे
अडकत असतील त्यांच्या जाळ्यात?
किती झींगे किती चिखल
पाण्यातून उसळून येत असेल
त्यांच्या थैलीमध्ये
कुणालाच माहित नाही...

नदीला कोण देतं नाव
तुम्ही कधी विचार केलाय?

कि सकाळपासून संध्याकाळपर्यंत
नदीच्या काठावर
नदीसाठी नावाच्या शोधात
एकटक बसून राहतात झुम्मन मिया?





मूळ कविता : बिना नाम की नदी
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी