सोमवार, १ सप्टेंबर, २०१४

तमसो मा ज्योतिर्गमय...



गाडी बोगद्यात शिरते
आणि होतो
काळाकुट्ट अंधार ,
धडधडणाऱ्या रूळासोबत
वाढत जातात
हृदयाचे ठोके
अन् डोळे घेऊ पाहतात वेध
येणाऱ्या सूर्यप्रकाशाचा
गाडी बोगद्यात शिरते
आणि होतो
सूर्योदय
नेणीवेतल्या अनेक स्मृतींचा
कधीही न जाणवलेल्या
अपरिचित अशा
अनेक भावनांचे रंग
उमटू लागतात
मनाच्या निरभ्र आकाशात...
गाडी बोगद्यात शिरते
आणि होते जाणीव
जगातल्या शाश्वत सत्याची,
मन घाबरत असतं
अंधाराला कारण
नाही टिकून राहू शकत
प्रकाश कधीही कायमचा..
त्यालाही मानावाच लागतो
कुठेतरी पराभव
पुन्हा एका नव्या
विजयाच्या निश्चितीसाठी..
गाडी बोगद्यात शिरते
आणि लक्षात येतं
जरी आला समोर अंधार
आणि असला तो कितीही भयाण
तरी त्याच्याइतकंच अटळ आहे
प्रकाशाचं सामर्थ्य
हेच तर आहे सनातन सत्य

तमसो मा ज्योतिर्गमय...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा