हा ऋतू आहे फुलांचा
आणि बागेत धडाडताहेत बंदुका
कुठे आहेत त्या चिमण्या ज्या
घरट्यासाठी तृणपाती घेऊन खुळावल्यागत
धावत असतात आसमंतात...
हा ऋतू आहे गाण्याचा
आणि माझ्या घरात नाचतेय भूक
कुठे आहेत ते स्वर जे
माणसाच्या महत्तेसाठी आपल्या रक्तानिशी
हवेशी झटापट करतात...
हा ऋतू आहे
मुलांच्या मोठे होण्याचा
स्वप्ने पाहण्याचा
आणि त्यांच्या स्वप्नात सुरु होताहेत युद्ध,
कुठे आहेत ती मुले
जी युद्धरत माणसाला त्याच्या स्वप्नासह
जमिनीवर आणतील...
ऋतूंच्या विरुद्ध असं का घडत आहे
हे जाणण्यासाठी
कवी जेव्हा जेव्हा
उभा ठाकतो
सर्वांसमक्ष
मारला जातो
मात्र
कधीच नाही मरत कविता
खरं तर
ती फक्त अनुकूल ऋतूची पुनःचित्रित प्रतिमा असते.
एका कवीच्या मृत्यूचा अर्थ आहे,
पृथ्वीवर असंख्य कवितांचा जन्म...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा