शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

विरेचन

मनात तुंबलेल्या
भावनांच्या विरेचनासाठी
मी केलं विवेचन
माझ्या आत्मबलाचं
माझ्याच कवितेत
पुन्हा पुन्हा...

आभास निर्माण केला
सभोवताली शब्दांचा
जे चढवतील हल्ला
तुझ्या दुटप्पीपणावर
माझ्यावर होणाऱ्या
प्रत्येक अन्यायावर ...

माझ्या कवितांनी
दिली मला स्वप्न
पुन्हा डोळ्यात
सजवण्यासाठी
काळोख्या रात्री
संपवण्यासाठी ...

मनात तुंबलेल्या
भावनांच्या विरेचनासाठी
मी केलं समालोचन
माझ्याच आयुष्याचं
माझ्या आत्मबलाचं
माझ्याच कवितेत
पुन्हा पुन्हा...

केवळ वाईट घटनाच
चितारल्या मी
वास्तवाच्या वस्त्राचे
अस्तर बनवत
मी रेखाटलं
जीवनाचं विद्रूप चित्र...

माझ्या कवितांनीच अखेर
दिली मला आशा
समस्त दुःखदायक
घटनांच्या पार्श्वभूमीवर
दुःख देण्यासाठी आता
काय उरलंय नवीन?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा