भुर्र
भुर्र आवाज करणाऱ्या आणि भरपूर काळा धूर सोडणाऱ्या स्कुटीला किल्ल्याचं चढण चढता
चढता चांगलाच दम लागला होता. ती मात्र एक्सिलेटरवर जोर देतच होती. आज तिला उशीर
करून चालणार नव्हतं. ती चिडली होती. स्वतःवर कि स्कुटीवर याचा निर्णय मात्र होत
नव्हता. मनातल्या मनात ज्ञात अज्ञात सर्व देवतांची आळवणी चाललेली. अन त्यात भान
हरपलेला वारा. दिशा चुकून भरकटलेला. सभोवताली सळसळणारी झाडं पाहून तिला काही क्षण
वाटलं जणू काही ती आपल्यालाच डिवचताहेत. ती पुन्हा पुन्हा स्कुटीच्या आरशात पाहत
होती. वळणावळणाचा रस्ता तिला सतत नवी आव्हाने देत होता मनात विचारांची अनेक वादळे
घेऊन ती त्या आव्हानांना चकवत होती. खरंतर अशा प्रकारचा प्रवास तिच्या खास
आवडीचा. अरुंद निर्जन रस्त्यावर सावकाश
गाडी चालवणे हा तर तिचा छंदच. पण आज तिला
दिलेली वेळ पाळायची होती, वेळ तिच्यासाठी महत्त्वाची नव्हती पण वेळ ज्या व्यक्तीला
दिलेली होती ती व्यक्ती महत्वाची होती.
उभी
चढण चढून झाल्यावर तिने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. तिने आतुर नजरेने
आजूबाजूला पाहिलं. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ तो उभा होता, नेहमीप्रमाणेच
हाताची घडी घालून वटारल्या डोळ्यांनी तिची प्रत्येक हालचाल निरखत, तिच्या चिडक्या
चेहऱ्यावर आता प्रचंड तणाव. तिने गाडीची चावी काढली. डिक्की उघडली. त्यातलं देवीच्या ओटीच साहित्य बाहेर
काढलं. यावेळी न विसरता आणलेलं. गेल्या वेळी याच ठिकाणी तो त्याच्या आईला घेऊन आला
होता. तिची भेट घालून देण्यासाठी. आणि त्यावेळी ती रिकाम्या हातांनी मंदिरात आली म्हणून
चिडलाही होता तो. आणि अखेर त्याने स्वतः मंदिराबाहेरच्या दुकानातून तिच्या साठी
ओटीचं साहित्य विकत घेतलं होतं. आज तिने ठरवलंच होतं त्याला चिडण्याची संधीच
द्यायची नाही, आपल्या तयारीवर खुश होऊन ती स्वतःशीच हसली. तिने पुन्हा गाडी बंद
केल्याची खात्री केली. आणि ती किल्ल्याच्या दिशेने वळली, तिने त्याच्याकडे पाहिलं,
तो हसला. तिच्या मनात प्रश्न, तो आपल्याशी हसला कि आपल्यावर हसला. काही पावलं
चालल्यानंतर ती परत गाडीकडे वळली, तिने डिक्की बंद असल्याची पुन्हा खात्री केली.
आणि संधी साधून पुन्हा स्वतःचा चेहरा आरशात न्याहाळला. ती पुन्हा वळली आता मात्र
तो तिथे नव्हता.
“आता
आला असेल नाकावर भला मोठा राग. येऊ दे आला तर. आज याला रिकामा वेळ असला म्हणजे
आजच्या दिवशी सगळं जग रिकामटेकडं असतं असं नव्हे. एवढा राग येतो तर तो आवरायलाही
शिकावं माणसानं. प्रत्येकवेळी मीच काय म्हणून नसलेली चूक मान्य करत माफी मागायची.
आज त्याला बोलायचं असेल तर बोलावं त्याने मी काही बाबा रे माझ्याशी बोल असा वायफळ
हट्ट करणार नाही. मी म्हणजे काही बाहुली नव्हे त्याने हातात घ्यावं मनात असेल तोवर
खेळावं आणि मन भरलं कि बाजूला फेकावं.. आणि मी खरंच जर बाहुली असते तर? तरी नसते
गेले मी त्याच्याकडे. भातुकलीतल्या बाहुल्या तरी कधी स्वतःहून जातात आमच्याशी खेळा
म्हणून सांगायला. त्याच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहून लहान मुलाचं मन
त्यांच्याकडे ओढ घेत. त्या स्वतःहून नाही जात काही.” मनात उचंबळून येणाऱ्या असंख्य
विचारांची असंबद्ध उच्चारण करत ती किल्ल्याच्या पायऱ्या चढत होती. बाहुलीच्या
गोंडस चेहऱ्याकडे पाहूनच तिची निवड करणाऱ्या एका हट्टी मुलाकडे ती स्वतःहून चालली
होती.
त्याला
आणखी वाट पाहायला लागू नये म्हणून भराभर पायऱ्या चढल्याने तिला धाप लागली होती. पायऱ्यांवर
लोळणारी ओढणी सावरत तिने डाव्या हाताला असणाऱ्या गणपतीला नमस्कार केला. गणपतीचं
आणि तिचं फारसं काही सख्य नव्हतं. मात्र आज तिला त्याच्याशी बरंच काही बोलावसं
वाटत होतं. ओटीच्या साहित्यातून आणलेल्या फुलांमधे ती एखादं लाल फुल मिळतं का ते
शोधू लागली. अखेर एक जरा गडद रंगाचं गोंड्याचं फुल तिने निवडलं. आणि किमान आज तरी
तो फटकून वागू नये अशी मनोमन इच्छा करत तिने ते फुल गणपतीच्या पायाशी वाहीलं.
“जमेल
तेवढा चेहरा केविलवाणा केलाय. आता तरी
माझ्यावर दया कर गणराया...” ती तितक्याच केविलवाण्या स्वरात म्हणाली आणि स्वतःशीच
खुदकन हसली.
“मला
वाटतं गणपतीशी जे बोलायचं होत ते एव्हाना बोलून झालं असावं.” काही अंतरावर उभा
असलेला तो म्हणाला.
“एवढी
रे कसली घाई? आल्यासारखं जरा देवांनाही भेटून घे. तुला भेटून जरा त्यांना बर
वाटेल.” ती तितक्याच मिश्किलपणे म्हणाली.
“आज
जरा उशीर नाही केलास यायला? घरूनच उशिरा निघाली असशील. आणि आता म्हणशील रस्त्याला
गर्दी होती. हे छान आहे तुझं.”
साऱ्या
प्रश्नांची उत्तरं जर याला माहितच असतात तर हा मला प्रश्न विचारतोच कशाला? तिच्या
मनात आलं. कदाचित ओठावरही आलं असतं मात्र इतक्या दिवसात तिच्या लक्षात आलं होत कि
आपल्या मनात येणाऱ्या कोणत्याच गोष्टीला त्याच्या लेखी काहीच किंमत नाही. मग बोलून
वाईट कशाला व्हायचं? ती काहीच बोलली नाही. तिने काही बोलावं अशी त्याची अपेक्षाही
नव्हती. तरीही तिचं काहीही न बोलणं सुद्धा त्याला असह्य झालं होतं.
“तुला
आज काही बोलायचं नाही?”
तिने
आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.
“एरव्ही
तुच मला विचारतोस कि तुला जरा गप्प नाही का राहता येत? आणि तूच सांगतोयस बोल
म्हणून? तू तूच आहेस ना?”
त्याच्या
चेहऱ्यावर एक सहज हास्य फुललं. तिच्या अशा निरागस प्रश्नांची त्याला सवय तर होती.
पण त्या प्रश्नातले नित्यनाविन्य त्याला भुरळ घाली.
“तुझं
काहीही होणं शक्य नाही. तू जे दिवसभर स्वतःशी बोलत राहतेस ना त्याचा परीणाम आहे
हा. कुठे काय बोलावं हेच कळत नाही तुला.”
“आता
चुकीचं ते काय बोलले मी?” तिने आवाजात शक्य तितका कठोरपणा आणत विचारलं.
“काही
नाही चुकलं तुझं.” तो हसत हसत म्हणाला.
“मग
हसतोयस का ते तर सांग?” तिने हट्टाने विचारलं. पण त्याने मात्र तिच्याकडे लक्ष
दिलं नाही. खरंतर त्याला जे सांगायचं असतं तितकचं तो सांगतो आणि त्याला काही
विचारण्यात काहीच अर्थ नसतो हे माहित असूनही तिच्या अंगवळणी पडलेलं नव्हतं. तिला
आपल्या चुकीची कल्पना आली. त्याला आग्रह न करता ती हातातल्या रुमालाशी चाळा करत
मुकाट्याने चालत राहिली.
“अगं
फार काही नाही इतक्या दिवसांनी आपण भेटतोय. तेही अशा निवांत ठिकाणी. आणि तू अशी
अबोला धरून. म्हणून म्हटलं आज तुला काही बोलायचं नाही का?”
“इतर
वेळी तर मला सतत ओरडत असतोस किती बोलतेस म्हणून.”
“अगं
तेव्हा एकतर माझा बोलायचा मूड नसतो. डोक्यात वेगळं काहीतरी चाललेलं असतं नाहीतर
मला खरंच तुझ्या रटाळ विषयांचा वीट आलेला असतो.”
“मग
आज काय माझ्या रटाळ विषयांना अवीट गोडी येणार आहे वाटतं?” ती जरा तिरकसपणे
म्हणाली. हातातला मोबाईल खिशात टाकत त्याने तिच्याकडे जरा रागानेच पाहिलं.
“तुला
दुखवायचं नव्हतं. पण तुला जे बोलायचं असतं ते तू थेट बोलतोस. मी माझं मन मोकळं
करावं म्हटलं तर तो तुला रटाळ विषय वाटतो. तू रागावतोस मी गप्प बसते. तू बोल
म्हणतोस. मी बोलू लागते. तक्रार नाही करत पण माझ्यासारखं वागणं तुला जमेल?”
त्याने
तिच्याकडे एकटक पाहिलं. आणि न थांबणार हसू कसंबसं थांबवत तो म्हणाला, “That is one more difference between you and me.”
ती
मात्र त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं नव्हतंच पण
त्याच्या वागण्याचं नव कोडं मात्र समोर आलं होतं. ती पुन्हा एकदा गप्प. त्याने
पुन्हा एकदा खिशातला मोबाईल हातात घेतला. मावळतीची वेळ होत आलेली. पिवळसर प्रकाश
सर्वत्र पसरला होता. समुद्राच्या पाण्यावर केशरी आकाशाचे रंग उतरले होते. तिला
किल्ल्याच्या तटबंदीपलीकडल्या अथांग सागराची ओढ होती. त्यावर झुकलेल्या भगव्या
आकाशाची, त्यातल्या रंगबेरंगी निरनिराळ्या आकारांच्या ढगांची ओढ होती. पण तो मात्र
हातातल्या मोबाईलमधे डोकं खुपसूनच तिला म्हणाला,
“त्या
पश्चिमेकडच्या तटबंदीजवळ जाऊ. तिथे झाडाची जरा सावली आहे. शिवाय तिथली भिंतसुद्धा
बसायला जरा बरी आहे.”
“अरे
पण आधी देवीचं दर्शन तरी घेऊया.”
“तू
मला भेटायला आली आहेस कि देवदर्शन करायला?”
आता
मात्र ती चांगलीच बुचकळ्यात पडली. तिला नेमकं काय बोलावं सुचेना. तिने त्याच्या
चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होता.
“अरे
म्हणजे मी आलीये तुलाच भेटायला पण आता किल्ल्यावर आलोच आहोत तर देवीचं दर्शन नको
का घ्यायला?”
“देवीने
तुझ्या कानात येऊन सांगितलंय का, कि माझं दर्शन नाही घेतलंत तर मी कोपेन म्हणून.”
“तसं
नव्हे पण...”
“तसं
नव्हे पण मग कसं?” त्याने जरा आवाज चढवून विचारलं.
“अरे
मी... तू चिडतोस कशाला... माझं म्हणण फक्त इतकंच आहे कि आलोय इथवर तर दर्शन घेऊ.
मी ओटीही आणली आहे यावेळी...” ती अडखळतच म्हणाली.
“हा
नको तो शहाणपणा करायला तुला कुणी सांगितलं?” आता तो चांगलाच चिडला होता. आणि ती
आणखीनच गोंधळली होती.
“अरे
पण गेल्यावेळी आपण आलो होतो तेव्हा तर तू किती भक्तिभावाने देवीचं दर्शन घेतलं
होतंस. आणि तूच नाही का मला ओरडला होतास ओटी आणली नाही म्हणून. त्या दिवशी किती
रागावला होतास तू. अरे म्हणून यावेळी न विसरता ओटी घेऊन आले रे मी.”
“मग
काय उपकार केलेस माझ्यावर? गेल्यावेळी मी माझ्या आईला घेऊन आलो होतो. खास तुझी भेट
घालून देण्यासाठी. आईला इम्प्रेस करण्यासाठी ते ओटीच नाटक होतं. एवढं साधं कळत
नाही का तुला? खरंच पुस्तकी किडा आहेस तू. देवाने जे डोकं दिलंय त्याचा कधीतरी वापर कर.”
आता
मात्र तो चांगलाच चिडला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला वाईटही वाटत
होतं आणि संतापही येत होता. एरव्ही तू तुझं डोकं चालवत जाऊ नकोस असं सांगणारा आज
तिला डोकं वापरण्याचा सल्ला देत होता. तो रागाच्या भरात सरळ तटबंदीकडे निघून गेला.
देवळाच्या आवारात ती एकटीच उभी. तिचे डोळे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्थिरावले असताना
तिची सावली त्याच्याविरुद्ध दिशेने धावत होती.
हातातल्या
ओटीच्या साहित्याकडे तिने एकक्षण पाहिलं. तिची नजर मंदिरात गेली. देवीच्या चेहऱ्यावर
शांत स्मितहास्य होतं. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिलं. त्याने वळून पहावं,
हलकेच हसावं, आणि जवळ बोलवावं यापेक्षा अधिक तिची अपेक्षाही नव्हती. पण तो वळलाच
नाही. तिनेही मग थोडं हट्टी व्हायचं ठरवलं. त्याला काय वाटेल आणि तो अजून किती
रागवेल याचा विचार न करता तिने मंदिराच्या दिशेने पाऊल टाकले. त्या भव्य मंदिरात
फारशी गर्दी नव्हती. तिने अपार भक्तिभावाने देवीची ओटी भरली. हात जोडून
त्याच्यासाठी प्रार्थना केली. मनोभावे प्रदक्षिणा घातल्या. पश्चिम दरवाज्यातून
एकक्षण त्याच्याकडेही नजर टाकली. तो कुणाशीतरी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. ती
दर्शन घेऊन सभामंडपात आली. पंचधातूंनी बनवलेल्या सिंहाच्या प्रतिमेशेजारी ती बसली.
त्याच्या अणकुचीदार दातांकडे, नखांकडे ती एकटक पाहत राहिली. प्रतिकाराची आपली सारी
शस्त्र म्यान झाल्याच्या जाणीवेसोबतच तिला याचही भान आलं की तो आपली वाट पाहतोय.
तिने
पुन्हा एकदा देवीसमोर हात जोडले. देवीकडे पाठ न करता ती उलट्या पावलांनी
देवळाबाहेर पडली. रिकामी झालेली पिशवी तिने नीट घडी करून पर्समध्ये ठेवली. प्रसाद
घेतला. तिची नजर त्याच्याकडे स्थिरावली होती. लगबगीने पावलं उचलत ती त्याच्याजवळ
पोहोचली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने काहीही प्रतिक्रिया न देता हाताची बंद मूठ
त्याच्यासमोर धरली.
“प्रसाद
आणला असशील.” तो किंचित हसत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरही हसू उमललं.
“मी
कितीही ठरवलं तरी फार काळ राग राहतच नाही तुझ्यावर. हे असं काहीतरी करतेस ना
त्यावर काय बोलावं कळतच नाही.” त्याने प्रसादाचे फुटाणे तोंडात टाकले. “अखेर आपलं
तेच खरं केलंस ना.”
“आपलं
तेच खरं करण्याचा अधिकार काय फक्त तुलाच आहे? हट्टी मलाही होता येतं.”
“माहिती
देतेयस की चेतावणी?”
“दोन्ही.”
ती खळखळून हसत म्हणाली. आणि तोही मोकळेपणाने हसला.
“आज
कामावरून हाफ डे का घेतलास?” तिने त्याच्याशेजारी बसत विचारलं.
“तुला
भेटायचं म्हणून.” त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिची नजर मावळत्या
सूर्याला निरखू लागली. “एवढं काय काम काढलय ते विचारणार नाहीस?”
“विचारलं
नाही तरी तू सांगशीलच की.” ती म्हणाली.
“आपलं
ते साडी, वेणी, ओटी, चंद्रकोर सगळं नाटक अगदी व्यवस्थित वठलं हं. आई अगदी फुल ऑंन
इम्प्रेस आहे.” तो फारच खुश होता. पण त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावरची रेषा
यत्किंचितही हलली नाही. त्याचं त्याकडे लक्षही नव्हतं. तो बोलतच होता.
“आई
म्हणत होती. किती संस्कारी मुलगी आहे ना ती. म्हणजे तु गं. तिला अशा साध्या सरळ संस्कारी
मुलीच आवडतात. बाकी माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे अगदीच मॉड. त्यातल्या त्यात तूच
जरा काकूबाई टाईप. म्हणून तर एवढ्या सगळ्या मुलींत तुलाच choose केलं. आणि त्यात
आणखी थोडी भर घालून आईसमोर प्रेझेंट केलं. बस्स. काम भागलं.” तिच्याच रुमालाला
प्रसादाचे हात पुसत तो म्हणाला. ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पहात होती. त्याच्या
चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद होता. जिंकण्याचा. नेमकं काय जिंकण्याचा? त्याचं
त्यालाच ठाऊक...
“अशी
काय पाहतेयस? तुला आनंद नाही का झाला? मी मात्र खूप खुश आहे. आणि आईसुद्धा. तुही
बोल आता तुझ्या घरी. मग आई येईलच रीतसर मागणी घालायला.”
“हो
आता बोलायलाच हवं मला घरी.” शून्यात लागलेली नजर न हलवताच ती म्हणाली.
“बोलून
टाक. आता काही हरकत नाही.”
“त्या
दिवशी तुझ्या आईने मला रिजेक्ट केलं असतं तर मला माझ्या घरी हा विषय काढायची गरजच
पडली नसती ना?”
“As obvious.”
तिने त्याच्याकडे पाहिलं.
किंचित भुवया उंचावून. त्याच्याही लक्षात आलं. बोलू नये ते बोलून गेल्याचं.
“हे
बघ मला अगदीच काही तसं म्हणायचं नव्हतं. तू उगीच काही गैरसमज करून घेऊ नकोस. आई
नको म्हणाली असती तरी मी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाच असता ना? आणि मी
माझ्या आईच्या शब्दाबाहेर नाही हे तुला माहित होतच की. याला तू नाही म्हणूच शकत
नाहीस.”
तो त्याच प्रश्नार्थक
चेहऱ्याने तिच्याकडे पहात राहिला. तिचा चेहरा पुन्हा निर्विकार. आता तिला समजावून
फारसं काहीच साध्य होणार नाही हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग नेहमीप्रमाणेच
त्याने तो विषय तिथेच थांबवला.
“तू
तुझ्या घरी हा विषय काढ. बघ घरचे काय म्हणतात ते. मग मी आणि आई येऊ तुमच्या घरी.
आता तरी खुश?” त्याने तिची कळी खुलावी म्हणून लाडात येत विचारलं. अन् मग तिनेही
ओठांवर खोटं खोटंच का होईना हलकंसं हसू आणलं.
“पण
येशील तेव्हा या मानेवर लोंबणाऱ्या झिंझ्या कापून ये. माझ्या घरच्यांना आवडणार
नाहीत.”
तिच्या
या वाक्यावर तोही किंचित हसला. आपल्या केसांवर हात फिरवत तो म्हणाला,
“अगं
पण मला तुझ्याशी लग्न करायचंय तुझ्या घरच्यांशी नाही.”
“अरे
मग मलाही तुझ्याशी लग्न करायचंय तुझ्या आईशी नाही.”
“तुला
वाद घालायचा आहे का माझ्याशी?” त्याने गंभीर होत विचारलं.
“नाही.
मला कुणाशीच कोणताच वाद घालायचा नाही. कारण मला सारंच मान्य आहे. तुझा राग, तुझं
प्रेम, तुझं फटकारणं, ओरडणं, चारचौघात फटकून वागणं. मला सारंच मान्य आहे. आणि
तक्रार करणं तर मी विसरूनच गेलेय तुला भेटल्यापासून. असंचं वागायचं असतं ना
आम्ही?”
“जर
तुला मी हवा असेन तर तुला तरी किमान असंचं वागावं लागेल. माझा नाईलाज आहे.”
“आणि
माझा कधीच असा असा नाईलाज होऊ शकत नाही.” तिच्या आवाजात कमालीची अस्वस्थता होती.
आणि त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा तणाव.
“तू
केव्हापासून इतका विचार करायला लागलीस?” त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत
विचारलं.
“तुला
हा प्रश्न विचारावासा वाटला?”
“इतका
विचार नको करूस. तुलाच त्रास होईल.” तो तिचा खांदा हलकेच दाबत म्हणाला.
तिने
त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर, डोळ्यांत तिला अभिप्रेत असणारं काहीच
नव्हतं. तो तितकाच निश्चल. तितकाच शांत. घास गिळून सुस्तावलेल्या अजगरासारखा. तिला
आता असे धक्के पचवण्याची सवय झाली होती.
“हम्म.
बरोबर आहे तुझं. मात्र विचार मनात येतातच ना. आज सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य
उद्या उगवणार नाही असं नसतं ना.”
“हे
बघ. मला तुझ्या इतकं गोलगोल बोलता येत नाही. पण हा समोरचा अथांग समुद्र पहातेयस
ना. मी तसाच आहे. त्याच्या तळाशी काय असेल हे आपण नाही सांगू शकत. बरोबर ना? अगदी
तसंच आहे. माझ्या वागण्याचा, बोलण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याची
गरजही नाही तुला.”
“हो
बरोबर आहे तुझं. तु तसा नेहमीच बरोबर असतोस. तू आहेसच मुळी समुद्रासारखा. आणि मी
भूमी.”
तो
हसला. काहीसं कुत्सितच हसला.
“अखेर
माझं म्हणणं पटलं तर तुला. पटायला हवंच. अगं आता तूच विषय काढलास म्हणून मी माझं
मत मांडतो. आता भूमीचेच बघ किती प्रकार. ओसाड, माळरान, नापीक, सुपीक, कातळाची,
कुरणाची कितीतरी आहेत, पण भाव कशाला मिळतो सुपीक भूमीला. आणि भूमीवर जे काही उपजतं
तेही कुठे असतं तिच्या हक्काचं? आता एवढे उंच पर्वत आहेत, त्यात इतक्या नद्या
आहेत, भूमीचा प्रचंड प्रदेश व्यापून अखेर त्या धाव घेतात तर समुद्राकडेच ना? इतकंच
कशाला आयुष्यभर या भूमीवर पोसलेल्या माणसाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थिसुद्धा
आश्रय समुद्राचाच घेतात. भूमी प्रतीक आहे त्यागाचं, समर्पणाचं, एकनिष्ठतेच.” तो
ठामपणे म्हणाला.
त्याला तिच्याकडून
प्रत्युत्तराची अपेक्षा नव्हती. तरीही त्याने तिच्याकडे पाहिलं. तिची नजर जमिनीकडे
रोखलेली होती. एका जुनाट झाडाचं सुकलेलं मूळ वर आलं होतं. बोटाच्या नखाने त्याच्या
आजूबाजूची जागा उकरत ती शांतपणे म्हणाली.
“मला
पुन्हा एकदा तुझं सारंच मान्य आहे. पण हे मूळ पाहतोयस? या भूमीने त्याला अजूनही
उराशी कवटाळून धरलंय. झाड केव्हाच मरून गेलं असेल अथवा उन्मळून पडलं असेल. हे
मूळही बघ ना कसं सुकून गेलंय. तरीही या भूमीने त्याचं अस्तित्व जपलंय. भूमीचा हा
विशेष सांगायला विसरलास तू. आणि एक सांगू. अथांग समुद्राच्या तळाशी काय काय असू
शकेल हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र तरीही एक सत्य नाकारता येणार नाही. अथांग
सागराचा तळ म्हणजे शेवटी भूमीच असते. भूमीच्याच एका विशाल पोकळीत समुद्राचा जन्म
होतो. भूमीच करते प्रसंगी स्वतःला अदृश्य पण ती असते. प्रत्येकाच्या तळाशी.
प्रत्येकाच्या मुळाशी. ती जपते सारंच. साऱ्याचंच जीवन आणि मरणही. ती असतेच रे ती
असतेच.”
तो तिच्याकडे अवाक् होऊन
पहात राहिला. तिची नजर त्या सुकलेल्या मुळावर स्थिरावली होती. बोटं मातीने माखली
होती. आणि चेहऱ्यावर काहीसं गूढ हास्य. आता तो बुचकळ्यात पडला होता. ती भूमीबद्दल
बोलत होती की स्वतःबद्दल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा