बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

नदी...



जर सावकाश चाललात
ती तुम्हाला स्पर्श करेल
धावाल तर सोडून जाईल नदी
आणि सोबत घेतलंत
तर ती येईल चालत चालत अगदी कुठेही
इतकंच कशाला भंगाराच्या दुकानापर्यंतही

सोडून दिलंत
तर ती तिथेच अंधारात
कोट्यावधी ताऱ्यांच्या प्रकाशात
ती शांतपणे रचू लागेल
एक संपूर्ण विश्व
एका छोट्याशा शिंपलीत

सत्य हे आहे
कि तुम्ही कुठेही रहा
तुमच्यावर वर्षाच्या सर्वात कठीण दिवसांतही  
प्रेम करते एक नदी
नदी जी या क्षणी नाहीये या घरात
पण असेल जरूर कुठे ना कुठे
एखाद्या चटई
किंवा फुलदाणीच्या खालून
शांतपणे वाहणारी

कधी ऐका
जेव्हा सारं शहर झोपलेलं असतं
तेव्हा दाराला कान लावून
हळूहळू ऐका
कुठेतरी आजूबाजूला
एखाद्या मादा मगरीच्या कण्हण्याप्रमाणे

ऐकू येईल नदी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा