शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

दलित साहित्य-आजचे क्रांतिविज्ञान : सारग्रहण

दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान हे बाबुराव बागुल यांचे पुस्तक म्हणजे पूर्णतः समीक्षापर लेखन आहे असे म्हणता येणार नाही. या पुस्तकात त्यांचे दलित साहित्यविषयक विचार संकलित करण्यात आले आहेत. यामधे १९८० पूर्वी प्रसिध्द झालेले लेख, स्वागत, इतर पुस्तकांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना, मुलाखती, आणि काही भाषणांचा समावेश आहे. बाबुराव बागुल यांचे दलित साहित्याच्या चळवळीत मोलाचे योगदान आहे त्यामुळे त्यांच्या प्रस्तुत लेखनातून दलित साहित्याविषयीचे मुलभूत चिंतन प्रत्ययास येते. मात्र यातील सर्व लेखन हे संकलित असल्याने यांत अनेक ठिकाणी विचारांची पुनरावृत्तीही दिसून येते.
प्रस्तुत पुस्तकातील पहिलाच लेख म्हणजे काळोखाच्या कैद्याची क्रांतीमान कैफियत! मराठी साहित्यात विविध वाङ्मयप्रकार प्रस्थापित होत असताना दलित साहित्य या वेगळ्या प्रकारची, प्रवाहाची काय गरज आहे ते बागुल स्पष्ट करतात.ते म्हणतात, दलित साहित्य साहित्याची उत्पत्ती ही मराठी साहित्याच्या वैचारिक किंवा ललित शाखेत होत नाही तर ती इथल्या अस्पृश्यतेत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इथे गांधीवाद होता, सर्वोदयवाद होता, समाजवाद होता, कम्युनिझम होतं मात्र काही काळातच सामान्य माणूस हे सर्व विसरून हिंदू असेल तर हिंदू होऊन, मुस्लीम असेल तर मुस्लीम होऊन जातीय दंग्यात सामील होऊ लागला. बागुल म्हणतात हे असचं घडत असतं. जातीयवादी पक्ष भरकन बलवान होतात आणि डावे पक्ष कमकुवत बनतात. याचं कारण म्हणजे एकंदर भारतीय समाज अजूनही आधुनिक होत नाही. याउलट बाबासाहेबांनी घडवलेल्या दलित समाजाने मात्र त्यांच्या भीषण देव-देवता, त्यांचे पूजाप्रकार, जुने पारंपरिक जीवन नाकारले आहे. त्याचे मन नकार, विद्रोह आणि माणुसकीने ठासून भरलेले आहे. अस्पृश्यतेविरोधातल्या या लढ्यातून आणि त्यातून बनलेल्या मना-माणसातून दलित साहित्य जन्माला आले.
या साहित्याचा परामर्श घेताना बागुल काही संदर्भ देतात. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या भाषणांनी आणि निबंधानी प्रभावित झालेला कवीवर्ग, त्यांचे जलसे याचं योगदान सांगून त्यातील प्रचारकी थाटामुळे आलेला एकसुरीपणाही स्पष्ट  करतात. त्यानंतर वर्गकलहाचे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे, अस्पृश्यतेविषयी करुणा निर्माण करणारे शंकरराव खरात यांच्या साहित्यिक योगदानासोबतच पुराणकथांचेही दाखले देतात. हिंदू सामर्थ्यशाहीच्या दुटप्पीपणावर टीका करतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी साहित्यात समाजवाद, मार्क्सवाद, गांधीवाद आला पण केशवसुत आणि हरिभाऊ आपटे यांचे अपवाद वगळता बाकी सारे साहित्य हे सदाशिवपेठीच होते. त्यात दलितांची चित्रणेच आली नव्हती. नंतरच्या काळात अस्पृश्यांची जी चित्रणे आली ती वाचकांना घृणा वाटावी अशीच आहेत. बागुलांच्या मते हा वैरभाव चिरंजीव आहे. अस्पृश्यतेसोबतच त्याचा जन्म झाला आहे. मात्र दलित साहित्याच्या मते जीवनाचा अर्थ एखाद्या वादातून, तत्वांतून, पक्षाच्या जाहीरनाम्यातून लावला तर ते साहित्य एकसुरी बनते. म्हणूनच जीवनाचा अर्थ जीवनाच्या स्वाभाविकपणाने लावावा. एका अर्थी दलित साहित्य म्हणजे वर्णव्यवस्थेच्या काळोखात पिचलेल्या कैद्याची क्रांतीमान कैफियत आहे.
आपल्या पुढील लेखातून बाबुराव दलित साहित्य हेच खरे माणसाचे साहित्य आहे असे प्रतिपादित करतात. आपल्या विधानाची पुष्टी करण्यासाठी ते इतिहासातील यथायोग्य दाखले देतात. गणराज्यांच्या अस्तकाळी वाढत गेलेली युद्धे, त्यातील पराभूतांना आलेले दास्यत्व ते विषद करतात. त्यानंतर त्यांनी शोषणव्यवस्थेच्या स्वभावाचा वेध घेतला आहे. ते म्हणतात, ‘आपल्याला हवी तीच तत्वे जिवंत ठेवणे हे शोषणव्यवस्थेचे स्वाभाविक वैशिष्ट्य असते. म्हणूनच इथल्या शोषणसत्तेने विषमता, अस्पृश्यता जोपासली. त्यावर आधारित विचारांची आणि संस्कृतीची रचना केली. आणि त्यांना विरोध करणाऱ्या तत्वांना एकतर भ्रष्ट केले अथवा नष्ट केले आणि वाढू दिले नाही. सर्व सत्तांनी अस्पृश्यता ही स्वाभाविकता म्हणून स्वीकारली. म्हणूनच ज्या जातक कथांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्यांबरोबरच पशुपक्ष्यांनाही स्थान मिळालं त्या जातककथांमध्ये अंत्यजांपैकी कुणी नायक होऊ शकला नाही.
उच्चवर्णीयांकडे असणारी सत्ता, संपत्ती, सामाजिक वर्चस्व समाजातील दुसऱ्या वर्णाकडे जाऊ नये म्हणून वर्ण आणि जात जन्माधारित करण्यात आली. तसेच आपल्यावर अन्याय का होत आहेत, ते कोण करत आहेत याची जाणीव झाली तर अस्पृश्य विद्रोह करू शकतात हे लक्षात आल्यावर वर्ण आणि समाजव्यवस्था अदृश्य करून न दिसणारा परमेश्वर पुढे करण्यात आला. मोक्ष ही एकट्याने साध्य करण्याची गोष्ट आहे असे सांगत सामुहिक जीवनाचा निषेध करण्यात आला. सत्ता आणि सामर्थ्य असणाऱ्यांना देवत्व देण्यात आलं. तर पराभूतांचं राक्षसीकरण करण्यात आलं. सीता, शूर्पणखा यांसारख्या स्त्रियांची विटंबना दुर्लक्षित करण्यात आली. हे सांगत असतानाच बागुल संस्कृत साहित्यातील एकसुरीपण, आणि संत साहित्याचा मर्यादाही स्पष्ट करतात. इंग्रजी साहित्याच्या परिचयानंतरही बराच काळ मराठी साहित्यात दलितांच्या दुःखांना स्थान मिळाले नाही. आणि महत्वाचे म्हणजे सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या लेखकांनीही या अन्यायाला वाचा फोडली नाही. याचे कारण म्हणजे त्यांचे संस्कार आणि वर्गीय मर्यादा आहे असे बागुल म्हणतात.
मराठवाडा दंगलीचा संदर्भ घेऊन बाबुराव त्यामागील कारणांचा उहापोह करतात. आपल्या या लेखाच्या  सुरवातीलाच ते म्हणतात, दुसऱ्या जातीबद्दल तुच्छता आणि तिरस्कार तर स्वजातीबद्दल प्रेम आणि अहंकार हे हिंदू-मानसिकतेचं वैशिष्ट्य आहे. जातिव्यवस्थेमुळे हिंदू माणूस मानसिकदृष्ट्या अजूनही गुहाजीवनाच्या आसपासच आहे कारण स्वप्रेम आणि परद्वेष ही पशूंची आणि गुहामानवाची वैशिष्ट्ये आहेत. मात्र असे विधान करत असतानाही बागुल जात जपणारी हिंदू मानसिकता असे स्पष्ट करतात. त्यांच्यामते जात जपणारा माणूस हा नेहमीच युद्ध मनस्थितीत असतो. अशा लोकांना भूतकाळ फार प्रिय असतो. इतिहास-पुराणांचा ते सदैव गौरव करतात. पूजन करतात. आणि त्यामुळेच ही माणसे आधुनिकतेचा स्वीकार करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या जातीतील माणूस मह्द्पदाला पोहोचला की त्यांच्या मनात वैरभाव निर्माण होतो. आणि ही पराभूत मनोवृत्तीची माणसे जर राजकीय लोकशाहीचा विकास सामाजिक लोकशाहीकडे होऊ लागला तर प्रसंगी हुकुमशाहीचा स्वीकार करायलाही तयार होतात. त्यामुळे बाबुराव बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील दलितांवर झालेले युद्धसदृश्य हल्ले ही पुढील युद्धाची रंगीत तालीम आहे का? प्रतिकार किती प्रमाणात होतो हे आजमावून पाहिलं जात आहे का? असे महत्वपूर्ण प्रश्नही विचारतात.
भारतातील समाजजीवन हे अजूनही वर्णव्यवस्थेच्या चाकोरीत बंद आहे. अनेक धार्मिक, सामाजिक, आर्थिक कारणांमुळे इथले खेडेन् खेडे खदखदत आहे. अशावेळी कोणतेही लहानसहान निमित्त साधून हे वर्णवादी गट एकतर्फी युद्ध सुरु करतात. बागुलांच्या मते भारतीय संस्कृतीत fascismची बीजे आहेत. fascismचे वर्णन थोडक्यात करायचे झाले तर हिंसक अहंकार आणि इतरांविषयी तिरस्कार असे करता येईल. त्यामुळे इथले fascism म्हणजे हिंदूंची वर्णव्यवस्थाच आहे. विषमता आणि अस्पृश्यता हा इथल्या समाजाचा आत्मा आहे आणि हीच विचारसरणी गुणवत्तेच्या आधारावर कुणाला वर येऊ देत नाही. त्यामुळेच बागुल म्हणतात की जर भारतात इंग्रजांनी लोकशाहीचे तत्त्व आणले नसते, सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून दिली नसती तर कदाचित बाबासाहेबांसारखा द्रष्टा नेता दलित समाजात निर्माणच झाला नसता.
पारंपरिक हिंदू साहित्यानेच जातीवादाला खतपाणी घातले आहे हे स्पष्ट करताना बागुल अन्य धर्मियांच्या पूज्य ग्रंथांचाही आढावा घेतात. ते म्हणतात, ख्रिस्ती धर्मात प्रभू येशूने एका सुताराच्या घरी एका कुमारी मातेच्या पोटी जन्म घेतला. मात्र हिंदूंच्या अनेक देवतांनी अनेक अवतार घेतले असले तरी त्यांच्यापैकी एकालाही एखाद्या अंत्यजाच्या घरी अवतार घ्यावासा का वाटला नाही? ख्रिस्ती समाज आणि साहित्याचा पुराणपुरुष येशू गोरगरिबांना आपल्या करूण कवेत घेत होता. त्यामुळे तेथील लेखक कवींना कार्ल मार्क्सच्या आधीच प्रत्यक्ष परमेश्वराचा आधार मिळाला. त्यामुळेच दलित, श्रमिक, शेतकरी साहित्याचे विषय झाले. मात्र हिंदू साहित्यात असा आधार मिळत नाही. हिंदूंचा प्रत्येक देव विषमतेचा पुरस्कार करताना दिसतो.
ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना दिलेले ज्ञान सर्वांना ऐकता आले मात्र हिंदूंच्या अपौरुषेय वेदांतील ज्ञान शूद्र-अतिशुद्रांपैकी कुणी ऐकले तर त्यास देहदंडाची शिक्षा होत असे. एवढे वेदांमध्ये काय लिहिले होते? तर बागुल म्हणतात, वेदात इंद्राची स्तुती आहे. त्याने आपल्या शत्रूंच्या केलेल्या पराभवाची वर्णने आहेत. हे शत्रू कोण होते हे स्पष्ट करताना संशोधक म्हणतात इंद्राला आणि ऋग्वेदाला शत्रूवत वाटणारे लोक सुसंस्कृत आणि पुढारलेले होते. मात्र वेदातील सुक्तकारांनी ही प्रगत संकृती नष्ट करणाऱ्या इंद्राची निर्भत्सना न करता केवळ गोडवेच गायले. यामागील कारणांचा परामर्श घेताना बागुल म्हणतात, बाहेरून आलेले आर्य आणि स्थानिक आदिवासी आर्येतर यामध्ये भूमीच्या मालकीवरून युद्धे सुरु होती. या युद्धात आर्यांचा पराभव म्हणजे नष्ट होणे किंवा नव्या भूमीच्या शोधात पुन्हा दिशा धुंडाळणे. त्यामुळे ही युद्धे आर्यांसाठी पवित्र ठरली आणि जेत्यांना देवत्व आले. हे साहित्य मुळातच युद्धसाहित्य असल्याने ते पक्षपाती असणे स्वाभाविक आहे.
आपल्या सप्रमाण लेखांच्या शेवटी बाबुराव निष्कर्षाप्रत येताना म्हणतात,हिंदू धर्म, हिंदू धार्मिक आणि ललित  साहित्य ब्राह्मण-क्षत्रियांचे पक्षपाती आहे. विषमतेचा पुरस्कार करणारे आहे व श्रमिक हिंदुना निष्प्रभ करणारे आहे. श्रमिक हिंदुना प्रेरणादायी ठरणारे अनीश्वरवादी, अनात्मवादी, जडवादी तत्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानासाठी ब्राह्मण-क्षत्रियांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे होते म्हणून ते नष्टभ्रष्ट केले गेले.

दलित साहित्य – आजचे क्रांतीविज्ञान या पुस्तकातील लेखांद्वारे बाबुराव बागुलांनी दलित साहित्याच्या उगमप्रेरणेवर अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. दलित साहित्याच्या सच्च्या अभ्यासकाला हे पुस्तक निश्चितच मौल्यवान ठरू शकेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा