रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

टू वीक्स - एक भावनिक थरार



भारतीय इडीयट बॉक्सवरच्या मालिकांमधला तोच तो मेलोड्रामा, तीच ती कथानकं आणि ओढून ताणून वाढवलेले भाग पाहून विटून गेले. चित्रपट पहावे म्हटलं तर त्यातही काही नाविन्य नाही. (काही अपवाद असतात हेही मान्य आहे.) रियालिटी शोमध्ये काहीच रिअल नाही आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये चाललेल्या धांगडधिंग्याला विनोद म्हणवत नाही. अशा स्थितीत मी वळले जरा पूर्वेकडे. (पाश्चात्यांचं आकर्षण तसं कमीच आहे मला.) मग दक्षिण कोरिया, फिलिपाईन्स, जपान, चीन इथले कार्यक्रम पाहणं सुरु झालं आणि मग विरंगुळ्याचा एक वेगळाच मार्ग सापडला. यात सर्वाधिक भावलेल्या काही मालिकांबद्दल लिहिल्याशिवाय राहवलं नाही म्हणून हा लेखनप्रपंच.
टू वीक्स ही अशीच एक मालिका. अवघ्या २० भागात १४ दिवसांतील घटनाक्रम वेगाने उलगडत जातो. हा वेग इतका आहे की आपल्याला झपाटून टाकतो. (२० तासांची ही मालिका मी २ दिवसांत पाहून संपवली.) मालिकेची सुरुवात आयुष्याचा अर्थ हरवून बसलेल्या जांग ताय सनच्या बेफिकीर वागण्याने होते. कुणासाठी आणि का जगायचं हे अनुत्तरीत प्रश्न घेऊन ताय सन दिवस कंठतोय, अविचाराने वागतोय, मृत्यू केव्हाही समोर आला तरी मी मरायला तयार आहे असे सांगत एका पॉन शॉपमध्ये काम करतोय. अचानक ८ वर्षांपूर्वीची त्याची प्रेयसी इन हे त्याला भेटते. गर्भपात करण्यासाठी इन हेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आपण पळ काढला होता हे ताय सनला आठवतं. काही क्षण तो विचलित होतो. इन हे  तिच्या ल्युकेमिया झालेल्या ८ वर्षाच्या मुलीसाठी बोनमॅरो मागण्यासाठी ताय सनकडे आलेली असते. जगात एकट्या पडलेल्या ताय सनची भेट त्याच्या मुलीशी सू जीनशी होते. जीवनात आता एक आशेचा किरण उगवतोय असं वाटत असतानाच इन हे ताय सनला ती संग वू नावाच्या तरुणाशी विवाह करणार असल्याचे सांगते. सू जीनच्या मते तिचे वडील जगात नाहीत, ती संग वूला पिता म्हणून स्वीकारायला तयार आहे हे ऐकून ताय सन पुन्हा एकदा मनातून निराश होतो. सू जीनची सर्जरी २ आठवड्यांनी होणार असते. फक्त २ आठवडे आपल्याला स्वताला जपायला हवं. त्यानंतर कोणत्याही क्षणी आपण मृत्यूला कवटाळू असा निश्चय करून ताय सन हॉस्पिटलमधून बाहेर पडतो.
मात्र त्याचदिवशी काही भ्रष्ट मंत्र्यांकरवी एका खुनाच्या खटल्यात ताय सनला नाहक अडकवलं जातं. त्याला ठार मारण्याचे प्रयत्न होतात. सू जीनसाठी २ आठवडे जगलं पाहिजे या एका जिद्दीने ताय सन कोठडीतून पळून जातो. त्याचा शोध सुरु होतो. पोलीस अधिकारी असणारा संग वू सू जीनच्या सर्जरीसाठी रजेवर गेलेला असतो. मात्र त्याला रजा रद्द करून ताय सनच्या शोधाची जबाबदारी सोपवली जाते. तर जे क्योंग नावाची तरुण प्रोसिक्युटर मात्र ताय सन निर्दोष आहे हे सिद्ध करण्यातही धडपडत असते. ८ वर्षांपूर्वी जे क्योंगच्या वडिलांची हत्या केल्याच्या खोट्या आरोपाखाली ताय सनने शिक्षा भोगलेली असते. मात्र खऱ्या गुन्हेगारांना शासन व्हावं आणि पुन्हा एकदा ताय सनला न केलेल्या गुन्ह्याची सजा मिळू नये यासाठी जे क्योंगचे प्रयत्न सुरु असतात. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ताय सनचा संघर्ष सुरु होतो. सु जीनला बोनमॅरो देणारी व्यक्ती ताय सन आहे हे माहित नसलेला संग वू ही केस लवकरच संपवण्याचा निश्चय करतो आणि त्याच नादात ताय सनवर गोळ्या झाडतो. जखमी झालेला ताय सन दरीत कोसळतो. आणि पुढे काय होतं ते आपण प्रत्यक्षच पाहिलं पाहिजे.
एका अस्तित्त्व हरवलेल्या पित्याचा आपल्या मुलीला नवे जीवन देण्यासाठीचा, एका होणाऱ्या पित्याचा आपल्या भावी मुलीच्या सर्जरीसाठी तिच्या जवळ राहण्यासाठीचा आणि एका मुलीचा आपल्या दिवंगत पित्याला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा संघर्ष आहे. तर आजारी मुलगी, भलत्याच संकटात अडकलेल्या पूर्वायुष्यातील प्रियकर आणि त्याचा मागमूस धुंडाळणारा भावी पती यांच्यात इन हेची होणारी घुसमट आपल्याला अस्वस्थ करते. घट्ट बांधलेलं कथानक, अचूक दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय आणि पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत जाणवणारा ताण आपल्याला खिळवून ठेवतो. दक्षिण कोरियाच नव्हे तर हॉलीवूडमध्येही अॅक्शन हिरो म्हणून नाव कमावलेल्या ली जुंग गीला (रेसिडेंट एविलमधला कमांडर चू आठवतोय का? हाच आहे तो.) हळवा बाप म्हणून पाहणं एक वेगळाच अनुभव आहे. आयरिस या मालिकेत अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स देणाऱ्या किम सो योनने प्रोसिक्युटर म्हणून गुन्हेगारांचा माग काढताना दिलेले अॅक्शन सीन्स बेस्टच. (आपल्या मालिकांमध्ये अॅक्शन सीन्स म्हणजे ?????) याखेरीज रु सू योंग याने रंगवलेला संग वू, सू जीनसाठी त्याची सततची घालमेल, ताय सन आपल्या भावी पत्नीच्या मुलीचा पिता आहे हे कळल्यानंतरही त्याने ताय सनला वाचविण्यासाठी केलेली खटपट, कर्तव्य आणि वैयक्तिक आयुष्य यांचा मेळ घालताना त्याचा उडणारा गोंधळ आपल्याला त्याच्या जागी नेऊन उभा करतो. या सगळ्या घटनाक्रमांचा ताण मनावर असूनही सू जीनच्या समोर हसतमुखाने जाणारी, रोज रात्री गोष्टी सांगणारी ममताळू आई पार्क हा सूनने छान रेखाटली आहे. यांच्याखेरीज संपूर्ण मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा सर्व कलाकारांनी छान निभावल्या आहेत.
मला तरी ही मालिका खूप आवडली. मालिका कोरियन भाषेत असली तरी इंग्रजी सबटायटलच्या आधारे तुम्ही नक्कीच ही मालिका पाहू शकता. तुम्हालाही ही मालिका नक्की आवडेल अशी खात्री आहे.