मंगळवार, ३१ मे, २०१६

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले




पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!
सुरेश भट

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

दंगा




तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट

रिक्त




उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


सुरेश भट

उशीर



हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!

केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!

आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!

होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!

झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


सुरेश भट

पाहिले वळून मला




कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला

तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला

पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?
उगीच लोक खुळे पाहती जळून मला

खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला

उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?
करी अजून खुणा चंद्र मावळून मला

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

सुरेश भट

वणवण




रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो!

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो!

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज न ताराच तो गवसला नेमका..
अंबरापार मी वणवणत राहिलो!
सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!




मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
 
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
सुरेश भट

बुधवार, २७ एप्रिल, २०१६

अतिथी

"मी आजच्या अतिथींना विनंती करतो की, त्यांनी दीप प्रज्वलन करावं....."

अस निवेदक म्हणाला

आणि स्मितहास्य फुललं....
अतिथी. ... !

माझ्याशी महिनाभर आधी बोलून तारीख , वार , वेळ नक्की करून कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केलेला मी "अतिथी " कसा काय ठरलो ??

"तिथी , वार, वेळ न ठरवता जो येतो तो अतिथी "

पण अगदी मोठमोठय़ा कार्यक्रमाच्या पत्रिकेत देखील "प्रमुख अतिथी " अमुक अमुक असं चक्क दहा दिवस आधीच लिहिलेले असतं........असो !

पण खरंच विचार केला तर आजच्या काळ, काम, वेग या बंधनात पुरते गुरफटून घेतलेल्या टेक्नोसेव्ही मोबाईल जगतांत "अतिथी "म्हणून येणं किंवा जाणं शक्य आहे का ? .

पंधरा वीस वर्षापूर्वी ही मजा नक्कीच होती.
"कालपासून तुझी सारखी आठवण येत होती आणि आज तू हजर ", असं म्हणताना तो खुललेला चेहरा दिसायचा "
"आलो होतो जरा या बाजूला, बरेच दिवस भेट नाही..."

"तुमच्या हातची थालीपीठांची आठवण झाली, चला तेवढंच निमित्त..."
"बसा हो भावोजी, कांदा चिरलेलाच आहे. दहा मिनिटांत थालिपीठ देते आणि आज दहीही फार सुरेख लागलंय हो, आलेच "

असा संवाद जर आज ऐकवला तर, "बापरे !!! किती मॅनर्सलेसपणे वागत होती माणसं ? न कळवता असे कसे कोणाच्या दारात उभी ठाकू शकतात ? भयंकर आहे."
अशा प्रतिक्रिया नक्कीच येतील

कारण अतिथी परंपरा आता कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती हद्दपार होणे किती महत्वाचे आहे, हे आम्हाला पटले आहे.

आम्ही स्वतःभोवती एक सोयीस्कर लहानसं वर्तुळ आखून घेतलंय. त्या परिघामध्ये उपयुक्ततेनुसार माणसं वाढतात किंवा कमी होतात ....

"येतोय".."निघालोय". .." बस मिळाली" .."ट्रेन पकडतोय"..."लिफ्टमधे आहे"... अशा अपडेशनमधे कोठेतरी अचानक मिळणारा भेटीचा सुखद धक्का हरवून गेलाय .......

परवा मुलीने "अतिथी देवो भव"चा अर्थ विचारला...
तिच्याच भाषेत सांगायचं म्हणून म्हटलं, "outdated software आहे. हे आता नाही कुठे install कुणी करत ..........."

एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला न सांगता, न कळवता, भेटून तर पहा.....

old version किती user friendly होतं, याचा अनुभव नक्कीच येईल .

बट सांजेची ढळता ढळता

बट सांजेची ढळता ढळता,
यमुनेकाठी सजते राधा...
सावळ ओठी घुमता पावा,
कण कण होते विरते राधा...

उनाड वारा पदर छेडतो,
अन वाटेवर पाय घसरतो...
घट डोईचा जपता जपता,
अंगोपांगी भिजते राधा...

संसाराच्या पडद्यावरती,
जरी भूमिका वेगवेगळ्या...
तरी लाघवी, अल्लड, अवखळ,
प्रत्येकीतच असते राधा...

कधी साधिका कधी प्रेमिका,
विरक्त देही अभिसारीका...
क्षणी गजल की क्षणात गाथा,
कोणाला ना कळते राधा...

फुलात अत्तर, दुधात साखर,
असेच मीलन जिवाशिवाचे...
तुझ्या अंतरी रुजता रुजता,
कुठे निराळी उरते राधा?

कृष्ण गोंदला जणू मनाला,
आणि तनाला गोकुळ बेडी...
सगळ्यांसाठी जळता जळता,
भक्तीसाठी विझते राधा!

ती

तिनं उद्वेगानं कपाट उघडलं
घाईत कोंबलेले काही निषेध
भराभरा काढून फेकले माझ्यासमोर,
कप्प्यात घड़ी करून ठेवलेले
काही बोचरे प्रसंग
एक एक करून उलगड़त गेली ती,
ठेवणीतल्या घायाळ घटनांना
कपाटातून काढतांना
ओक्साबोक्शी रडत कोसळली ती ---

तिला मिठीत घेत मी म्हटलं,
' वेडाबाई, हे कपाट सोन्याचं आहे,
यात असल्या प्रसंगांचा
कचरा नसतो ठेवायचा ,
रेशमी मिठीच्या तलम घड्यांची
चळत नीट रचून ठेवायची असते '

----- डोळे पुसत तीही गोड हसली !

बुधवार, २० एप्रिल, २०१६

काही वाचलेले… काही वेचलेले… १

बातमी
दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.
*****************************
नवकथा
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.
************************************
नवकविता
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी
अंग चोरून पडलेली
वडे तळणाऱ्या माणसाच्या
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुर्र
ही खरी घामाची कमाई
पुढ्यातल्या
टवका गेलेल्या बशीतला
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात येउन गेलं
उगाचच
*****************************************
ललित
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.
'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं.
'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!
******************************************
शामची आई व्हर्जन
'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'
******************************************
जी ए व्हर्जन
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.
************************************************
गो. नि. दांडेकर व्हर्जन
हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?
*******************************************
ग्रेस व्हर्जन
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!

सोमवार, १४ मार्च, २०१६

ओठ


तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?
आज का तुला माझे एव्हढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा ?
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा ?
बोलली मिठी माझी - ' दे प्रकाश थोडासा'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा ?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे ?
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा ?
चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ?
(एल्गार)
सुरेश भट

बोलणी


आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती

(एल्गार)
सुरेश भट

जगत मी आलो असा


जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
(रंग माझा वेगळा  ह्या काव्यसंग्रहातून)
सुरेश भट

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

(एल्गार)
सुरेश भट

ऊन हिवाळयांतील शिरशिरतां


ऊन हिवाळयांतील शिरशिरतां
स्थितप्रज्ञ काळया दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.
ऊन हिवाळयांतील हळदीचें
किरीट घालतें वृध्द वडावर!
मला वाटतें तळयांत पाहुन
हात फिरवतो तो दाढीवर !
ऊन हिवाळयातील कुडकुडतें,
कुशींत शिरतें दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झ-याचा फुटतो पाझर.
ऊन हिवाळयांतील भुळभुळतें
आजीच्या उघडया पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमतें आपण
पुन्हा जरीचा ल्यालों परकर!
ऊन हिवाळयांतील हिरमुसतें
रुसतें, अन् माळावर बसतें;
मला वाटते त्यालाही पण
असेंच भलतें वाटत असते.

विंदा करंदीकर

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे


या स्वप्नांचे शिल्पकार
कवी थोडे; कवडे फार.
पडद्यावरच्या भूतचेष्टा:
शिळा शोक, बुळा विनोद
भ्रष्ट कथा, नष्ट बोध;
नऊ धागे, एक रंग;
व्यभिचाराचे सारे ढंग!
पुन्हा पुन्हा तेच भोग;
आसक्तीचा तोच रोग.
तेच 'मंदिर', तीच 'मूर्ति';
तीच 'फुलें', तीच 'स्फूर्ती'
तेच ओठ, तेच डोळे;
तेच मुरके, तेच चाळे;
तोच 'पलंग', तीच 'नारी';
सतार नव्हे, एकतारी!
करीन म्हटले आत्महत्या;
रोमिओची आत्महत्या;
दधीचीची आत्महत्या!
आत्महत्याही तीच ती!
आत्माही तोच तो;
हत्याही तीच ती;
कारण जीवनही तेंच तें!
आणि मरणही तेंच तें!

विंदा करंदीकर

तेंच तें


सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!
माकडछाप दंतमंजन;
तोच चहा, तेच रंजन;
तीच गाणी, तेच तराणे;
तेच मूर्ख, तेच शहाणे;
सकाळपासून रात्रीपर्यंत
तेंच तें! तेंच तें!
खानावळीही बदलून पाहिल्या;
(जीभ बदलणे शक्य नव्हते!)
'काकू'पासून 'ताजमहाल'
सगळीकडे सारखेच हाल.
नरम मसाला, गरम मसाला;
तोच तोच भाजीपाला;
तीच तीच खवट चटणी;
तेंच तेंच आंबट सार;
सूख थोडे; दुःख फार!

विंदा करंदीकर

बेडकांचे गाणे


डरांव् डुरुक् डरांव् डुरुक्,
डरांव् डुरुक्
आम्ही मोठे राव;
डरांव् डरांव् डरांव्!
सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा!
सागर नुसते नाव;
डरांव् डरांव् डरांव्!
गंगाजळ ना याहुन निर्मळ;
या डबक्यांहुन सर्व अमंगळ;
बेडुक तितुके साव;
डरांव् डरांव् डरांव्!
खोल असे ना याहुन काही;
अफाट दुसरे जगांत नाही;
हाच सुखाचा गाव;
डरांव् डरांव् डरांव्!
चिखल सभोंती अमुच्या सुंदर;
शेवाळ कसे दिसे मनोहर;
स्वर्ग न दुसरा राव;
डरांव् डरांव् डरांव्!
मंत्र आमुचा 'डरांव्'
आदी,'अनंत' आणिक असे 'अनादी',
अर्थ कसा तो लाव; डरांव् डरांव् डरांव्!

विंदा करंदीकर

समतेचे हे तुफान


उठलेऊठ ऊठ सह्याद्रे, घुमवित बोल मराठी खडे;
समतेचे हे तुफान उठले; उठले सागराकडे.
हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी;
शिवबाने तरवार घासली याच मराठीवरी;
हिच्या स्वागतासाठी झडले तोफांचे चौघडे.
टिळक, गोखले, फुले, रानडे, आगरकर वैखरी -
स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी;
ह्या ज्योतीवर दीप पेटवा चला भविष्याकडे.
स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे,
तेच मराठे आम्ही;
आम्ही सह्याद्रीचे सुळे;
स्वराज्यांतुनी पुढे चला रे, चला सुराज्याकडे.
दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्रअंगना
कंकणनादा भिउनी तयांच्या शत्रु सोडिती रणा;
वीज माळुनी वेणीवरती त्याही घुसल्या पुढे.
ऊठ खेडुता, पुन्हा एकदा झाडुनिया घोंगडी;
ऊठ मजुरा, पुन्हा मारण्या आघाडीवर उडी;
एकजूट ही पाहुन पडतिल अन्यायाला तडे.

विंदा करंदीकर

तीर्थाटण


तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी;
अन् तुझिया देहांत गवसली सखये मज तीर्थें सारी.
अधरावरती तव वृंदावन;प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानस सर.
मानेवरती गंगोत्री;
गया तुझ्या गालांत मिळाली;
रामेश्वर खांद्यावरती;
मिळे द्वारका कमरेपाशी अन् काशी अवतीभवती.
मोक्षाचीही नुरली इच्छा;
नको कृपा याहुन दुसरी;
तीर्थाटण मी करित पोचलो नकळत शेवट तव दारी.

विंदा करंदीकर

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

आस निरसली गोविंदाचे भेटी

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥
पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देउनि चपळा हाती गुढी ॥२॥
हाका आरोळिया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥३॥
आरंधी पडिली होती तया घरी । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥४॥
लोका भूक तान नाही निद्रा डोळा । रूप वेळोवेळा आठविती ॥५॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधी ठावा तया नाही कोणा ॥६॥
आधी चुकी मग घडे आठवण । तुका म्हणे जन परिचये ॥७॥

आला त्यांचा भाव देवाचिया मना

आला त्यांचा भाव देवाचिया मना । अंतरी कारणासाठी होता ॥१॥
होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधी ॥२॥
आधी पाठीमोरी जाली तीसकळे । मग या गोपाळे बुडी दिली ॥३॥
दिली हाक त्याणे जाऊनि पाताळा । जागविले काळा भुजंगासी ॥४॥
भुजंग हा होता निजला मंदिरी । निर्भर अंतरी गर्वनिधी ॥५॥
गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचे ॥६॥
चेंडुवाचे मिसे काळया नाथावा । तुका म्हणे देवा कारण हे ॥७॥

आम्ही हरिचे सवंगडे

आम्ही हरिचे सवंगडे । जुने ठायीचे वेडे बागडे । 
हाती धरुनी कडे । पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई ।
वानरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण। 
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

आम्ही वैकुंठवासी

आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी । 
बोलिले जे ॠषी । साच भावे वर्तावया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।
 विषयलोभी मन । साधने बुडविली ॥२॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥
 
पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
 तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ॥३॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । 
उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृ॥

आपुलाल्यापरी करितील सेवा

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥
खेळ मांडियेला यमुने पाबळी । या रे चेंडुफळी खेळू आता ॥२॥
आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वाटी गडिया गडी ॥३॥
गडी जव पाहे आपणासमान । नाही नारायण म्हणे दुजा ॥४॥
जाणोनि गोविंदे सकळांचा भाव । तयांसी उपाव तो चि सांगे ॥५॥
सांगे सकळांसी व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥
मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुती हाल माझी ॥७॥
माझे हाके हाक मेळवा सकळ । न वजा बरळ एकमेका ॥८॥
एका समतुके अवघेचि राहा । जाईल तो पाहा धरा चेंडू ॥९॥
चेंडू धरा ऐसे सांगतो सकळा । आपण निराळा एकला चि ॥१०॥
चिंतूनिया चेंडू हाणे ऊर्ध्वमुखे । ठेली सकळिक पाहात चि ॥११॥
पाहात चि ठेली न चलता काही । येरू लवलाही म्हणे धरा ॥१२॥
धरावा तयाने त्याचे बळ ज्यासि । येरा आणिकांसी लाग नव्हे ॥१३॥
नव्हे काम बळ बुध्दि नाही त्याचे । न धरवे निचे उंचाविण ॥१४॥
विचारी पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागे ॥१५॥
मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥
चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनिया ॥१७॥
या मागे जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठाया ॥१८॥
पंथ जे चुकले आपले मतीचे । तया मागे त्याचे ते चि हाल ॥१९॥
हाल दोघा एक मोहरा मागिला । चालता चुकला वाट पंथ ॥२०॥
पंथ पुढिलांसी चालता न कळे । मागिलांनी डोळे उघडावे ॥२१॥
वयाचा प्रबोध विचार ज्या नाही । समान तो देही बाळकांसी ॥२२॥
सिकविले हित नायिके जो कानी । त्यामागे भल्यांनी जाऊ नये ॥२३॥
नये ते चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥२४॥
रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥
लाज सांडूनिया मारितील हाका । कळले नायका वैकुंठीच्या ॥२६॥
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची ॥२७॥
गोपाळांचा धांवा आइकिला कानी । सोयी चक्रपाणि पालविले ॥२८॥
साया धरूनिया आले हरिपासी । लहान थोरांसी सांभाळिले ॥२९॥
सांभाळिले तुका म्हणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखे॥३०॥

तुकाराम 

अवघी भूते साम्या आली

अवघी भूते साम्या आली देखिली म्या कै होती॥१॥
विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

माझी कोणी धरो शंका हो का लोका निर्द्वंद्व ॥२॥

विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे ॥३॥

विश्वास तो खरा मग पांडुरंगकृपेचा ॥धृ॥

तुकाराम