बुधवार, २० एप्रिल, २०१६

काही वाचलेले… काही वेचलेले… १

बातमी
दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.
*****************************
नवकथा
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.
************************************
नवकविता
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी
अंग चोरून पडलेली
वडे तळणाऱ्या माणसाच्या
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुर्र
ही खरी घामाची कमाई
पुढ्यातल्या
टवका गेलेल्या बशीतला
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात येउन गेलं
उगाचच
*****************************************
ललित
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.
'वडा-पाव द्या हो एक' मी म्हटलं.
'एक का, चार घ्या की', मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!
******************************************
शामची आई व्हर्जन
'शाम, बाळ खा हो तो वडा-पाव', पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, 'अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!'
******************************************
जी ए व्हर्जन
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.
************************************************
गो. नि. दांडेकर व्हर्जन
हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, 'आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो'. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?
*******************************************
ग्रेस व्हर्जन
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा!

1 टिप्पणी:

  1. हे प्रयोग छानच आहेत.

    तुमच्या लिखाणाची प्रेरणा वेगळी आहे.

    विषयांचे वैविध्य आहे आणि त्यातील बव्हंशी समर्पक

    उत्तर द्याहटवा