मंगळवार, ३१ मे, २०१६

पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले




पुन्हा स्मशानी घडायचे ते घडून गेले
चितेवरी लोक जे नको ते रडून गेले

दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी?
कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले

अरे, नसे हा सवाल माझ्याच आसवांचा
युगायुगांचे रुमाल सारे सडून गेले!

करु तरी काय सांग माझ्या कलंदरीचे?
कसा फिरु? आसवांत रस्ते बुडून गेले!

कुणाकुणाची कितीकिती खंत बाळगू मी?
अताच आयुष्यही शिवी हासडून गेले!

सुगंध तो कालचा तुला मी कुठून देऊ?
अखेरचे थेंब अत्तराचे उडून गेले!
सुरेश भट

आज बेडा पार पांडू!



आज होळीला कशाला हिंडशी बेकार पांडू?
जो तुला भेटेल नेता, त्यास जोडे मार पांडू!
दूर नाही राहिलेली राजसत्तेची लढाई,
एरवी, होतास बाबा तू कुणाला प्यार पांडू?
वीज कोठे? आढळेना आपल्या राज्यात 'पाणी',
राहिला हा घोषणांचा तेवढा अंधार पांडू!
संपला आता जमाना दुश्मनी टाळावयाचा,
आपुल्या भीतीवरी तू मार आता धार पांडू!
भाड खाण्याचेच ज्यांनी भक्तिभावे काम केले,
हे कशासाठी तयांचे चालले 'सत्कार' पांडू?
आजची न्यारीच होळी! पाज तू साहित्यिकांना...
तेवढा नाहीस का तू काय 'दर्जेदार' पांडू?
जाण तू आता नवे हे अर्थ शब्दांचे नव्याने,
हीच आहे देशसेवा! हा न भ्रष्टाचार पांडू!
पोसलेले 'संत' केव्हा राहती बाबा उपाशी?
जे असे मोकाट त्यांचे लाड झाले फार पांडू!
घालतो हल्ली शहाणा देवही अर्धीच चड्डी
अर्धचड्डीनेच होई आज बेडा पार पांडू!
काय मंत्री ठेवण्याचे हे नवे गोदाम आहे?
शोध या मंत्रालयी तू फक्त 'गांधी-बार' पांडू!
शेवटी सारेच झाले पक्ष एका लायकीचे!
आपुल्या ह्या भारताला कोणता आधार पांडू?
सोसणार्‍याच्या भुकेला 'जात' कैसी? 'धर्म' कैसा?
हा कशाचा धर्म ज्याचा होतसे व्यापार पांडू?
ही महागाई अशी अन् ही कशी होळी कळेना,
बोंबले हा देश सारा, बोंब तूही मार पांडू!

सुरेश भट

दंगा




तू दिलेले दान मी स्वीकारले कोठे?
एवढेही मी मनाला मारले कोठे?
ही तयारी स्वागताची कोणती आहे?
या स्मशानाला तुम्ही श्रृंगारले कोठे?
नेमका माझाच त्यांना राग का आला?
मी कुणाचे नावही उच्चारले कोठे?
एवढी गोडी तुझ्या ओठांत का आली?
गोड का बोले कुणाशी कारले कोठे?
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई...
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
मी कधी जाहीर केली आसवे माझी ?
दुःख हे माझेच मी गोंजारले कोठे?
मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही,
आपुले संबंध मी नाकारले कोठे?
हा मला आता नको पाऊस प्रेमाचा
मोडके आयुष्य मी शाकारले कोठे?
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
सुरेश भट

रिक्त




उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


सुरेश भट

उशीर



हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!

केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!

आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!

तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!

होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!

झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!


सुरेश भट

पाहिले वळून मला




कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला

तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही?
मिळेल काय असे दूरही पळून मला

पुसू कुणास कुठे राख राहिली माझी?
उगीच लोक खुळे पाहती जळून मला

खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?

जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
अजून घेत रहा जीवला पिळून मला

उजाडलेच कसे? ही उन्हे कशी आली?
करी अजून खुणा चंद्र मावळून मला

कधीच हाक तुझी हाय ऐकली नाही
अखेर मीच पुन्हा पाहिले वळून मला

सुरेश भट

वणवण




रुणझुणत राहिलो! किणकिणत राहिलो!
जन्मभर मी तुला 'ये' म्हणत राहिलो!

सांत्वनांना तरी हृदय होते कुठे?
रोज माझेच मी मन चिणत राहिलो!

ऐकणारे तिथे दगड होते जरी,
मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो!

शेवटी राहिले घर सुनेच्या सुने...
उंबऱ्यावरच मी तणतणत राहिलो!

ऐनवेळी उभे गाव झाले मुके;
मीच रस्त्यावरी खणखणत राहिलो!

विझत होते जरी दीप भवतालचे,
आतल्या आत मी मिणमिणत राहिलो!

दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा रणरणत राहिलो!

मज न ताराच तो गवसला नेमका..
अंबरापार मी वणवणत राहिलो!
सुरेश भट

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!




मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल!
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!

मी फिरेन दूर दूर
तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!

विसरशील सर्व सर्व
अपुले रोमांचपर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!

सहज कधी तू घरात
 
लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!

जेव्हा तू नाहशील,
दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!

जेव्हा रात्री कुशीत
माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतून गुणगुणेल!

मग सुटेल मंद मंद
वासंतिक पवन धुद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
सुरेश भट