शुक्रवार, २२ मे, २०१५

श्री कनकादित्य मंदिर कशेळी

          कशेळी गावचे भुषण असलेले श्री कनकादित्य मंदिर रत्नागिरी पासून ३२ आणि राजापुरपासून ३५ किमी अंतरावर आहे. आपल्या भारतात फार कमी सूर्यमंदिर आहेत. सौराष्ट्रात प्रभासपट्टण उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या भागात काही सूर्यमंदिर आहेत.

          रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर तालुक्यातील हे सर्वात मोठे देवालय गावच्या मध्यभागी विस्तिर्ण सपाट प्रदेशात बांधले आहे. या मंदिराला उज्ज्वल अशी ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभली आहे. मंदिरात जी आदित्याची मूर्ती आहे ती सुमारे आठशे वर्षापूर्वी सोमनाथ नजिकच्या सूर्यमंदिरातून आणली गेली आहे. कशेळी गावात श्री कनकादित्य मूर्तीचे आगमन कसे झाले याबद्दल मंदिराच्या पुजारींनी एक दंतकथा सांगितली ती अशी की काठेवाडीतील वेटावळ बंदरातून एक नावाडी आपला माल घेऊन दक्षिणेकडे चालला होता त्याच्या जहाजामध्ये हि आदित्याची मूर्ती होती जहाज कशेळी गावच्या समुद्रकिनारी आले असता अचानक थांबले. खूप प्रयत्न केला पण जहाज मागेही जाईना आणि पुढेही जाईना. शेवटी नावाड्याच्या मनात आले कि जहाजात जी आदित्याची मूर्ती आहे तिला इथेच स्थायिक होण्याची इच्छा दिसते. मग त्याने ती मूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका नैसर्गिक गुहेत आणून ठेवली आणि काय आश्चर्य! बंद पडलेले ते जहाज लगेचच चालू झाले.

          कशेळी गावात पूर्वी कनका नावाची एक थोर सूर्योपासक गणिका राहत होती. एकदा तिच्या स्वप्नात सूर्यनारायणाने येऊन सांगितले की मी समुद्रकिनारी एका गुहेत आहे तु मला गावात नेऊन माझी स्थापना कर. कनकेने हि हकिकत गावात सांगितली. गावकर्यांनी समुद्रावर जाऊन शोध घेतला असता आदित्याची हि मूर्ती गुहेत सापडली. पुढे कनकेने गावकर्यांच्या मदतीने मंदिर बांधून तीची स्थापना केली. कनकेच्या नावावरुनच या मंदिराला "कनकादित्य" आणि ज्या गुहेत आदित्याची हि मूर्ती सापडली ती गुहा "देवाची खोली" म्हणून ओळखली जाते.
          रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व पुरातन महत्त्व असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी देशातील विविध भागातून लोक येतात. चारही बाजुला भक्कम चिरेबंदी असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात इतर देवदेवतांचीही सुबक मंदिरे आहेत. कोकणातील इतर देवलयाप्रमाणेच श्री कनकादित्यचे मंदिरही कौलारू आहे. मंदिर परिसरातील दीपमाळा, फरसबंदी पटांगण, शांत वातावरण यामुळे मंदिर पाहताक्षणी मन प्रसन्न होते. मंदिरात कोरीव कलाकुसर केली असून ते पुराणकालीन आहे. छतावर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून श्री कनकादित्याची मूर्ती हि अतिशय आकर्षक आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून देवस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.

         पन्हाळगडाचा राजा शिलाहार याने कशेळी गावात दररोज बारा ब्राह्मणांना भोजन घालण्यासाठी येनाऱ्या खर्चाकरीता गोविंद भट भागवतांना कशेळी गाव इनाम दिला. त्याबद्दलचा ताम्रपट आजही मंदिरात पाहवयास मिळतो. गोविंद भट श्री कनकादित्याचे पुजारी होते. आजही श्री कनकादित्याच्या पुजेचा मान त्यांच्या घराण्याला दिला जातो. अशा या पुरातन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिल्याचे सांगितले जाते. तसेच इतिहासाचार्य राजवाडे, महोपध्याय दत्तो वामन पोतदार, प्राध्यापक गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी यांचीही श्री कनकादित्यावर श्रद्धा होती. दरवर्षी रथसप्तमीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. पाच दिवस साजरा होणार्या या उत्सवाच्या काळात कालिकावाडी येथून कालिकादेवीला वाजत गाजत गावात आणून देविचा मुखवटा श्री कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो कालिकादेवीबरोबर आडिवर्याची भगवती देवी हि तिची पाठराखीण म्हणून चार दिवस मुक्कामाला येथे येते. उत्सवाच्या काळात किर्तन, प्रवचन आरती, पालखी याचे आयोजन केले जाते. मंदिराचे कामकाज पाहणारे बारा जणांचे विश्वस्त मंडळ या कार्यक्रमाचे चोख आयोजन करतात.

कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी (३2 किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे, कशेळी (35किमी)

गुरुवार, २१ मे, २०१५

आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर


कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण असेलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८ किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापुर तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन स्थळ  म्हणून प्रसिद्ध होत आहे.
आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर". त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची
स्थापना केली.

मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी, प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शनघेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे सापडतात. दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा या जागृत देवस्थानाला व नितांत सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या.

कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर -
रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे ( २८ किमी)

साने गुरुजी

जन्म : २४ डिसेंबर १८९९
मृत्यू : ११ जून १९५०

        
           पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई ’ या पुस्तकातून केले आहे. ‘ खरा धर्म आणि बलसागर भारत होवो ’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते.

          १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

रविवार, १७ मे, २०१५

भारताच्या मान्सूनवर एल निनोचे सावट

         पाणीटंचाईने पोळलेल्या आणि कडक उन्हाने होरपळलेल्या साऱ्यांनाच मान्सून वेळेआधीच दाखल होणार या बातमीने दिलासा दिला होता मात्र यंदाच्या मान्सूनवर लटकणारी एल निनोची तलवार कायम असून वेळेआधी येणारा मान्सून समाधानकारक बरसणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. 

         भारताच्या हवामानशास्त्र विभागाने मान्सून १ जूनलाच केरळमध्ये दाखल होत असल्याचे जाहीर केले असले तरी एल निनो प्रवाहांचा धोकाही वर्तवला आहे. एल निनो हे प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह असून महासागराच्या पृष्ठभागाखालील तापमानाच्या वाढीमुळे त्यांची निर्मिती होत असते. या एल निनो प्रवाहांचा प्रभाव भारतातील मान्सूनवर प्रामुख्याने जाणवतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एल निनो सध्या विकासात्मक प्रक्रियेत असून येत्या महिन्यात तो मजबूत होण्याची चिन्हे आहेत. आजवर उद्भवलेल्या एल निनोमुळे भारतातील मान्सूनवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येते. एल निनोमुळे मान्सूनच्या सरसरीत घट होऊन अवर्षणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

          शास्त्रज्ञांच्या मते एल निनोच्या निर्मितीचा ठराविक काळ सांगता येणे शक्य नाही. मात्र दर २ ते ७ वर्षांनी तो निर्माण होतो. त्याचा परिणाम महासागरांच्या जवळ असणाऱ्या देशांच्या पर्जन्यवृष्टीवर पडतो. २००९ हे एल निनोचे वर्ष होते. त्यावर्षी भारतात तब्बल २२ टक्के कमी पाऊस पडला. ज्यामुळे दुष्काळ निर्माण झाला होता. त्यापूर्वीही एल निनोच्या प्रभावामुळे १९७२ साली २४ टक्के, १९८७ साली १३ टक्के, २००२ साली १९.२ टक्के कमी पाऊस पडल्याचे दिसून येते. राज्यातील ८० टक्के शेतीचे भवितव्य हे जून ते ऑक्टोबर दरम्यान पडणार्या पावसावर अवलंबून असते. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे या काळातील पावसाची सरासरी केवळ ९३ टक्केच राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र खात्याने वर्तवला आहे. तसेच जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठा खंड पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भाताच्या रोपवाटिका २ किंवा ३ टप्प्यात लावाव्यात, किंवा वेळ पडल्यास भाताची रोपे दापोग पद्धतीने तयार करावीत. काही भागात दुबार पेरणीची गरज पडल्यास अधिक बियाणाची तरतूद करावी अशा सूचना देण्यात आल्या अहेत. एल निनोमुळे भूगर्भीय जलाची पातळी खालावण्याची शक्यता अहे. त्यामुळे भविष्यात भीषण पाणी टंचाई जाणवू शकते. तर वैश्विक उष्मावृद्धीमुळे  हिमनग वितळू लागल्यास समुद्राची पातळी वाढून किनारपट्टयाही धोक्यात येऊ शकतात. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे तर स्कायमेट या खाजगी हवामानशास्त्र कंपनीने मात्र एल निनोच्या घडामोडी या सूक्ष्म स्वरूपाच्या असून त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या नैऋत्य मान्सूनवर होणार नसल्याचे सांगितले आहे त्याचप्रमाणे यावर्षी १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटचे उपाध्यक्ष जी पी शर्मा यांनी व्यक्त केली आहे.