सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

साहित्याचे स्वरूप आणि समीक्षेच्या चार पातळ्या

कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या साहित्यकृतीविषयी आपल्या मनात काही न काही अभिप्राय तयार होत असतो मात्र प्रत्येक अभिप्रायाला आपण समीक्षा म्हणत नाही. तर सामिक्षेकरीता आपला अभिप्रायह सार्वत्रिक निकषांवर आधारित असावा लागतो, तरच तो अधिक तर्कशुद्ध आणि व्यापक स्वरूपाचा होतो. तसेच तो साहित्यकृतीचे स्वरूप, कार्य, सौंदर्य आदींच्या दृष्टीने प्रस्तुत आणि यथोचित शब्दांतून व्यक्त व्हावा लागतो. यावरून आपल्याला साहित्यसमीक्षेची एक स्थूल व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल:
“सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा, यथोचित शब्दांतून व्यक्त होणारा, साहित्याविषयीचा मुल्यगर्भ आणि ज्ञानगर्भ अभिप्राय म्हणजे समीक्षा”
साहित्यसमीक्षा एक व्यापक स्वरुपाची प्रवाही प्रक्रिया असून त्यात साहित्यकृतीचे वाचन, विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि मूल्यमापन ही प्रमुख अंगे सामावलेली असतात. समीक्षेच्या चिंतनशील व्यापारात कल्पनाशक्ती व स्वयंप्रज्ञा कार्यशील असतात. त्या साहित्यकृतीचे सौंदर्यमूल्य जाणून घेण्यात आणि निर्माण करण्याच्या कामात साह्यभूत होतात. समीक्षाव्यापाराचे हे अनेकांगी प्रवाही स्वरूप काय आहे हे साकल्याने पाहिल्याशिवाय सुविकसित, प्रगल्भ समीक्षेची संकल्पना सुस्पष्ट होणार नाही. तसेच ज्या साहित्यकृतीची समीक्षा करावयाची तिचे स्वरूप कसे असते याची जाण समीक्षकाला असावी लागते. त्यामुळे समीक्षेच्या पातळ्या पाहण्यापूर्वी साहित्याचे स्वरूप कसे असते ते पाहू.

साहित्याचे स्वरूप:
साहित्याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी साहित्यकृतीच्या प्रमुख अंगांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. प्रा. गंगाधर पाटील यांच्यामते साहित्यकृतीला सात अंगे असतात. ती पुढीलप्रमाणे:
१)       साहित्यकृती ही शब्दांनी बनलेली असते. शब्दांचे ध्वनिरूप, अर्थरूप आणि वाक्यविन्यासात्मक रूप घटकांनी तिची घडण होते. हे भाषिक अंग होय.
२)       या भाषिक अंगातून तिचे अर्थात्मक किंवा आशयात्मक अंग प्रकट होत असते. हा आशय मानसिक किंवा सामाजिक असू शकतो.
३)       साहित्यकृती ही शब्दबंध, वाक्यबंध, प्रतीमाबंध, चरण, कडवी, कथाबीज, कथानक, पात्रे आदी अनेक घटकांनी मिळून एकात्म, संघटीत झालेली असते. त्यामुळे तिला एकजिनसी संघटन किंवा सेंद्रिय समष्टी प्राप्त झालेली असते, हे तिचे रूपबंधात्मक किंवा संरचनात्मक अंग होय.
४)       साहित्यकृतीत घटना, कथानक, पात्रे, प्रतिमा आदी गोष्टींतून शब्दार्थजनित असे एक कल्पित विश्व तयार केलेले असते. ते कल्पकतापूर्ण अंग होय.
५)       प्रत्येक साहित्यकृती हि कोणत्या ना कोणत्या प्रकारात मोडत असते. प्रत्येक साहित्यप्रकाराचे विशिष्ठ संकेतसंच असतात. या प्रकारे प्रत्येकसाहित्यकृतीला प्रकारात्मक अंग असते.
६)       प्रत्येक साहित्यकृती ही एक सौंदर्यपूर्ण कलाकृती मानली जाते. म्हणजेच साहित्यकृतीला सौंदर्यात्मक / कलात्मक अंग असते.
७)       साहित्यकृतीला स्वयंपूर्ण, स्वायत्त, अनन्य स्वरूपाचे अस्तित्व असते. हे तिचे अस्तित्वात्मक किंवा सत्ताशास्त्रीय अंग होय.
साहित्यकृती’ची समीक्षा करत असताना समीक्षकाला या सात अंगांची यथोचित जाण असणे गरजेचे असते.

समीक्षेच्या चार पातळ्या:
१)       वाचन :
साहित्यकृतीच्या विशिष्ठ स्वरूपाचे ज्ञान आपल्याला तिच्या वाचनातूनच होते. साहित्यकृतीचे वाचन केल्याशिवाय तिचे आकलन होऊच शकत नाही. आणि आकलनाशिवाय समीक्षाही होऊ शकत नाही. वाचनासंबंधी अंग्लो अमेरिकन नवसमीक्षकांची एक भूमिका आहे. त्यांच्यामते साहित्यकृती ही एक स्वायत्त, स्वयंपूर्ण वस्तू आहे. तिचे वाचन करताना वाचकाला तिचा काव्यार्थ अंतःप्रेरणेने कळतो. साहित्यकृतीचे वाचन हा एकप्रकारचा अनुभव असतो. हा अनुभव घेण्यासाठी त्याच्याकडे पुढील क्षमता असणे गरजेचे असते.
१)       भाषिक ज्ञानक्षमता:
नेहमीच्या भाषिक व्यवहारात सहभागी होत असताना आपण आपल्या भाषेचे संकेत, व्याकरण, कळत-नकळत यत्नायत्नपूर्वक आत्मसात करत असतो. या ‘भाषिक ज्ञाना’ला नोएम चोम्स्की या भाषावैज्ञानिकाने ‘भाषिक ज्ञानक्षमता’ असे संबोधले आहे. या भाषिक ज्ञानक्षमतेमुळे आपण यापूर्वी कधीही न बोललेली, न ऐकलेली वाक्ये नव्याने निर्माण करू शकतो. आणि त्यांचा आस्वादही घेऊ शकतो.
२)       साहित्यिक ज्ञानक्षमता
जोनाथन कलर या चिन्हमिमांसावादी समीक्षकाने ही संकल्पना मांडली आहे. सर्वसामान्य वाचकाला शब्दांचा व वाक्यांचा अर्थ कळतो परंतू तो साहित्यविषयक संकेतांविषयी अनभिज्ञ असतो. त्याला शब्दांचे क्रम, त्यांचे स्थान, प्रतीकांचे संकेत, काव्यरचनेचे संकेत, साहित्यप्रकारांमागील संकेतव्यूह, वाड्मयीन परंपरा यांचे ज्ञान नसते. हे ज्ञान त्याने आत्मसात केले तरच त्याला साहित्याचे ‘साहित्य’ म्हणून वाचन करता येते.
३)       सांस्कृतिक ज्ञानक्षमता
साहित्यकृती जशी भाषिक, साहित्यिक संकेतांचे पालन करत असते तशीच ती सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यवस्थांतील संकेतांचे, विचारप्रणालींचे, मूल्यसरणीचेही पालन-उल्लंघन करीत जीवनचित्रण करत असते. त्यामुळे साहित्याचे वाचन करताना सांस्कृतिक व्यवस्था आणि त्यांचे संकेतसंच यांचेही ज्ञान आवश्यक आहे.
साहित्याचा वाचक हा केवळ त्या साहित्यकृतीचा निष्क्रिय भोक्ता नसतो तर तिला तो उचितसा प्रतिसादही देत असतो. त्यामुळे साहित्यकृतीचे अस्तित्वच वाचकाच्या सहसर्जक क्रियेवर अवलंबून असते. याबाबत वोल्फगांग आयझर म्हणतो, साहित्यकृतीला दोन ध्रुव असतात. यातील कालात्म ध्रुव लेखकाने निर्मिलेल्या संहितेशी निगडीत असतो तर सौंदर्यात्म ध्रुव वाचकाच्या त्या संहितेच्या अनुभवात नसून त्या दोहोंच्या मधे कुठेतरी असतो.

२)       वाड्मयीन विश्लेषण :
साहित्यकृतीच्या प्रत्यक्ष अनुभवक्रियेत वा चिंतनशील क्रियेत दोन प्रकारच्या मनःवृत्ती कार्यशील असतात. एक विश्लेषणाची आणि दुसरी संश्लेषणाची. अखंड वस्तूचे / समष्टीचे अनेक खंडात वा घटकांत विघटन करून त्यांचे पृथक्करण करण्याच्या प्रक्रियेला विश्लेषण असे म्हणतात. तर अखंड समष्टीच्या अनेक घटकांच्या एकीकरण करण्याच्या प्रक्रियेला संश्लेषण असे म्हणतात. कोणतीही साहित्यकृती ही अनेक घटकांनी  बनलेली एकजिनसी समष्टी असते. तिच्या अनेक घटकांमधील परस्पर संबंधाचे सौंदर्यदृष्टीने वर्णन करणे म्हणजे वाड्मयीन विश्लेषण होय. सेंद्रिय एकतेचा आग्रह धरणाऱ्या क्रोंचेसारख्या विचारवंतानी या वाड्मयीन विश्लेषणाला विरोध केला आहे. त्यांच्यामते अशा विश्लेषणातून एकजिनसी साहित्यकृतीचे सौंदर्य नष्ट होते. अशावेळी तो घटक त्या समष्टीचाच एक अविभाज्य भाग मानून त्याचे आणि समष्टीचे परस्परसंबंध पहिले असता ते विश्लेषण साहित्यकृतीच्या सौंदर्याला बाधक ठरत नाही.
साहित्यकृती ही प्रथमतः एक भाषिक कृती आहे. भाषेत अर्थनिर्मिती करणाऱ्या भाषिक घटकांची तीन अंगात विभागणी केली जाते. १) भाषेचे ध्वनीविन्यासात्मक अंग २) तिचे अर्थात्मक अंग आणि ३) तिचे वाक्यविन्यासात्मक अंग. हि भाषिक अंगे साहित्यकृतीचा अर्थ व तिची संघटना यांना साकार करीत असतात. वाचकाची सौंदर्यलक्षी संवेदनशीलता या अंगाना प्रतिसाद देत असते. या सर्जक आणि कल्पक प्रतिसादातून तो सौंदर्यवस्तूची निर्मिती करत असतो. म्हणून वाड्मयीन विश्लेषण करणाऱ्या समीक्षकाला संहितेच्या या तीन अंगांचा विचार करावा लागतो.
साहित्यकृतीच्या विश्लेषणासंदर्भात रेने वेलेक / जस्टीन वॉरेन यांनी बहिर्निष्ठ आणि अंगनिष्ठ असे दोन प्रकार सांगितले आहेत. साहित्यकृतीची निर्मिती विशिष्ठ स्थळ-काळात झालेली असते. ती लेखकनिर्मित असल्याने लेखकाचे चरित्र व मानसशास्त्र तसेच समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीचा प्रभाव त्या साहित्यकृतीवर पडतो. या सर्व संदर्भांना विचारात घेऊन केलेले विश्लेषण बहिर्निष्ठ विश्लेषणात येते. तर कलाकृतीचा आशय आणि अभिव्यक्ती तिच्या संरचनेतच सामावलेले असते असे मानून प्रत्येक शब्दांचे , प्रत्येक वाक्यबंधांचे मूल्य ओळखून शब्द, वाक्ये, प्रतिभा यांतील परस्परसंबंध शोधणे, भावनेच्या आणि विचारांच्या असंख्य छटा स्पष्ट करणे म्हणजे अंगनिष्ठ विश्लेषण होय.

३)       अर्थनिर्णयन
साहित्यकृतीच्या आशयाचे अर्थाचे सौंदर्यदृष्टीने केलेले विवरण व स्पष्टीकरण म्हणजे वाड्मयीन अर्थनिर्णयन होय. अशी व्याख्या प्रा. गंगाधर पाटील यांनी केली आहे. त्यांनी साहित्यकृतीच्या अर्थासंबधी तीन भूमिका मांडल्या आहेत.
१)       साहित्यकृतीचा अर्थ हा तिच्या स्थिर अशा संहितेच्या वस्तुस्थितीशी बांधलेला असतो. अर्थात साहित्यकृतीचा अर्थ हा संहितेतच असतो.
२)       साहित्यकृतीचा अर्थ हा वाचकाच्या मनःस्थितीशी, वाचनक्रियेशी निगडीत असतो.
३)       साहित्यकृतीचा अर्थ हा साहित्यकृती आणि वाचक यांच्या सहसर्जक वाचनक्रियेत निर्माण होत असतो.
प्रत्येक साहित्यकृतीला अर्थ असतो, मात्र तो अनिश्चित असतो. इतकेच न्सचे तर ती कृती बहुविध अर्थांनीही युक्त असू शकते. त्यामुळे तिच्या अर्थाचे निर्णयन करावे लागते. भारतीय साहित्यशास्त्रानुसार प्रत्येक साहित्यकृतीला वाच्यार्थासोबतच व्यंगार्थाचेही अंग असते. या दोन्ही अर्थांचे निर्वचन मूल्यमापनासाठी आवश्यक ठरते. त्याकरिता फ्राईडचे मानसशास्त्र, युंगचे आदिबंधात्मक मानवशास्त्र किंवा अस्तित्ववादी विचारसरणी यांचा आधार घेतला जातो. फ्रेंच समीक्षक पुले म्हणतो, ‘कलाकृती हि एक वस्तू नसून अर्थाचा आकृतिबंध असते. त्या आकृतीबंधामागील संज्ञेचा शोध घ्यायचा असतो. साहित्यकृतीमधून लेखकाचा आत्मभाव शोधला पाहिजे.’ तो आत्मभाव संपूर्ण कृतीत सामावलेला असतो. तिथपर्यंत समीक्षकाला पोहोचायचे असते.
प्रत्येक साहित्यकृतीभोवती काही एक अंध / असंज्ञ क्षेत्र असते. हे क्षेत्र जाणून घेण्यासाठी सामिक्षकाजवळ मर्मदृष्टी असावी लागते. अशी पॉल डी मान या उत्तर संरचानावादी समीक्षकाची भूमिका आहे. सामिक्षकाजवळ जर हि मर्मदृष्टी आणि कल्पकता असेल तरच त्याला ते असंज्ञ कार्यक्षेत्र जाणून घेता येईल. आणि अर्थाचे निरुपण करता येईल. म्हणून अर्थनिर्णयनाच्या प्रक्रियेत सम्यक् ज्ञान आणि अर्थाचे स्पष्टीकरण हि दोन कार्ये सामावलेली असतात.
४)       मूल्यमापन
वस्तूच्या, साहित्यकृतीच्या किंवा अनुभवाच्या गुणवत्तेमुळे आपल्या मनात तिच्याविषयी आवड, आस्था व इच्छा यांची उत्पत्ती आणि परिपूर्ती होते. त्या  गुणवत्तेला मूल्य असे म्हणता येईल. साहित्यकृतीच्या गुणवत्तेचे कोणत्यातरी निकषांच्या आधारे मूल्यमापन करणारा व्यापार म्हणजे मूल्यमापन. त्याकरिता पुढील निकष विचारात घेतले जातात.
१)       कलामुल्ये:
कलाकृतीचे मूल्यमापन करताना तिचे अंगभूत गुणधर्म, तिची रचना, तिचे स्वरूपविशेष तसेच निर्मितीप्रक्रियेच्या गुणवत्तेचे मापन केले जाते. कलाकृतीच्या रूपाशी आणि निर्मितीप्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या मूल्याला ‘कलामूल्य’ असे म्हणतात. साहित्याच्या मूल्यमापनात मौलिकता आणि नवीनता हे मूल्यनिकष महत्वाचे ठरतात. मौलिकता हा एक असाधारण गुण असून निवडक कलाकृतींमधेच तो वसत असतो. लेखकाच्या मानवी जीवनाकडे पाहण्याचा जो मुलभूत आणि वैशिष्ट्यपूर्ण असा दृष्टीकोण असतो त्यामुळे साहित्यकृतीला मौलिकता प्राप्त होते. तर नवीनता जी जुन्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसते. तिला ऐतिहासिक संदर्भ असतो. एखाद्या कलाकृतीत जुन्या रूढ संकेतांचे उल्लंघन केले गेले असेल तर तेथे नविनतेचे मूल्य प्रतीत होते. नवता ही जुन्या मूल्यांना नकार, बंडखोरी, क्रांतीकारत्व यांच्याशी निगडीत असते.
२)       सौंदर्यमूल्य:
कलाकृती रसिक मनावर आणि समाजमनावर विशिष्ठ प्रकारचा कालात्म परिणाम करीत असते. ती रसिक मनात प्रभावी सौंदर्यभावना उत्कट रसनिर्मिती प्रसंगी त्याला अस्वस्थही करते. हे सौंदर्यात्म कार्य रसिकाला अर्थपूर्ण आणि मोलाचे वाटले तर त्या कार्याला सौंदर्यमूल्य प्राप्त होते. काही कल्पक आणि सर्जनशील वृत्तीचे रसिक कलाकृतीचा आस्वाद घेताना तिला सर्जक प्रतिसादही देत असतात. आणि त्या सौंदर्यवस्तूला शब्दांकित करत स्वतःची शब्दसंहिता निर्माण करतात, या सौंदर्यवस्तूच्या आणि आस्वादक्रियेच्या गुणवत्तेशी निगडीत असणाऱ्या मूल्यालाही सौंदर्यमूल्य असे म्हटले जाते. रसवाद्यांची रसरूप व काव्यार्थरूप वस्तू, काव्यानंद, रूपवाद्यांची सौंदर्यभावना, रिचर्ड्सचे प्रेरणा समाधान, एरिस्टोटलचे केथोर्सीस, संज्ञामीमांसक व चिन्हमीमांसकाची सौंदर्यवस्तू आदींच्या गुणवत्तेशी निगडीत असणाऱ्या मूल्यांना सौंदर्यमूल्यांच्या वर्गात घालता येते.
३)       सौंदर्येतर मुल्ये
साहित्यकृतीत जीवनानुभव, आशय व्यक्त झालेला असतो. हा अनुभव स्वभावतः अर्थगर्भ, मुल्यगर्भ, आणि राचानामुल असतो. तर कादंबरी, नाटक, कविता यांसारख्या साहित्यकृतीत सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, भावनिक स्वरूपाच्या अनेक व्यवस्था प्रतीमांकित व चिन्हांकित झालेल्या असतात. त्यामध्ये त्या त्या व्यवस्थांचे संकेतव्यूह व मूल्यव्यूह अंतर्भूत असतात. कलाकृतीमध्ये प्रत्येक घटकाला अर्थ प्राप्त झालेला असतो. तसेच त्याला सौंदर्यमूल्येही प्राप्त झालेली असतात.
साहित्याच्या जीवनदर्शी कलेत सौंदर्येतर मुल्ये दोन प्रकारची कार्ये करत असतात. ती कलाकृतीत सौंदर्यमूल्यांच्या निर्मितीत सहभागी होतात तसेच ती रसिकाच्या आस्वादक्रियेद्वारे समाजातील जीवनमुल्यांशी आपली नवी बांधिलकी साधून समूह’संज्ञेच्या घडणीतही सहभागी होतात. या दोन प्रकारच्या कार्यामुळे सौंदर्येतर मुल्ये ही जीवनमुल्यांपेक्षा वेगळी ठरतात. ही भूमिका कलेची ‘सापेक्ष विशेषता’ किंवा ‘सापेक्ष स्वायत्तता’ मानणारी भूमिका आहे. ही भूमिका स्वायत्त कलावादी नाही आणि पोथीनिष्ठ मार्क्सवादीही नाही.
४)       शतकांची कसोटी:
काही कलाकृती या स्थलकालनिबद्ध असतात. तर काही कलाकृती तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन भविष्यातील कालखंडातील लोकांनाही आनंद देतात. रामायण, महाभारत, इलियट, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संताची कविता, भवभूती, कालिदास, शेक्सपिअर आदींची नाटके यांचा प्रभाव समकालीन आणि उत्तरकालीन साहित्यावर पडलेला दिसतो. अशा साहित्यकृती नव्या लेखकांना स्फूर्तीदायक ठरतात. अशावेळी शतकांची कसोटी हा एक वस्तुनिष्ठ निकष मानला जातो.

वर उल्लेखलेल्या चार पातळ्यांच्या आधारे केलेली समीक्षा ही सर्वोत्तम ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा