शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

तेनची साहित्यविषयक भूमिका...


साहित्य आणि समाजाच्या परस्पर संबंधांविषयी अनेक विचारवंतानी आपले सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी फ्रेंच विचारवंत इप्पोलित तेन याने मांडलेले विचार अत्यंत महत्वपूर्ण आणि मुलभुत स्वरूपाचे आहेत. तेनच्या मते साहित्य हे केवळ लेखकाच्या व्यक्तिगत प्रतिभेचा आविष्कार नसून त्यात समकालीन जीवनपद्धतीचे प्रतिबिंब उमटलेले असते. विविध लेखकांचे लेखन विचारात घेतले तर त्यांची विचारशक्ती, आविष्काराची पद्धती यामधे फरक असला तरी काही विचार, दृष्टीकोन, कल्पना, भावनासुत्रे यामधे साम्य आढळते. याचे कारण म्हणजे प्रत्येक मानवसमूहाची एक स्वतंत्र मानसिक संरचना विकसित झालेली असते. आणि त्यातूनच या मानवसमूहाचे बौद्धिक आणि मानसिक गुणविशेष निष्पन्न होत असतात. तेनच्या मते ही मानसिक संरचना विकसित होण्यास वंश, काळ, परिस्थिती हे घटक कारणीभूत ठरतात. या घटकांचा परामर्श पुढीलप्रमाणे घेता येईल.
१)       वंश:
माणूस जन्म घेतानाच अनुवांशिकरित्या त्याला वंश प्राप्त होत असतो. वंशपरत्वे मिळणारे गुणधर्म हे मानसिक आणि शारीरिक घडणीच्या वेगळेपणात एकत्रित झालेले असतात. निरनिराळ्या मानवसमूहात ते निरनिराळे असतात. भिन्न वंशाच्या लोकांना समाजात ज्या प्रकारचे अनुभव येतात त्याबद्दल त्यांच्या मनात जे विचार आकार घेतात त्यात वंशपरत्वे भिन्नता आढळते. अनेकदा मानवसमूहाच्या वंशपरत्वे साहित्याच्या स्वरूपातही फरक आढळतो. उदा. निग्रोंचे साहित्य.
२)       काळ:
यालाच युगप्रवृत्ती असेही म्हटले जाते. विशिष्ठ ऐतिहासिक परिस्थितीत साहित्यावर विशिष्ठ प्रकाराचा वा विचारपद्धतीचा प्रभाव आढळतो. प्रत्येक कालखंडातील साहित्याची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी आढळतात. याची करणे त्या काळाच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत आढळतात. उदा: महायुद्धोत्तर काळातील नवकथा.
३)       परिस्थिती:
तेनला यामधे भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण अभिप्रेत आहे. एकाच वंशाच्या मात्र भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या स्वभावात आणि प्रवृत्तीत फरक पडतो. हाच फाकर त्यांच्या साहित्याच्या अभिव्यक्तीतून प्रत्ययास येतो. उदा: खानोलकर, पेंडसे यांचे प्रादेशिक साहित्य.

अशाप्रकारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक घडणीवर विशेष लक्ष देऊन त्याचे साहित्यात उमटणारे प्रतिबिंब अभ्यासण्याचा प्रयत्न तेनने केलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा