सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

साहित्याचे स्वरूप आणि समीक्षेच्या चार पातळ्या

कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर त्या साहित्यकृतीविषयी आपल्या मनात काही न काही अभिप्राय तयार होत असतो मात्र प्रत्येक अभिप्रायाला आपण समीक्षा म्हणत नाही. तर सामिक्षेकरीता आपला अभिप्रायह सार्वत्रिक निकषांवर आधारित असावा लागतो, तरच तो अधिक तर्कशुद्ध आणि व्यापक स्वरूपाचा होतो. तसेच तो साहित्यकृतीचे स्वरूप, कार्य, सौंदर्य आदींच्या दृष्टीने प्रस्तुत आणि यथोचित शब्दांतून व्यक्त व्हावा लागतो. यावरून आपल्याला साहित्यसमीक्षेची एक स्थूल व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल:
“सार्वत्रिक निकषांची आकांक्षा धरणारा, यथोचित शब्दांतून व्यक्त होणारा, साहित्याविषयीचा मुल्यगर्भ आणि ज्ञानगर्भ अभिप्राय म्हणजे समीक्षा”
साहित्यसमीक्षा एक व्यापक स्वरुपाची प्रवाही प्रक्रिया असून त्यात साहित्यकृतीचे वाचन, विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि मूल्यमापन ही प्रमुख अंगे सामावलेली असतात. समीक्षेच्या चिंतनशील व्यापारात कल्पनाशक्ती व स्वयंप्रज्ञा कार्यशील असतात. त्या साहित्यकृतीचे सौंदर्यमूल्य जाणून घेण्यात आणि निर्माण करण्याच्या कामात साह्यभूत होतात. समीक्षाव्यापाराचे हे अनेकांगी प्रवाही स्वरूप काय आहे हे साकल्याने पाहिल्याशिवाय सुविकसित, प्रगल्भ समीक्षेची संकल्पना सुस्पष्ट होणार नाही. तसेच ज्या साहित्यकृतीची समीक्षा करावयाची तिचे स्वरूप कसे असते याची जाण समीक्षकाला असावी लागते. त्यामुळे समीक्षेच्या पातळ्या पाहण्यापूर्वी साहित्याचे स्वरूप कसे असते ते पाहू.

साहित्याचे स्वरूप:
साहित्याचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी साहित्यकृतीच्या प्रमुख अंगांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. प्रा. गंगाधर पाटील यांच्यामते साहित्यकृतीला सात अंगे असतात. ती पुढीलप्रमाणे:
१)       साहित्यकृती ही शब्दांनी बनलेली असते. शब्दांचे ध्वनिरूप, अर्थरूप आणि वाक्यविन्यासात्मक रूप घटकांनी तिची घडण होते. हे भाषिक अंग होय.
२)       या भाषिक अंगातून तिचे अर्थात्मक किंवा आशयात्मक अंग प्रकट होत असते. हा आशय मानसिक किंवा सामाजिक असू शकतो.
३)       साहित्यकृती ही शब्दबंध, वाक्यबंध, प्रतीमाबंध, चरण, कडवी, कथाबीज, कथानक, पात्रे आदी अनेक घटकांनी मिळून एकात्म, संघटीत झालेली असते. त्यामुळे तिला एकजिनसी संघटन किंवा सेंद्रिय समष्टी प्राप्त झालेली असते, हे तिचे रूपबंधात्मक किंवा संरचनात्मक अंग होय.
४)       साहित्यकृतीत घटना, कथानक, पात्रे, प्रतिमा आदी गोष्टींतून शब्दार्थजनित असे एक कल्पित विश्व तयार केलेले असते. ते कल्पकतापूर्ण अंग होय.
५)       प्रत्येक साहित्यकृती हि कोणत्या ना कोणत्या प्रकारात मोडत असते. प्रत्येक साहित्यप्रकाराचे विशिष्ठ संकेतसंच असतात. या प्रकारे प्रत्येकसाहित्यकृतीला प्रकारात्मक अंग असते.
६)       प्रत्येक साहित्यकृती ही एक सौंदर्यपूर्ण कलाकृती मानली जाते. म्हणजेच साहित्यकृतीला सौंदर्यात्मक / कलात्मक अंग असते.
७)       साहित्यकृतीला स्वयंपूर्ण, स्वायत्त, अनन्य स्वरूपाचे अस्तित्व असते. हे तिचे अस्तित्वात्मक किंवा सत्ताशास्त्रीय अंग होय.
साहित्यकृती’ची समीक्षा करत असताना समीक्षकाला या सात अंगांची यथोचित जाण असणे गरजेचे असते.

समीक्षेच्या चार पातळ्या:
१)       वाचन :
साहित्यकृतीच्या विशिष्ठ स्वरूपाचे ज्ञान आपल्याला तिच्या वाचनातूनच होते. साहित्यकृतीचे वाचन केल्याशिवाय तिचे आकलन होऊच शकत नाही. आणि आकलनाशिवाय समीक्षाही होऊ शकत नाही. वाचनासंबंधी अंग्लो अमेरिकन नवसमीक्षकांची एक भूमिका आहे. त्यांच्यामते साहित्यकृती ही एक स्वायत्त, स्वयंपूर्ण वस्तू आहे. तिचे वाचन करताना वाचकाला तिचा काव्यार्थ अंतःप्रेरणेने कळतो. साहित्यकृतीचे वाचन हा एकप्रकारचा अनुभव असतो. हा अनुभव घेण्यासाठी त्याच्याकडे पुढील क्षमता असणे गरजेचे असते.
१)       भाषिक ज्ञानक्षमता:
नेहमीच्या भाषिक व्यवहारात सहभागी होत असताना आपण आपल्या भाषेचे संकेत, व्याकरण, कळत-नकळत यत्नायत्नपूर्वक आत्मसात करत असतो. या ‘भाषिक ज्ञाना’ला नोएम चोम्स्की या भाषावैज्ञानिकाने ‘भाषिक ज्ञानक्षमता’ असे संबोधले आहे. या भाषिक ज्ञानक्षमतेमुळे आपण यापूर्वी कधीही न बोललेली, न ऐकलेली वाक्ये नव्याने निर्माण करू शकतो. आणि त्यांचा आस्वादही घेऊ शकतो.
२)       साहित्यिक ज्ञानक्षमता
जोनाथन कलर या चिन्हमिमांसावादी समीक्षकाने ही संकल्पना मांडली आहे. सर्वसामान्य वाचकाला शब्दांचा व वाक्यांचा अर्थ कळतो परंतू तो साहित्यविषयक संकेतांविषयी अनभिज्ञ असतो. त्याला शब्दांचे क्रम, त्यांचे स्थान, प्रतीकांचे संकेत, काव्यरचनेचे संकेत, साहित्यप्रकारांमागील संकेतव्यूह, वाड्मयीन परंपरा यांचे ज्ञान नसते. हे ज्ञान त्याने आत्मसात केले तरच त्याला साहित्याचे ‘साहित्य’ म्हणून वाचन करता येते.
३)       सांस्कृतिक ज्ञानक्षमता
साहित्यकृती जशी भाषिक, साहित्यिक संकेतांचे पालन करत असते तशीच ती सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यवस्थांतील संकेतांचे, विचारप्रणालींचे, मूल्यसरणीचेही पालन-उल्लंघन करीत जीवनचित्रण करत असते. त्यामुळे साहित्याचे वाचन करताना सांस्कृतिक व्यवस्था आणि त्यांचे संकेतसंच यांचेही ज्ञान आवश्यक आहे.
साहित्याचा वाचक हा केवळ त्या साहित्यकृतीचा निष्क्रिय भोक्ता नसतो तर तिला तो उचितसा प्रतिसादही देत असतो. त्यामुळे साहित्यकृतीचे अस्तित्वच वाचकाच्या सहसर्जक क्रियेवर अवलंबून असते. याबाबत वोल्फगांग आयझर म्हणतो, साहित्यकृतीला दोन ध्रुव असतात. यातील कालात्म ध्रुव लेखकाने निर्मिलेल्या संहितेशी निगडीत असतो तर सौंदर्यात्म ध्रुव वाचकाच्या त्या संहितेच्या अनुभवात नसून त्या दोहोंच्या मधे कुठेतरी असतो.

२)       वाड्मयीन विश्लेषण :
साहित्यकृतीच्या प्रत्यक्ष अनुभवक्रियेत वा चिंतनशील क्रियेत दोन प्रकारच्या मनःवृत्ती कार्यशील असतात. एक विश्लेषणाची आणि दुसरी संश्लेषणाची. अखंड वस्तूचे / समष्टीचे अनेक खंडात वा घटकांत विघटन करून त्यांचे पृथक्करण करण्याच्या प्रक्रियेला विश्लेषण असे म्हणतात. तर अखंड समष्टीच्या अनेक घटकांच्या एकीकरण करण्याच्या प्रक्रियेला संश्लेषण असे म्हणतात. कोणतीही साहित्यकृती ही अनेक घटकांनी  बनलेली एकजिनसी समष्टी असते. तिच्या अनेक घटकांमधील परस्पर संबंधाचे सौंदर्यदृष्टीने वर्णन करणे म्हणजे वाड्मयीन विश्लेषण होय. सेंद्रिय एकतेचा आग्रह धरणाऱ्या क्रोंचेसारख्या विचारवंतानी या वाड्मयीन विश्लेषणाला विरोध केला आहे. त्यांच्यामते अशा विश्लेषणातून एकजिनसी साहित्यकृतीचे सौंदर्य नष्ट होते. अशावेळी तो घटक त्या समष्टीचाच एक अविभाज्य भाग मानून त्याचे आणि समष्टीचे परस्परसंबंध पहिले असता ते विश्लेषण साहित्यकृतीच्या सौंदर्याला बाधक ठरत नाही.
साहित्यकृती ही प्रथमतः एक भाषिक कृती आहे. भाषेत अर्थनिर्मिती करणाऱ्या भाषिक घटकांची तीन अंगात विभागणी केली जाते. १) भाषेचे ध्वनीविन्यासात्मक अंग २) तिचे अर्थात्मक अंग आणि ३) तिचे वाक्यविन्यासात्मक अंग. हि भाषिक अंगे साहित्यकृतीचा अर्थ व तिची संघटना यांना साकार करीत असतात. वाचकाची सौंदर्यलक्षी संवेदनशीलता या अंगाना प्रतिसाद देत असते. या सर्जक आणि कल्पक प्रतिसादातून तो सौंदर्यवस्तूची निर्मिती करत असतो. म्हणून वाड्मयीन विश्लेषण करणाऱ्या समीक्षकाला संहितेच्या या तीन अंगांचा विचार करावा लागतो.
साहित्यकृतीच्या विश्लेषणासंदर्भात रेने वेलेक / जस्टीन वॉरेन यांनी बहिर्निष्ठ आणि अंगनिष्ठ असे दोन प्रकार सांगितले आहेत. साहित्यकृतीची निर्मिती विशिष्ठ स्थळ-काळात झालेली असते. ती लेखकनिर्मित असल्याने लेखकाचे चरित्र व मानसशास्त्र तसेच समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीचा प्रभाव त्या साहित्यकृतीवर पडतो. या सर्व संदर्भांना विचारात घेऊन केलेले विश्लेषण बहिर्निष्ठ विश्लेषणात येते. तर कलाकृतीचा आशय आणि अभिव्यक्ती तिच्या संरचनेतच सामावलेले असते असे मानून प्रत्येक शब्दांचे , प्रत्येक वाक्यबंधांचे मूल्य ओळखून शब्द, वाक्ये, प्रतिभा यांतील परस्परसंबंध शोधणे, भावनेच्या आणि विचारांच्या असंख्य छटा स्पष्ट करणे म्हणजे अंगनिष्ठ विश्लेषण होय.

३)       अर्थनिर्णयन
साहित्यकृतीच्या आशयाचे अर्थाचे सौंदर्यदृष्टीने केलेले विवरण व स्पष्टीकरण म्हणजे वाड्मयीन अर्थनिर्णयन होय. अशी व्याख्या प्रा. गंगाधर पाटील यांनी केली आहे. त्यांनी साहित्यकृतीच्या अर्थासंबधी तीन भूमिका मांडल्या आहेत.
१)       साहित्यकृतीचा अर्थ हा तिच्या स्थिर अशा संहितेच्या वस्तुस्थितीशी बांधलेला असतो. अर्थात साहित्यकृतीचा अर्थ हा संहितेतच असतो.
२)       साहित्यकृतीचा अर्थ हा वाचकाच्या मनःस्थितीशी, वाचनक्रियेशी निगडीत असतो.
३)       साहित्यकृतीचा अर्थ हा साहित्यकृती आणि वाचक यांच्या सहसर्जक वाचनक्रियेत निर्माण होत असतो.
प्रत्येक साहित्यकृतीला अर्थ असतो, मात्र तो अनिश्चित असतो. इतकेच न्सचे तर ती कृती बहुविध अर्थांनीही युक्त असू शकते. त्यामुळे तिच्या अर्थाचे निर्णयन करावे लागते. भारतीय साहित्यशास्त्रानुसार प्रत्येक साहित्यकृतीला वाच्यार्थासोबतच व्यंगार्थाचेही अंग असते. या दोन्ही अर्थांचे निर्वचन मूल्यमापनासाठी आवश्यक ठरते. त्याकरिता फ्राईडचे मानसशास्त्र, युंगचे आदिबंधात्मक मानवशास्त्र किंवा अस्तित्ववादी विचारसरणी यांचा आधार घेतला जातो. फ्रेंच समीक्षक पुले म्हणतो, ‘कलाकृती हि एक वस्तू नसून अर्थाचा आकृतिबंध असते. त्या आकृतीबंधामागील संज्ञेचा शोध घ्यायचा असतो. साहित्यकृतीमधून लेखकाचा आत्मभाव शोधला पाहिजे.’ तो आत्मभाव संपूर्ण कृतीत सामावलेला असतो. तिथपर्यंत समीक्षकाला पोहोचायचे असते.
प्रत्येक साहित्यकृतीभोवती काही एक अंध / असंज्ञ क्षेत्र असते. हे क्षेत्र जाणून घेण्यासाठी सामिक्षकाजवळ मर्मदृष्टी असावी लागते. अशी पॉल डी मान या उत्तर संरचानावादी समीक्षकाची भूमिका आहे. सामिक्षकाजवळ जर हि मर्मदृष्टी आणि कल्पकता असेल तरच त्याला ते असंज्ञ कार्यक्षेत्र जाणून घेता येईल. आणि अर्थाचे निरुपण करता येईल. म्हणून अर्थनिर्णयनाच्या प्रक्रियेत सम्यक् ज्ञान आणि अर्थाचे स्पष्टीकरण हि दोन कार्ये सामावलेली असतात.
४)       मूल्यमापन
वस्तूच्या, साहित्यकृतीच्या किंवा अनुभवाच्या गुणवत्तेमुळे आपल्या मनात तिच्याविषयी आवड, आस्था व इच्छा यांची उत्पत्ती आणि परिपूर्ती होते. त्या  गुणवत्तेला मूल्य असे म्हणता येईल. साहित्यकृतीच्या गुणवत्तेचे कोणत्यातरी निकषांच्या आधारे मूल्यमापन करणारा व्यापार म्हणजे मूल्यमापन. त्याकरिता पुढील निकष विचारात घेतले जातात.
१)       कलामुल्ये:
कलाकृतीचे मूल्यमापन करताना तिचे अंगभूत गुणधर्म, तिची रचना, तिचे स्वरूपविशेष तसेच निर्मितीप्रक्रियेच्या गुणवत्तेचे मापन केले जाते. कलाकृतीच्या रूपाशी आणि निर्मितीप्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या मूल्याला ‘कलामूल्य’ असे म्हणतात. साहित्याच्या मूल्यमापनात मौलिकता आणि नवीनता हे मूल्यनिकष महत्वाचे ठरतात. मौलिकता हा एक असाधारण गुण असून निवडक कलाकृतींमधेच तो वसत असतो. लेखकाच्या मानवी जीवनाकडे पाहण्याचा जो मुलभूत आणि वैशिष्ट्यपूर्ण असा दृष्टीकोण असतो त्यामुळे साहित्यकृतीला मौलिकता प्राप्त होते. तर नवीनता जी जुन्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसते. तिला ऐतिहासिक संदर्भ असतो. एखाद्या कलाकृतीत जुन्या रूढ संकेतांचे उल्लंघन केले गेले असेल तर तेथे नविनतेचे मूल्य प्रतीत होते. नवता ही जुन्या मूल्यांना नकार, बंडखोरी, क्रांतीकारत्व यांच्याशी निगडीत असते.
२)       सौंदर्यमूल्य:
कलाकृती रसिक मनावर आणि समाजमनावर विशिष्ठ प्रकारचा कालात्म परिणाम करीत असते. ती रसिक मनात प्रभावी सौंदर्यभावना उत्कट रसनिर्मिती प्रसंगी त्याला अस्वस्थही करते. हे सौंदर्यात्म कार्य रसिकाला अर्थपूर्ण आणि मोलाचे वाटले तर त्या कार्याला सौंदर्यमूल्य प्राप्त होते. काही कल्पक आणि सर्जनशील वृत्तीचे रसिक कलाकृतीचा आस्वाद घेताना तिला सर्जक प्रतिसादही देत असतात. आणि त्या सौंदर्यवस्तूला शब्दांकित करत स्वतःची शब्दसंहिता निर्माण करतात, या सौंदर्यवस्तूच्या आणि आस्वादक्रियेच्या गुणवत्तेशी निगडीत असणाऱ्या मूल्यालाही सौंदर्यमूल्य असे म्हटले जाते. रसवाद्यांची रसरूप व काव्यार्थरूप वस्तू, काव्यानंद, रूपवाद्यांची सौंदर्यभावना, रिचर्ड्सचे प्रेरणा समाधान, एरिस्टोटलचे केथोर्सीस, संज्ञामीमांसक व चिन्हमीमांसकाची सौंदर्यवस्तू आदींच्या गुणवत्तेशी निगडीत असणाऱ्या मूल्यांना सौंदर्यमूल्यांच्या वर्गात घालता येते.
३)       सौंदर्येतर मुल्ये
साहित्यकृतीत जीवनानुभव, आशय व्यक्त झालेला असतो. हा अनुभव स्वभावतः अर्थगर्भ, मुल्यगर्भ, आणि राचानामुल असतो. तर कादंबरी, नाटक, कविता यांसारख्या साहित्यकृतीत सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, भावनिक स्वरूपाच्या अनेक व्यवस्था प्रतीमांकित व चिन्हांकित झालेल्या असतात. त्यामध्ये त्या त्या व्यवस्थांचे संकेतव्यूह व मूल्यव्यूह अंतर्भूत असतात. कलाकृतीमध्ये प्रत्येक घटकाला अर्थ प्राप्त झालेला असतो. तसेच त्याला सौंदर्यमूल्येही प्राप्त झालेली असतात.
साहित्याच्या जीवनदर्शी कलेत सौंदर्येतर मुल्ये दोन प्रकारची कार्ये करत असतात. ती कलाकृतीत सौंदर्यमूल्यांच्या निर्मितीत सहभागी होतात तसेच ती रसिकाच्या आस्वादक्रियेद्वारे समाजातील जीवनमुल्यांशी आपली नवी बांधिलकी साधून समूह’संज्ञेच्या घडणीतही सहभागी होतात. या दोन प्रकारच्या कार्यामुळे सौंदर्येतर मुल्ये ही जीवनमुल्यांपेक्षा वेगळी ठरतात. ही भूमिका कलेची ‘सापेक्ष विशेषता’ किंवा ‘सापेक्ष स्वायत्तता’ मानणारी भूमिका आहे. ही भूमिका स्वायत्त कलावादी नाही आणि पोथीनिष्ठ मार्क्सवादीही नाही.
४)       शतकांची कसोटी:
काही कलाकृती या स्थलकालनिबद्ध असतात. तर काही कलाकृती तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीच्या पलीकडे जाऊन भविष्यातील कालखंडातील लोकांनाही आनंद देतात. रामायण, महाभारत, इलियट, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संताची कविता, भवभूती, कालिदास, शेक्सपिअर आदींची नाटके यांचा प्रभाव समकालीन आणि उत्तरकालीन साहित्यावर पडलेला दिसतो. अशा साहित्यकृती नव्या लेखकांना स्फूर्तीदायक ठरतात. अशावेळी शतकांची कसोटी हा एक वस्तुनिष्ठ निकष मानला जातो.

वर उल्लेखलेल्या चार पातळ्यांच्या आधारे केलेली समीक्षा ही सर्वोत्तम ठरते.

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

अभिवादन।

मेरी फितरतसे इस कदर वाकिफ़ है कलम मेरी,
इश्क भी लिखना चाहूँ तो इन्कलाब लिख जाता है।
- शहीद भगतसिंग




आज 28 सप्टेंबर, 1907 साली आजच्याच दिवशी शहीद-ए-आझम  भगतसिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या पवित्र आणि प्रेरणादायी स्मृतीस विनम्र अभिवादन!

शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

स्वातंत्र्य ७...

अंधाराच्या दाट पडद्याआड
जाणवतो एक काळवंडलेला चेहरा,
सुरकुत्यांनी माखलेला,
व्रणांनी विद्रूप झालेला,
पाहवतही नाही
आणि
साहवतही नाही.
मग अखेर त्या काळोखातच
मी विचारते काळोखाला
त्याचीच ओळख,
कातरलेले शब्द
कानावर पडतात

“मी स्वातंत्र्य”

नायिका...

‘मीच असते नायिका
माझ्या कलाकृतींची’
असंच समजत आले
आजतागायत...
आज कळतंय
खरी नायिका तर
नियती होती,
जिच्या सारीपाटावर
स्वतःला जिंकता जिंकता
कळलंच नाही कधी
तिने मला

नायिका बनवलं...

तेनची साहित्यविषयक भूमिका...


साहित्य आणि समाजाच्या परस्पर संबंधांविषयी अनेक विचारवंतानी आपले सिद्धांत मांडले आहेत. त्यापैकी फ्रेंच विचारवंत इप्पोलित तेन याने मांडलेले विचार अत्यंत महत्वपूर्ण आणि मुलभुत स्वरूपाचे आहेत. तेनच्या मते साहित्य हे केवळ लेखकाच्या व्यक्तिगत प्रतिभेचा आविष्कार नसून त्यात समकालीन जीवनपद्धतीचे प्रतिबिंब उमटलेले असते. विविध लेखकांचे लेखन विचारात घेतले तर त्यांची विचारशक्ती, आविष्काराची पद्धती यामधे फरक असला तरी काही विचार, दृष्टीकोन, कल्पना, भावनासुत्रे यामधे साम्य आढळते. याचे कारण म्हणजे प्रत्येक मानवसमूहाची एक स्वतंत्र मानसिक संरचना विकसित झालेली असते. आणि त्यातूनच या मानवसमूहाचे बौद्धिक आणि मानसिक गुणविशेष निष्पन्न होत असतात. तेनच्या मते ही मानसिक संरचना विकसित होण्यास वंश, काळ, परिस्थिती हे घटक कारणीभूत ठरतात. या घटकांचा परामर्श पुढीलप्रमाणे घेता येईल.
१)       वंश:
माणूस जन्म घेतानाच अनुवांशिकरित्या त्याला वंश प्राप्त होत असतो. वंशपरत्वे मिळणारे गुणधर्म हे मानसिक आणि शारीरिक घडणीच्या वेगळेपणात एकत्रित झालेले असतात. निरनिराळ्या मानवसमूहात ते निरनिराळे असतात. भिन्न वंशाच्या लोकांना समाजात ज्या प्रकारचे अनुभव येतात त्याबद्दल त्यांच्या मनात जे विचार आकार घेतात त्यात वंशपरत्वे भिन्नता आढळते. अनेकदा मानवसमूहाच्या वंशपरत्वे साहित्याच्या स्वरूपातही फरक आढळतो. उदा. निग्रोंचे साहित्य.
२)       काळ:
यालाच युगप्रवृत्ती असेही म्हटले जाते. विशिष्ठ ऐतिहासिक परिस्थितीत साहित्यावर विशिष्ठ प्रकाराचा वा विचारपद्धतीचा प्रभाव आढळतो. प्रत्येक कालखंडातील साहित्याची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी आढळतात. याची करणे त्या काळाच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत आढळतात. उदा: महायुद्धोत्तर काळातील नवकथा.
३)       परिस्थिती:
तेनला यामधे भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण अभिप्रेत आहे. एकाच वंशाच्या मात्र भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितीत राहणाऱ्या लोकांच्या स्वभावात आणि प्रवृत्तीत फरक पडतो. हाच फाकर त्यांच्या साहित्याच्या अभिव्यक्तीतून प्रत्ययास येतो. उदा: खानोलकर, पेंडसे यांचे प्रादेशिक साहित्य.

अशाप्रकारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक घडणीवर विशेष लक्ष देऊन त्याचे साहित्यात उमटणारे प्रतिबिंब अभ्यासण्याचा प्रयत्न तेनने केलेला आहे.

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

स्वातंत्र्य ६

जगभरात शोध सुरु आहेत
कुणाचे?
कशासाठी?
कधीपासून?
कल्पना नाही.
शोध घेतेच आहे मीदेखील
स्वतःचा
स्वतःसाठी
स्वतःपासून...
माझ्यातल्या 'मी’चा
शोध घेतेय मी
कारण म्हणे
माझ्यातला ‘मी’
अनिर्बंध झालाय.
सारेच शोधतायत या ‘मी’ला
त्यांनी म्हणे या ‘मी’साठी
जन्मठेप योजली आहे.
म्हणून म्हटलं
आपणच शोधून काढावं
आपलंच असणं,
आपलेच विचार,
आपलेच स्वातंत्र्य,
आणि करावं बहाल त्यांना...
म्हणजे मला नाही तर
किमान त्यांनातरी
मुक्त श्वास घेता येईल

इथल्या स्वातंत्र्यात...

वर्षाथेंब..


चमकता वीज
तिच्या प्रकाशात
क्षणभर चमकून जातो
एखादा थेंब
पागोळ्यातून गळणारा...
थेंब पडतो मातीवर
वाहून जातो पाटातून
कौलांना नसते स्मृती
विजेलाही नसते आठवण
थेंब चमकला असतो
हिऱ्याप्रमाणे,
हिरा नसला तरी
चमक असतेच...
चमक असतेच
सागराच्या पाण्यावर
मावळत्या सूर्यकिरणांची,
सूर्यकिरणे नव्हेत
हे तर तेच वर्षाथेंब
विजेच्या प्रकाशात

पागोळ्यातून ओघळलेले...

बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

माहित होतं

माहित होतं
काय असते प्रतीक्षा,

काय असतं दुःख
विषाद, अंधःकार,
कशाप्रकारे
मौन करून जातो
अपेक्षांचा भंग,

मात्र तरीही

मी निवडलं प्रेम...

तीच गोष्ट.

त्यांच्याकडे बंदुका होत्या
ते फक्त खांद्याच्या शोधात होते,
त्यांच्या हातात तलवारी होत्या
ते फक्त छातीच्या शोधात होते,
त्यांच्याकडे अनेक चक्रव्यूह होते
आणि ते अभिमन्यूला शोधत होते...

त्यांच्याकडे होतं क्रूर गडगडाटी
आणि बीभत्स हास्य
आणि ते द्रौपदीला शोधत होते...

त्यांनी आम्हालाच निवडलं
आम्हाला मारण्यासाठी,
आमच्याच छातीवर
आमच्याच हातून
चालवली तलवार,
आम्हालाच उभं केलं
खुद्द आमच्याच विरोधात
आणि त्यांनी विजय मिळवला आमच्यावर.

ते फक्त एवढंच म्हणाले
स्त्रियाच असतात
स्त्रियांच्या शत्रू,
नेहमीच...


मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

हे थेंब नाहीत

बरसू लागले  जलद
नाही राहिला संयम
उतरून आले आकाश
घ्याया धरतीचे चुंबन

हे थेंब नाहीत काही,

ओठ आहेत आकाशाचे....

चेहरा

सुगंधाजवळ
सुगंध होता
-चेहरा नव्हता

रंगांजवळ
रंग होते
-चेहरा नव्हता

आगीजवळ
आग होती
-चेहरा नव्हता

प्रेमाजवळ
प्रेम होतं
-चेहरा नव्हता

सुगंधाने मागितला
रंगांनी मागितला
आगीने मागितला
प्रेमाने मागितला
-आम्हाला चेहरा दे

माझ्याकडे एक चेहरा होता
काही माझा होता, काही तुझा होता,

त्यांना देऊन टाकला.

हिंसेची भाषा..

हिंसेची भाषा
खूप कठोर
खूप भारी
आणि
आखडलेली असते.

मृत
शरीरांसारखी.

मात्र तरीही
कुणी तिला
ना दफन करत,

ना दहन करत....

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

त्यांचा आवाका...


मला जेव्हा जेव्हा विचारला जातो

तोच तोच प्रश्न

पुन्हा पुन्हा

तू आहेस तरी कोण?

तेव्हा तेव्हा त्याच त्या प्रश्नावर

खुलून येतं चेहऱ्यावर हास्य

अरे,

अजूनही मी यांच्या बुद्धीच्या

आवाक्याबाहेर आहे...


परंपरा


कावळ्याच्या घरट्यात आताही

सर्रास घालते कोकिळा अंडी

तिला अजूनही खात्री आहे

आपल्यासारखीच

धूर्त असतील आपली लेकरं

आणि अगदी सहजपणे

ती ओरबाडून घेतील

कावळ्यांच्या पिल्लांचं

जगण्याचं स्वातंत्र्य...

शिवाय जगातील लोकसुद्धा

कावळ्याचा विटाळ मानत

अखेर आपल्याच

गोड गळ्याचं कौतुक करतील.

वर्षानुवर्ष हेच तर चालत आलंय नाही का?



भांडण


न जाणो आजकाल माणसं

का भांडत असतात?

कुठेही, कधीही, कुणाशीही

आणि कोणत्याही कारणावरून...

कदाचित

कुठे, कधी, का, कुणाशी

हे प्रश्न दुय्यम आहेत

भांडत राहणं गरजेचं आहे...


शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

स्वातंत्र्य ५

काय दिवस आले आहेत पहा,
आधी काय लिहावं हे
सांगितलं जात होतं,
मग कसं लिहावं ते
सांगितलं जाऊ लागलं
हळूहळू का लिहायचं ते
अपोआप कळायला लागलं,
आता काय लिहावं, कसं लिहावं हे
सांगणारेच शिकवू लागले आहेत
काय लिहू नये, कसं लिहू नये,
आणि आडूनआडून सुचवताहेत
कुणा-कुणाविरुद्ध लिहू नये,
खरंच आता वाटतंय

लिहूच नये...

स्वातंत्र्य ४

एकेकाळी म्हणे गुळाभोवती डोंगळे जमत

आज डोंगळ्यांच्या पायात गुळाच्या बेड्या आहेत,

'आपणही डोंगळे व्हावं' म्हणत होत्या मुंग्या


गुळाच्या बेड्यांसाठी इतक्या त्या वेड्या आहेत...

स्वातंत्र्य 3...

जंगलातल्या वाघांना असतं स्वातंत्र्य
आपापल्या हद्दीत का होईना
स्वतंत्रपणे शिकार करण्याचं,
सरावलेले असतात त्यांचे
तीक्ष्ण सुळे अन् दात
आपल्या जिवंत सावजाच्या
मांसाचे लचके तोडण्यात...
आणि तितकंच स्वातंत्र्य असतं
त्या सावजालाही
अखेरच्या प्रतिकाराचं
त्यासाठी निसर्गानेही दिली आहेत
कुणाला नखं, कुणाला काटे,
कुणा-कुणाला विषही...
आजचं जग म्हणजे प्राणीसंग्रहालयच
जिकडे तिकडे वाघच वाघ
आपापल्या पिंजऱ्यात
सुस्तावलेले,
अहो मांसाचे लचकेही
आयतेच मिळतात त्यांना
आणि आता अस्तित्वातच नाही
अखेरच्या प्रतिकाराचं

सावजाचं स्वातंत्र्य...

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

अंतर..

कोणताच पर्वत
बंदुकीच्या टोकावर मोठा नाहीये,
आणि कोणतेच डोळे
लहान नाहीयेत सागरापेक्षा
हे तर केवळ आपल्या प्रतीक्षेचं अंतर आहे
जे कधी
आपल्याला पोलादाशी तर कधी लाटांशी जोडत असतं...

मूळ कविता : अंतर
मूळ कवी : धुमिल

मूळ भाषा : हिंदी 

पोळी आणि संसद

एक माणूस
पोळी लाटतो
एक माणूस
पोळी  खातो
एक तिसरा माणूस असाही आहे
जो ना पोळी लाटत आहे ना खात आहे
तो फक्त पोळीबरोबर खेळत आहे
मी विचारतो
हा तिसरा माणूस कोण आहे?
यावर माझ्या देशाची संसद मौन आहे.


मूळ कविता : रोटी और संसद
मूळ कवी : धूमिल
मूळ भाषा : हिंदी 

विरेचन

मनात तुंबलेल्या
भावनांच्या विरेचनासाठी
मी केलं विवेचन
माझ्या आत्मबलाचं
माझ्याच कवितेत
पुन्हा पुन्हा...

आभास निर्माण केला
सभोवताली शब्दांचा
जे चढवतील हल्ला
तुझ्या दुटप्पीपणावर
माझ्यावर होणाऱ्या
प्रत्येक अन्यायावर ...

माझ्या कवितांनी
दिली मला स्वप्न
पुन्हा डोळ्यात
सजवण्यासाठी
काळोख्या रात्री
संपवण्यासाठी ...

मनात तुंबलेल्या
भावनांच्या विरेचनासाठी
मी केलं समालोचन
माझ्याच आयुष्याचं
माझ्या आत्मबलाचं
माझ्याच कवितेत
पुन्हा पुन्हा...

केवळ वाईट घटनाच
चितारल्या मी
वास्तवाच्या वस्त्राचे
अस्तर बनवत
मी रेखाटलं
जीवनाचं विद्रूप चित्र...

माझ्या कवितांनीच अखेर
दिली मला आशा
समस्त दुःखदायक
घटनांच्या पार्श्वभूमीवर
दुःख देण्यासाठी आता
काय उरलंय नवीन?

स्वातंत्र्य 2...

‘ तुझं स्वातंत्र्य तिथे संपतं
जिथे माझं नाक सुरु होतं ’
असं म्हणत म्हणत
अनंत नाकांनी
घेराव घातला
माझ्या बिच्चाऱ्या स्वातंत्र्याला,
आता माझं स्वातंत्र्य
विचारात आहे
तपश्चर्येच्या,
मिळवावं वाटतंय
त्याला एक नाक,
म्हणजे मग त्यालाही
कुणालातरी दडपता येईल.

नाही का? 

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

उम्मीदभी...

आहटें सुनाई नहीं देती आजकल

इतने दबे पांवोंसे वोह

करीब आती है,

धुंधलाती नजरसे देखनेकी विफ़ल कोशिशे

फिरभी जारी रहती है

अंदर ही अंदर,

मैं आजभी मानना नहीं चाहती

अपनी हार, उसकी जीत

किसी भी हालातमें,

ऐ मेरी किस्मत मत भूल

मैं आजभी जिंदा हूं

और मेरी उम्मीदभी...

जवाब

कई सवाल दफ़न है

कई जगह

जिस्म के कई कोनोंमे.

कभी कान पूछते है मुझसे

तुम सुनकर भी क्यों अनसुना कर देती हो

कई बातोंको,

कभी आँखे पूछती है मुझसे

तुम देखकर भी क्यों अनदेखा कर देती हो

कई चीजोंको,

कभी नाक पूछती है मुझसे

क्यों सूंघ नहीं पा रही हो तुम इर्दगिर्द

सुलगते बारुदको,

कभी जबान पूछती है मुझसे

क्यों कतराती हो सच बोलनेसे

हर वक्त हर जगह,

आजकल तो जिस्मका हर जर्रा पुछनेपर

उतारू है,

मुझे किसका डर है,

किसका खौफ़ है

जो मुझे ना जीने दे रहा है ना मरने.

सवालोंसे घिरी मै

खड़ी हूं

सवालोंके सामने,

जुबाँपर सच

सहमां हुवा

फिरभी लड़खड़ाते हुवे

मैंने जवाब दिया

‘मै स्वतंत्र भारत की नागरिक हूं...’

बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

मनात काय आहे तुझ्या?

किती सूर्य आहेत तुझ्या मनात
किती नद्या आहेत?
किती निर्झर आहेत?

किती पर्वत आहेत तुझ्या देहात
किती गुंफा आहेत?

किती वृक्ष आहेत
किती फळं आहेत तुझ्या ओटीत?

किती पानं आहेत
किती घरटी आहेत तुझ्या आत्म्यात
किती चिमण्या आहेत?

किती मुलं आहेत तुझ्या गर्भात
किती स्वप्न आहेत
किती कथा आहेत तुझ्या स्वप्नांत?

किती युद्ध आहेत
किती प्रेम आहे?

केवळ नाही तर ती मी आहे
अजून आणखी किती व्यापक व्हायचंय मला
किती पक्व व्हायचंय मला
सांग
मी सुद्धा
तुझ्या मुळासह उगवू शकेन?

किती सूर्य आहेत तुझ्या मनात
किती सूर्य?