बुधवार, ३ सप्टेंबर, २०१४

हिंदकळत राहतं पाणी...

हिंदकळत राहतं पाणी
कोणत्याही क्षणी वाहून जाण्याच्या प्रयत्नात,
कधी थोपवता नाही येत
ना येत स्थिर करता
त्या हिंदकळणाऱ्या पाण्याला...
निथळत राहतं मनाचं एकाकीपण
त्याच्या वाहणाऱ्या प्रत्येक जखमेतून,
त्या प्रत्येक रुधीरकणातून
साकळत जातात
अनेक भावना...
गोठत जातं जेव्हा हृदयाचं ओलेपण
तेव्हाही हिंदकळत राहतं पाणी
जीवनाच्या जिवंतपणाचा दाखला देण्यासाठी,
नाहीतर केव्हाच उघडं पडलं असतं
मेलेल्या आत्म्याचं कलेवर
सर्वांसमोर...
तेच झाकण्यासाठी प्रेतवस्त्र बनून
हिंदकळत राहतं पाणी
कोणत्याही क्षणी वाहून जाण्याच्या प्रयत्नात

हरवलेल्या डोळ्यांतून...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा