बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

महाराष्ट्रातील लोककला १ : वासुदेव




लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.

महाराष्ट्राची जडणघडण करण्यात या लोककलांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलांनी केला म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की, महाराष्ट्र म्हणजे सप्तसुरांचा संगम आणि सप्तरंगांची उधळण आहे. इथे मनातला गुंता शेजारीण सोडवू शकत नाही, पण वर्षातून एकदा येणारी कडकलक्ष्मी सगळ्या रोगांवर औषध देऊन जाते. ज्वारीच्या शेतातून कुणी चालू लागला, तर कधी कडाक्याच भांडण होतं, पण मोरपिसाची टोपी घातलेल्या वासुदेवाच्या झोळीत सूपभर जोंधळे आनंदानं घातले जातात. कधी स्वत:च्या पणजोबाचं नावं आम्हाला माहिती नाही, पण वर्षातून एकदा येणारा हेळवी आमच्या पणजोबाचा खापर पणजोबा कुठे राहायचा हे पत्त्यासहीत सांगतो. खरा पोलीस गावात कधी येतो की नाही हे माहीत नाही, पण बहुरूपी आला की पोरं-सोरं डालग्यामागं गुडूप होतात. ब्रह्मदेवानं गाठ मारली म्हणून लग्न होतं, पण गोंधळ्यानं गोंधळ घातल्याशिवाय संसार सुरू होत नाही जसा आहे तसा, पण आपला महाराष्ट्र रंग-ढंगदार आणि नवरसपूर्ण आहे एवढं खरं!

लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.  या लोककलांचा घेतलेला एक संक्षिप्त वेध...


१. वासुदेव

गोविंद रामा हो, गोपाळा रामा जी जी
केशवा रामा हो, माधवा रामा जी जी


सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशात मिसळताना पक्षांची घरटी किलबिलू लागतात, त्यांच्यासोबत, तालासुरात, टाळ-चिपळ्यांच्या तालावर वासुदेव मनाचा ताबा घेतो आणि बाळ गोपाळांचा मेळा अंथरुणातून थेट अंगणात येतो.

डोक्यावर मोरपिसांनी सजविलेला शंकुच्या आकाराचा मुकुट, अंगात शुभ्र घोळदार झब्बा, सलवार आणि कमरेला बांधलेलं उपरणं. उपरण्यात खोवलेला पावा. एका हातात टाळ, एका हातात चिपळ्या आणि पहाटेचं वातावरण भारून टाकणार्‍या किनर्‍या आवाजाला पायात बांधलेल्या चाळांची साथ. पाहताक्षणी लहान-थोरांना भुरळ घालण्याची किमया त्याच्या - या वासुदेवाच्या -  पेहरावात असते.

टाळ वाजवित, गात-नाचत येणार्‍या या वासुदेवाची वर्णनं महानुभव पंथाच्या साहित्यातही सापडतात. यावरून लोकजागृतीचा हा आदर्श वारसा सुमारे नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचा तरी नक्की असावा असे अभ्यासक सांगतात.

कृष्णभक्ती हा वासुदेवाचा वसा आहे. हे त्याच्या पेहरावावरून सहज लक्षात येतं. डोक्यावरच्या मुकुटातली मोरपिसं आणि त्याचा पावा त्याच्या भक्तीचा केंद्रबिंदू दाखवितात. तर त्याच्या गीतातील गोविंद गोपालाचा उल्लेखही तेच दर्शवितो.

वासुदेव बनून गावोगावी फिरण्याबरोबरच काही वासुदेव शेतीही करतात. त्यांची वेगळ्या जातीत गणना होऊ लागली असली, तरी ते जातीने प्रामुख्याने मराठा या श्रेणीत मोडतात असे अभ्यासकांनी नमूद केले आहे.

मौखिक परंपरेनं चालत आलेली गाणी, अभंग, ओव्या, गवळणी आपल्या विशिष्ट लकबीत, तालबद्धरीत्या सादर करून लोकांच्या मनावर सकारात्मक संस्कार करण्याचा पहिला मान वासुदेवाचा. सकाळी पहिल्यांदा आपण जे गीत ऐकतो, ते दिवसभर आपल्या मनाभोवती रेंगाळत राहते. गावोगावी फिरणार्‍या वासुदेवाला याचं भान आहे. म्हणूनच तो दिवसाच्या आरंभालाच शुद्धाचरणाचा, नि:स्वार्थ दानाचा आणि हरिभजनाचा उपदेश करतो. समाजमनाची मशागत करताना जसा तो कमी पडत नाही, तसा तो स्वत:साठी दान मागतानाही कमीपणा वाटून घेत नाही. देणार्‍यालाही तो कधी भिक्षेकरी वाटत नाही.

बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको.
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको.

असा हिताचा उपदेश करतानाच,
तुम्ही आया बायांनो द्या वासुदेवणीला चोळी
अहो, लहान मुलीच्या द्या अंगीची काचोळी.

अशी स्वत:च्या संसाराला हातभार लावणारी मागणी मागतो.
समाजाची आध्यात्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक गरज भागविणारी ही समृद्ध परंपरा महाराष्ट्राच्या समाजजीवनातून कधीही वजा होऊ नये अशीच आहे. शहरीकरणाच्या, आधुनिकतेच्या विळख्यात गुरफटत चाललेला महाराष्ट्र अशा संस्कारक्षम परंपरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन गढूळ होऊ देणार नाही अशी अपेक्षा. त्याच्या कर्तृत्वाचं मोल म्हणून त्याच्या झोळीत मूठ-पसा टाकला की, तो दान पावलं, दान पावलंम्हणत आपल्या ओंजळीत पुण्याइचं दान टाकील आणि प्रबोधनाचा हा मंजूळ पावा महाराष्ट्राच्या संस्कारक्षम मनाला अखंड जागविताना सांगत राहील...

बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको,
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको,
दिली देवानं धनसंपदा, गर्व मनामधि धरु नको,
चरत गायत्री शेती आली, तिच्या मुखावर मारु नको,
झाली म्हातारी गाय बापा, कसाबाला तू विकू नको,
मूल घातला साळमंदी, लाड त्याचा तू करू नको,
वडील बंधू बापापरमानं, मर्जी मोडून बोलू नको,
पित्याच्या वंशी जन्म घेतला, त्याच्या सेवेला चुकू नको,
आईच्या पोटी जन्म घेतला, वाईट वंगाळ बोलू नको,
दोघा भावांचा तंटा लागला, सरकारामधि जाऊ नको,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा