सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

मांझीचा पूल



मी पहिल्यांदाच
शाळेतून परतताना
त्याच्या लालेलाल कमानी पाहिल्या होत्या
हे हिवाळ्याचे सुरवातीचे दिवस होते
जेव्हा पूर्वेच्या आसमंतात
सारसांच्या थव्याप्रमाणे पंख पसरून
हळू हळू उडत असतो मांझीचा पूल

तो कधी बनवला गेला
कुणालाच माहित नाही
कुणी बनवला होता मांझीचा पूल
हा प्रश्न माझ्या गावातील लोकांना
अजूनही अस्वस्थ करतो
‘तुझ्या जन्माच्या आधी...’
सांगायची आजी
‘जेव्हा दिवसा रात्र झाली होती
त्याच्याही आधी...’
सांगतो गावातील म्हातारा चौकीदार

काय हे खरं नाही कि एका सकाळी अशाचप्रकारे
किनाऱ्याच्या रेतीवर
पडलेला मिळाला होता मांझीचा पूल
बन्सी नावाड्याचे डोळे विचारतात.

लालमोहर जेव्हा नांगर चालवतो
आणि नेमक्या त्याचवेळी
जेव्हा त्याला तंबाखूची गरज भासते
बैलांच्या शिंगामधून दिसून जातो
मांझीचा पूल

झपसीच्या मेंढ्या
त्याने अनेकदा पाहिल्या आहेत
जेव्हा चरता चरता थकून जातात
तेव्हा मान वर करून
त्या दिशेने पाहू लागतात
जिथे मांझीचा पूल आहे.

मांझीच्या पुलाला किती खांब आहेत?
एकोणीस –- सांगतो जगदीश
वीस – रतन हज्जामला वाटतं
अनेकदा ही संख्या तेवीस ते चोवीस पर्यंत जाते
काय दिवसाचे खांब
रात्री कमी होतात का?
कि सकाळी सकाळी वाढतात
मांझीच्या पुलाचे खांब?

मांझीच्या पुलामध्ये किती विटा आहेत?
किती अरबी वाळूचे कण?
किती खेचरं
किती बैलगाड्या
किती डोळे
किती हात चिणले गेले आहेत या मांझीच्या पुलामध्ये
माझ्या गावातल्या लोकांकडे
कोणताच हिशेब नाही

सत्य हे आहे
माझ्या गावातल्या लोकांना फक्त एवढंच माहित आहे
दुपारच्या भर उन्हात
जेव्हा कुणाकडे काही काम नसतं
तेव्हा पिकलेल्या ज्वारीच्या शेतासारखा वाटतो
मांझीचा पूल

पण पूल काय असतो?
माणसांना आपल्याकडे का खेचतो पूल?
असं का होतं कि रात्रीची शेवटची गाडी
जेव्हा मांझीच्या पुलाच्या रुळांवर चढते
तेव्हा आपल्या गाढ झोपेतही
माझ्या गावातला प्रत्येक माणूस हलू लागतो.

एका गंभीर अस्वस्थतेनंतर
मी अनेकदा विचार केला कि मांझीच्या पुलात
कुठे आहे मांझी?
कुठे आहे त्याची नाव?
काय तुम्ही बरोबर त्याच जागी बोट ठेऊ शकाल
जिथे प्रत्येक पुलात लपलेली असते एक नाव?

मासे आपल्या भाषेत
काय म्हणतात पुलाला?
सुसर आणि मगर काय विचार करतात?
कासवांना कसा वाटतो पूल?
जेव्हा ते दुपारनंतर रेतीवर
आपली पाठ पसरून
त्यांच्या कमानीखाली शेकत असतात.

मला माहित आहे माझ्या गावातल्या लोकांसाठी
हे केवढे मोठे आश्वासन आहे
कि तिथे पूर्वेला आकाशात
प्रत्येक माणसाच्या बालपणाच्याही आधीपासून
गुपचूप टांगलेला आहे मांझीचा पूल

मी विचार करतो
आणि विचार करून थरारून जातो
त्यांना कसं वाटेल जर एके दिवशी अचानक कळलं तर
कि तिथे नाहीये मांझीचा पूल !

मी स्वतःला विचारतो
कोण मोठं आहे
जो नदीवर उभा आहे तो मांझीचा पूल
कि तो जो टांगलेला आहे लोकांच्या आत?




मूळ कविता : मांझी का पूल
मूळ कवी : केदारनाथ सिंह
मूळ भाषा : हिंदी







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा