बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

व्युत्पन्नता आणि कवित्वाचा सुंदर संगम : कविराय रामजोशी


राम जगन्नाथ जोशी
(इ.स. १७५८ – इ.स. १८१३)
राम जोशी हा पंडित कवी आणि शाहीर या दोन परंपरांना जोडणारा दुवा आहे. याचे घराणे मुळचे सोलापूरचे. प्रखर विद्वत्तेची परंपरा असलेल्या घराण्यात त्याचा जन्म झाला. रामजोशींचे थोरले बंधू म्हणजे मुद्गलशास्त्री. हे नावाजलेले शास्त्री आणि पुराणिक होते. वडील निर्वतल्यावर रामजोशींना त्यांनीच सांभाळले. रामजोशींना लहानपणापासूनच तमाशाचा छंद होता. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता. घरासमोरच धोंडिबा शाहिराचा फड होता. रामजोशी नेहमी तिकडे जाऊन बसत. त्यामुळे त्यांना लावण्या रचण्याचा व डफावर गाणी म्हणण्याचा षोक लागला. वयाची विशी उलटून गेली तरी संस्कृत भाषेचा गंध नसलेल्या रामजोशींना, मुद्गलशास्त्रींनी घरातून घालवून दिले. तेव्हा रामजोशी नेसत्या वस्त्रानिशी पंढरपूरला गेले आणि त्यांनी तिथे वेदशास्त्रसंपन्न बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करून काव्यालंकार आणि व्याकरणशास्त्र यांचा अभ्यास केला.
संस्कृतचा गाढा व्यासंग असणारा हा एकमेव शाहीर म्हणता येईल. गुरूंची अनुज्ञा घेऊन रामजोशी सोलापूरला परतले. तेथे वडील बंधू आजारी असल्याचे पाहून रामजोशींनी त्यांच्याऐवजी देवळांत पुराण सांगायला सुरुवात केली. पुराण सांगण्याची त्यांची अनोखी धाटणी पाहून सोलापूरकर आणि मुद्गलशास्त्रीही प्रसन्न झाले. इ.स. १७९३पासूनच्या पुढील काळात रामजोशी उत्तम कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध पावले. संस्कृताध्ययन, यमक-अनुप्रासांची लयलूट, संस्कृत-प्राकृत शब्दांच्या मिश्रणाने घडून आलेली भाषेची सजावट, शीघ्रकवित्व, समयसूचकता आणि प्रभावी वक्तृत्व आदी गुणांमुळे रामजोशी यांची कीर्तने अतिशय लोकप्रिय झाली. शंकराचार्यांनी रामजोशींना बहिष्कृत करावे असा पुण्यातील कर्मठ ब्राह्मणांचा आग्रह होता. परंतु शंकराचार्यांसारख्या पुरुषाला रामजोशींनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणाने आणि काव्यरचनेने संतुष्ट केले. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात काशीरामेश्वरपर्यंत ज्यांचा लौकिक पसरला होता असे नीलकंठशास्त्री थत्ते नावाचे एक याज्ञिक पंडित होते. पुण्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्या सभेत नीलकंठशास्त्री आहेत, तेथेच रामजोशींचे कीर्तन ठेवले. ते जाणून रामजोशींनी यज्ञशास्त्राची जमेल तितकी माहिती गोळा केली, आणि त्या सभेत त्या माहितीचा उपयोग करून बसविलेल्या लावण्या कटिबंधाच्या चालीवर म्हटल्या. त्या ऐकून थत्तेशास्त्रींनी खुश होऊन आपल्या अंगावरची शाल रामजोशींना पांघरून त्यांचा गौरव केला.
व्युत्पन्नता आणि कवित्व यांचा सुंदर संगम रामजोशीच्या व्यक्तिमत्वात झालेला असला तरी त्याची वृत्ती अत्यंत रंगेल आणि बेछूट अशी होती. रामजोशींचा बारामतीला बाबुजी नाइकांच्या वाड्यात तमाशा होता. त्यावेळी त्यांनी गायलेल्या भला जन्म हा तुला लाधलाआणि दो दिवसांची तनु ही साचीया दोन वैराग्यपर कवनांनी तिथे असलेले मोरोपंत संतुष्ट झाले. त्या दिवसापासून मोरोपंत आणि रामजोशी यांच्यामध्ये एकमेकांविषयी आदर व स्नेह वाटू लागला, आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. रामजोशींनी मोरोपंतांच्या आर्या आपल्या कीर्तनांतून लोकप्रिय केल्या. मोरोपंत त्यांना कागदोपत्री ‘कवीप्रवर’ असे संबोधित. रामजोशी मात्र ‘कविराय’ एवढाच आपला उल्लेख करतो. ‘मोरोपंतांच्या काव्यरचनेची छाया रामजोशीच्या कवनांत दिसते.’ याची जाणीव श्री. म. वर्दे यांनी करून दिली आहे. ते पुढे म्हणतात, “संस्कृतच्या अध्ययनामुळे त्यांच्या कवनास विशेषतः शृंगारास संस्कृत वाड्मयातील शृंगाराचे वळण लागले. इतर शाहिरांच्या इतके त्यांच्या लावण्यांत मराठी वळण, मराठी भावनाही आढळत नाहीत. शिष्ट समाजाचे प्रभावी संस्कार त्याच्या वाड्मयात जास्त दिसतात. एकंदर शाहिरी वाड्मयात त्यांची सभ्यता विशेष दिसते. त्यांच्या लावण्यांत स्त्रीच्या यौवनाची, प्रियकरासाठी होणाऱ्या तळमळीची वर्णने असली तरी ती सर्व वैवाहिक जीवनातील, प्रस्थापित नीतीच्या मर्यादेत राहिली आहेत.”
‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही रामजोशीची गाजलेली आणि रसिकप्रिय लावणी म्हणजे स्त्रीसौंदर्याच्या मोहक आणि उन्मादक वर्णनाचा सुंदर नमुना आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली, मोत्याचा भांग’ किंवा ‘अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारीते लहर,मदन तलवार’ अशा प्रासादात्मकतेने या लावणीच्या सौंदर्यात मोठी भर घातली आहे. 
(ध्वनीचित्रफित शाहीर रामजोशी या  व्ही.शांताराम यांनी काढलेल्या मराठी चित्रपटातून साभार.)

संस्कृतातील संकेतांचे अनुकरण करून मराठमोळ्या स्त्रीचे सौंदर्य आणि तिचा साजशृंगार रामजोशींनी मोठ्या ढंगदारपणे व्यक्त केला आहे. ‘कुण्या ग सुभगाची मंजिरी’ ही लावणीही अशीच आहे. शृंगाराला भरपूर अवसर असणाऱ्या कृष्णलीलावर्णनपर लावण्यांतही रामजोशींनी सद्भिरुचीची बंधने सोडलेली नाहीत. त्यातील शृंगार विप्रलंभ आहे. राधा-कृष्ण यांच्या होळीच्या प्रसंगीच्या क्रीडेचे वर्णन त्यांनी अत्यंत बहारीने केले असून राधेने कृष्णाचे आणि कृष्णाने राधेचे रूप घेतल्यामुळे जो संभ्रम निर्माण झाला त्याने साऱ्या प्रसंगात काही औरच रंग भरला आहे.
श्रीरंग गोपिकोत्संग धरुनि करि रंग हरी हा बाई
कुंजात मातला वसंत सांगू मी काई
यांसारख्या प्रसादात्मकतेमुळे आणि पदलालित्यामुळे वसंतातील कृष्ण-गोपींच्या रासक्रीडेची लावणी आकर्षक बनली आहे. छेकापन्हुति या अलंकारातील एका स्वतंत्र लावणीत केलेल्या द्वयर्थी शब्दयोजनेमुळे रामजोशींचे भाषाप्रभुत्व प्रगट होते.
अंबरगत पयोधरातें रगडूनि पळतो दुरी
काय हा धीट म्हणावा तरी ,
तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैय्या तरी
नव्हे गे मारुत मेघोदरी...
यासारख्या नर्म आणि सूचक श्रुंगारामुळे ही लावणी दीर्घकाळ स्मरणात राहते. लौकिक विषयावरील अनेक लावण्यांत रामजोशींनी स्त्रीमनाचे विविध रंग चितारले आहेत. ‘झाली तरुणपणाची धूळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडे मुळमुळ’ अशी विरह्व्याप्त नायिका एका लावणीत आढळते. तर दुसरीत ‘तुम्ही सजणा – सुजणा घ्या आदराचे पान, मज दुबळीचा राखा स्वाभिमान..’ अशी पतीची विनवणी करणारी पतिव्रता आढळते.
रामजोशींनी लिहिलेल्या पौराणिक आणि देवदेवतांच्या वर्णनपर लावण्यांत पौराणिक वातावरणापेक्षा समकालीन समाजातील देवदेवतांविषयीचे उल्लेख अधिक आढळतात. पंढरपूरवर्णन, तुळजापूरवर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचे वर्णन, बार्शीचा भगवंत यांवरील लावण्या महाराष्ट्रभर कीर्तने करीत असताना घडलेल्या प्रवासात रामजोशींनी लिहिलेल्या दिसतात. पण त्यातही त्यांचा प्रासादात्मकतेचा हव्यास सुटलेला नाही.
रामजोशींच्या उपदेशपर लावण्या मनाची पकड घेणाऱ्या आहेत. ‘नरजन्मामधी नरा करूनि घे नर नारायण गडी, तरिच हे सार्थक मानवकुडी..’ किंवा ‘दो दिवसाची तनु हे साची, सुरतरसाची करूनि मजा गमजा करिता मनी उमजाना हे सुख न पुढे पडेल वजा, भाई सावध व्हा...’ या लावण्या आजही लोकप्रिय आहेत. जवळच राहणाऱ्या सुबरावबुवांचे प्रस्थ पाहून वैराग्याचे स्तोम माजविणाऱ्यांचा समाचार लावणीतून घेतला आहे तो असा:
(ध्वनीचित्रफित शाहीर रामजोशी या  व्ही.शांताराम यांनी काढलेल्या मराठी चित्रपटातून साभार.)



अर्थचमत्कृती, खटकेबाजपणा, प्रासादात्मकता आणि भाषेचे लालित्य यांमुळे या लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातील निवृत्तीपर उपदेश सांकेतिक स्वरूपाचा असून तो रामजोशींच्या अनुभूतीतून उतरलेला नाही, हे मात्र जाणवते. रामजोशींनी पोवाडे थोडेच लिहिले आहेत. ‘ब्राह्मणी राज्य जोरदार’ हा त्यांचा पुणेवर्णनाचा पोवाडा प्रसिद्ध आहे. ‘लंकाच पुण्यामध्ये लेश न दारिद्र्याचे’, साक्षात विष्णू अवतार पेशवे कूळ’, असे पुण्याचे आंनी पेशवाईचे वैभव ते वर्णन करतात. पेंढारी आणि त्यानंतर पडलेला दुष्काळ यांनी ज्या साऱ्या पेशवाईची हानी केली त्याचे चित्र रामजोशींनी दुष्काळावरील पोवाड्यात रंगविले आहे. ‘चिका आत ज्या निका पढविल्या पिकाशी गळ लाविती, विकावया त्या नेल्या किती अबला उरल्या जन चुंबती’ अशी समाजातील दैन्यावस्था ते वर्णन करतात. पण त्यात कारुण्यापेक्षा शब्दचमत्कृतीच अधिक आढळते. होळकरांच्या धामधूमीवरील पोवाड्यात तर त्यांनी राज्याच्या सर्वनाशाचे भाकीत वर्तवले आहे.
रामजोशींच्या फडात बया आणि चिमा अशा दोन स्त्रिया असत. त्यातील बयाबाईची गाठ ही आपल्या जीवनातील महत्वाची घटना असल्याचे रामजोशींनी ‘दैवे ही गांठ बयाबाईची मज पडली साची, कविता इजसंगे रंगा आली.’ या काव्यपंक्तीतून स्पष्ट केलेच आहे. त्यांच्या अनेक लावण्यांना तिच्या स्वरांनी जोड देऊन रंगाची खुलावट केली असावी.
(कविराय रामजोशी आणि बयाबाईच्या सवालजवाबाचा प्रसंग, शाहीर रामजोशी या  व्ही.शांताराम यांनी काढलेल्या मराठी चित्रपटातून साभार.)


प्रासादात्मकतेने नादमाधुर्याचे स्रोत वाहविणाऱ्या या शाहिराची बाजीरावाने बरीच कदर केली होती. बिदाग्या व देणग्यांखेरीज त्याला दरमहा २५ रुपयांची नेमणूकही करून दिली होती. हा यशस्वी कीर्तनकार आणि शाहीर व्यक्तिगत जीवनात मात्र उधळ्या विलासी आणि मद्यपी होता. सारा पैसा आणि वैभव त्याने व्यसनात उधळून टाकले आणि तो दरिद्री झाला. शेवटी काशीयात्रा घडावी म्हणून (‘आलो रावबाजीपाशी या कवीस घडावी कशी’) तो राव्बाजीपाशी आला. पण त्याला मदत मिळाली नाही आणि काशीयात्राही घडली नाही. असा हा कविराय इ.स.१८१३ (शके १७३५) मध्ये स्वर्गवासी झाला. इतर शाहीरांप्रमाणे यानेही ‘कविराय चमकला हीर’ असा स्वतःचा गौरवपूर्ण उल्लेख केला असून इतर शाहिरांचा ‘काजवे’ संबोधून त्याने त्यांचा अधिक्षेप केला आहे. के. ना. वाटवे म्हणतात, “पांडित्य आणि पाचकळपणा, विद्वत्ता आणि ग्राम्यता, वैराग्य आणि व्यसनांधता यांचे काही अलौकिक मिश्रण त्याच्या चरित्रात आणि कवित्वातही आढळते.”

सन्मान आणि गौरव
·         सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव अप्पा यांनी रामजोशींचे कीर्तन ऐकून त्यांचा सत्कार केला होता.
·         मोरोपंतांनी रामजोशींना कविप्रवरअशी पदवी दिली होती.
·         एका सावकाराने रामजोश्यांचे कीर्तन ऐकून त्यांना पाच हजाराचा रोखा फाडून दिला.
·         इचलकरंजीच्या घोरपड्यांच्या वाड्यात आपल्या बिदागीबद्दल चाललेली कुजबूज ऐकून रामजोशांनी आपल्या कवनात तसा उल्लेख केला. ते ऐकून घोरपडे यांनी प्रसन्न होऊन मोठीच बिदागी दिली.
·         नीलकंठशास्त्री थत्ते नावाच्या पुण्यातील विद्वानाने रामजोशींना आपल्या अंगावरची शाल पांघरून त्यांचा गौरव केला.

रामजोशींचे प्रकाशित साहित्य
·         रामजोशीकृत लावण्या, भाग १ व २. (संपादक : रा.श्री. गोंधळेकर)
·         रामजोशीकृत लावण्या. -लावणी संग्रह’. (संपादक : शं.तु. शाळिग्राम)
·         पेंढाऱ्यांचा आणि दुष्काळाचा पोवाडा. - ऐतिहासिक पोवाडे खंड १. (संपादक : य.न. केळकर)
·         पेशव्यांच्या शुक्रवारवाड्याचा पोवाडा. - ऐतिहासिक पोवाडे खंड २. (संपादक य.न.केळकर)
·         पुण्याचा पोवाडा/ब्राह्मणी राज्य जोरदार. - ऐतिहासिक पोवाडे खंड १. (संपादक : य.न. केळकर)
·         सुभद्रेचा पोवाडा. - तंतकवि तथा शाहीर’. (संपादक : य.न. केळकर)

चरित्रग्रंथ
·         महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - रामजोशी (लेखक : शिरीष गंधे; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
·         रामजोशी (लेखक : य.न. केळकर)
·         रामजोशी चरित्रावर आणखी प्रकाश. - ऐतिहासिक पोवाडे खंड ३. (संपादक य.न.केळकर)
·         रामजोशी सोलापूरकर, पंतांचे मित्रमंडळ, मोरोपंत चरित्र आणि काव्यविवेचन (ल.रा.पांगारकर)
·         रामजोशी : मराठी शाहीर (श्री.म. वर्दे)

चित्रपट
·         शाहीर रामजोशी’ : व्ही.शांताराम यांनी काढलेला मराठी चित्रपट. यात मराठी गायक जयराम शिलेदार यांनी रामजोशींची भूमिका केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा