बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

पर्वत




ते सांज होताच
आपल्या मस्तकावरून उतरवून
एका बाजूला कुठेतरी ठेऊन देतात
आपला सोनेरी स्वाभिमान
आणि उतरून येतात खाली...

खोल तलावात
जरा सुस्तावतात
मग धुतात चेहरा आणि हात
आणि काहीक्षण तिथेच थांबून
थंड हवेत
जोरजोरात करतात श्वासोच्छवास...

मग येतात वर
आणि झटपट चघळतात
काही पानं
काही मूळ
काही दगड
मग उठतात
आणि कुठूनशी शोधून आणतात
आपली गवताची फाटकी-तुटकी चटई
आणि झोपेने व्याकूळ
ताऱ्यांच्या प्रकाशात
कुठे एखाद्या कोपऱ्यात
चालू पडतात झोपण्यासाठी

पण जेव्हा
तिथे खूप शोधल्यावरही
त्यांना मिळत नाही झोपण्यासाठी
ठीक-ठाक जागा
ते परत येतात
आणि त्याचप्रकारे
पुन्हा उभे राहतात जिथल्या तिथे

अखेर
उभ्या उभ्या
विराट आकाशाच्या उराशी
टेकवतात आपलं मस्तक
आणि उशिरापर्यंत झोपतात
काय तुम्ही विश्वास ठेवाल
झोपेत पर्वत
रात्रभर रडतात.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा