बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

स्वातंत्र्य १२



जेव्हा हुंगताना एखादं सुवासिक फूल म्हणतं,
तुझ्या उच्छ्वासांनी दुषित होतोय माझा सुवास
आणि त्याचवेळी हवा बजावून सांगते मला
खबरदार तुझे विचार बोलून दाखवलेस तर,
तुझे शब्द विष फुत्कारताहेत
आणि जगणं मुश्कील करून टाकलं आहेस
तू सगळ्यांनाच...

मी स्पर्श करू पाहणारी प्रत्येक गोष्ट
पळू लागली आहे जीवानिशी
त्यांच्या मनात शंका आहे,
माझ्या शब्दांसारखीच
माझी त्वचासुद्धा विषारी आहे कि काय?

स्वर शिरतच नाहीयेत कानात
त्यांना वाटतंय
माझ्या भडकलेल्या मस्तकाच्या ज्वाळांनी
ते भस्मसात होतील.

माझ्या दर्शनाचा विटाळ मानणारे असंख्य डोळे
उगाचच भिरभिरताहेत इतरत्र...

सगळीकडे या अस्पृश्यतेचा अनुभव घेऊन
जेव्हा मी परतते परत
तेव्हा टेबलावरचे ताव लेखणीसहित
असतात प्रतीक्षारत
ते करतात स्वागत
आणि सांगतात
उपस तुझ्या तीक्ष्ण शब्दांची हत्यारं
झडू दे नवा संग्राम
तुझ्या संघर्षातच आमच्या जीवनाचं
सार्थक आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा